मानसिक आरोग्य हा एक व्यापक विषय आहे. मात्र ताण आणि नैराश्य या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी कारणीभूत आहे. ताण ही समस्या सर्वात जास्त भेडसावणारी तर नैराश्य हा सर्वात जास्त आढळणारा मानसिक आजार आहे, या दोन्ही गोष्टी मानसिक स्थिती बिघडवण्यास कारणीभूत आहे. आणि यातून जर वेळीच बाहेर येता आले नाही तर माणूस आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतो. नैराश्य जीवनाच्या सर्व घटकावर परिणाम करते. अगदी दैनंदिन जीवनापासून ते करिअरवर परिणाम होतो. साधारणपणे दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस त्रास झाला तर “आजार” संबोधले जाते. आणि त्याचा नात्यावर, कुटुंबावर आणि दररोजच्या कामावर याचा परिणाम होतो,आणि सर्वात मोठा परिणाम म्हणूजे “आत्महत्या”
का बरं व्यक्ती एवढी टोकाची भूमिका घेतो. त्याने आत्महत्या केली म्हणजे सर्व प्रश्न सुटले असे होते का? तर नाही त्याच्या आत्महत्येमुळे त्याचा प्रश्न जरी सुटत असेल तरी त्याने ज्या गोष्टीमुळे आत्महत्या केली हा प्रश्न तर अनुरुरीत राहतो. एकीकडे लाँकडाऊनमुळे हजारो लोकांचे रोजगार बंद झाले आणि त्यामुळे त्यांनी हजारो किलोमीटर मिळेल ते वाहन आणि नाही मिळेल तर पायी चालत आपला प्रवास पूर्ण केला, यात महिलांचा ही समावेश होता. एकीकडे आयुष्यात किती संकटे आली तर जगायचे कसे हे शिकायला मिळते तर दुसरीकडे यशाच्या शिखरावर असताना आत्महत्या करणे हे खरंच दुदैवी आहे, आणि यातून भावीपिढी काय आणि कसा बोध घेणार? हा मनात निर्माण होणारा विषय विचार करणारा आहे. आणि आपले आयुष्य इतके स्वस्त आहे का की या अशा मार्गाने संपवायचे.
आजकाल नैराश्य म्हणजे काय? हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण हल्ली टीनएज मुले असूदे किंवा तरुण मुलेमुली असो त्यांच्या आयुष्यात काही ना काही कारणाने नैराश्य येत असते. अशावेळी अशा लोकांना यातून बाहेर काढणे ही आपली जबाबदारी आहे. डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी इतरांची मदत घेणे हा त्यावर एक चांगला आणि सकारात्मक उपाय आहे, परंतु या अशा गोष्टी खूप कमी वेळा घडतात. नैराश्य येण्याची अनेक अनेक कारणे आहेत.
१)आयुष्यात शिक्षण, नोकरी, पैसा, विवाह या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण यात जर अपयश आले.
२)सतत अपराधीपणाची भावना निर्माण होणे.
३)घरातील व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करण्यास अपयश येणे.
४)आपल्या मरणानंतर हे सगळे सुटतील, आपल्या नसल्याने यांना काही फरक पडणार नाही असा विचार मनात येणे.
५) मी का अपयशी झालो. माझ्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी का आल्या. अमूक एक गोष्ट मला कधीही मिळणार नाही.
अशा अनेक गोष्टी नैराश्य निर्माण होण्यास कारणीभूत आहे. दुःख, वाईट वाटणे, आनंदी न राहणे या गोष्टी अधिक काळ आपल्या बरोबर राहिल्या तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. “विश्व स्वास्थ्य संघटना” (WHO) च्या मते, डिप्रेशन हा सामान्य आजार आहे. आणि जगभरातील एकूण ३५० मिलियनच्या आसपास लोक या आजारामुळे प्रभावित आहेत. आणि ही काही दिवसाची समस्या नाही तर दीर्घकाळ चालणारा आजार आहे. तसेच डिप्रेशनबरोबर डायबेटिस, रक्तदाब, हदयविकार असे आजार होण्याची शक्यता असते. आईवडिलांना डिप्रेशनाचा आजार असल्यास मुलांना ही तो काही वेळा होतो. पण याची शक्यता फार कमी असते.
त्यामुळे जितक्या लवकर व्यक्ती बाहेर येईल ते त्याच्या आणि त्याच्या कुंटुंबासाठी चांगले आहे. आणि हे डिप्रेशन कधीही एका रात्रीत येत नाही. त्यासाठी निराश करणाऱ्या अनेक घटना कारणीभूत असतात आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतः ला अंधारात ढकलण्यासारखे आहे, कारण त्यानंतर एखादी भावनिक गोष्ट देखील नैराश्य आणू शकते. पण यावर मात करणे आपल्या हातात आहे. काही गोष्टी आत्मसात केल्या तर या आजारातून बाहेर येता येईल.
१)नेहमी सकारात्मक विचार करणे.
२)अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्यादय हा होत असतो. यासाठी नैराश्यातून बाहेर येण्यासाठी जे करणे शक्य आहे ते करावे.
३)आपल्या मनातील भावना आपल्या कुंटुंबाला किंवा मित्रांना आणि नाही जमेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगणे.
४)कोणावर अवलंबून न राहता स्वंयप्रेरित व्हा.आणि तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा.
५)पोषक आहार घेणे.(रेन्बो फूड) असे म्हणतात. आहारात विविध रंगाच्या पदार्थाचा समावेश करणे, कारण पोषक आहार डिप्रेशन दूर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दूष्टीने सुदृढ करतात.
६)दररोज योगा करणे, ध्यानधारणा करणे आणि तणावात असताना आपण आनंदी आहोत हा विचार करणे.
या गोष्टी आपल्याला नैराश्यापासून लांब घेऊन जातील. परंतु आणखी एक गोष्ट करणे आवश्यक आहे,ती म्हणजे नकारात्मक माणसे, टिव्हीवरील नकारात्मक बातम्या, नकारात्मक गोष्टी यापासून नेहमी दूर राहणे.
जसा शारीरिक आजार औषध गोळ्या घेऊन बरा होता . तसा मानसिक आजार औषधे आणि मानसोपचार केल्याने ठीक होतो. आणि जर आजार गंभीर असेल आणि आत्महत्येचा धोका असेल तर शाँक ट्रीटमेंटची आवश्यकता पडू शकते.परंतु जो मनाने आधीच खचला आहे तो कोणत्याही औषधाने कधीही बरा होणार नाही. त्यासाठी नेहमी सकारात्मक राहणे, आयुष्यात नेहमी चढ-उतार येत असतात त्याला धैर्याने सामोरे जाणे. आपल्या जवळची व्यक्ती आत्महत्या किंवा निराशात्मक गोष्टी करत असेल तर आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष कधीही करु नये. अशा वेळी त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल प्रेम, विश्वास आणि आधार देणे. काही वेळा घरातील व्यक्तीकडून हवा तसा आधार मिळाला नाही किंवा घराच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाली तर ती व्यक्ती अजून नैराश्यग्रस्त होते. काँग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी(CBT) रँशनल इमोटिव्ह बिहेविअर थेरपी(REBT) या उपचारांनी फायदा होतो, आणि सतत लोकांच्या संपर्कात राहणे, त्यांना मदत करणे, आपले छंद जोपासणे.
काही दिवस अन्न न मिळता जर पशुपक्षी, प्राणी जिंवत राहू शकतात तर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मानवाला ही गोष्ट का लक्षात येत नाही. अशावेळी बहिणाबाईच्या ओळी आठवतात.
“माणसा माणसा कधी होशील माणूस”.
जीवन ही आयुष्यात एखादाच मिळणारी अमूल्य ठेव आहे. अनेक संकटे येऊन सुद्धा जो धैर्याने सामोरे जातो. तोच खऱ्या अर्थाने आयुष्याचा आनंद घेत असतो. बदलत्या जीवनशैलीला आत्मसात करता करता मानव एवढा पुढे गेला आहे की आपल्या आयुष्यात येणाऱ्या मानसिक ताणतणावाला, संकटाला सामोरे जाण्यास घाबरतो. त्यामुळे या जीवनशैलीच्या आहारी आपण किती जावे हे आपले आपण ठरवायचे, कारण कोणत्याही गोष्टीचा प्रमाणापेक्षा हव्यास केला तर ते आपल्यासाठी घातक ठरते, त्यामुळे आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे जा, आणि आपले अमूल्य जीवन आनंदाने जगा.
लेखिका,
अमिता कदम, प्राध्यापिका, पुणे, 9819395788.
for more such articles visit www.mahaedunews.com
share your articles at mahaedunews@gmail.com