अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा पॅरीस करारामधे सामील होण्याचा निर्णय घेतला ही बातमी पर्यावणप्रेमींना दिलासा देणारी आहे. मी जेव्हां ही बातमी माझ्या समाज माध्यमातून शेअर केली तेंव्हा अनेक लोकांनी रिप्लाय केला की हा पॅरीस करार म्हणजे नेमकी भानगड काय आहे? या करारावर जगातील १९७ देशांनी स्वाक्षरी करून पाच वर्षे उलटल्यानंतरही माझ्या संपर्कामधील अनेकांना या बद्दल माहिती नसावे याचा अर्थ मी स्वतः याबद्दल जनजागृती करायला कमी पडलो असा मी घेतो. आजच्या गुगल जमान्यात या कराराबद्दल ची माहिती मिळवणे फार अवघड नाही. पण त्या सर्च वर जाण्यासाठी लोकांच्या आणि खास करून विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा जागृत करणे हे आजचे खरे आव्हान मला वाटते, एकीकडे स्वीडन मधील दहा वर्षाची ग्रेटा थनबर्ग शाळेचा त्याग करून क्लायमेट चेंज वर जगातील नेतृत्वाने कृती करावी याबद्दल रान उठवित आहे आणि एकीकडे आपण याबद्दल अगदीच अपरिचित आहोत.
मानवाने त्याच्या रोजच्या जीवनातील आव्हानांची उत्तरे शोधण्याच्या प्रक्रियेतूनच नवनवीन शोध लावलेले आहेत, आजच्या जगापुढील सर्वात मोठे आव्हान म्हणजे वेगाने होणारा वातावरण बदल आणि त्याला मानवी अनुकूलन होण्याची क्षमता वाढवण्याची गरज. आपल्या शिक्षण व्यवस्थेला जर उद्याच्या समस्यांची उत्तरे शोधायची असतील तर या आव्हानाबद्दल विद्यार्थ्यांना जेवढ्या लवकर जागरूक बनवले जाईल तेवढे चांगले आहे, कारण आजचे विद्यार्थी उद्याचे धोरणकर्ते बनणार आहेत, आणि म्हणून निसर्ग आधारित उपाययोजनांच्या [Nature Based Solution] पायाभरणी साठी या आव्हानांचा समावेश अभ्यासक्रमात व्हायलाच हवा.
शिक्षण क्षेत्र म्हणजे जिज्ञासा, नावीन्यपूर्ण कल्पना, प्रयोग, आणि ऊर्जेचा उस्फुर्त झरा आणि या उमेदीच्या काळात विद्यार्थ्याना जगापुढील सर्वात मोठ्या आव्हानाला ठेवले त्यांना यावरील समस्या निराकरणासाठी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाची संधी दिली तर मला विश्वास आहे की ही तरुण पिढी यावर नक्की मार्ग काढेल आज शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांना क्लायमेट चेंज, पॅरीस करार, शाश्वत विकासाची ध्येये या बद्दल सांगितले गेले पाहिजे आणि त्यांना प्रत्यक्ष कृतीतून यात सामावून घेतले गेले पाहिजे आणि त्यासाठीच “स्मार्ट कॅम्पस क्लाऊड नेटवर्क” हा महत्वाकांक्षी प्रकल्प २०१७ ला सुरू झाला, हा प्रोजेक्ट म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम (UNEP) चे माजी डायरेक्टर श्री. राजेंद्र शेंडे यांचे ब्रेन चाईल्ड होय. ते स्वतः आय आय टी मध्ये शिकले असल्याने त्यांना येथील विद्यार्थ्यांच्या क्षमतांची पुरेपूर जाणिव आहे. प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून अवघ्या पहिल्या सहा महिन्यांत या प्रोजेक्ट ने क्लाऊड टेक्नॉलॉजी वापरून “स्मार्ट सेन्स” नावाचा क्लाऊड डॅशबोर्ड बनवला, आणि तो सहभागी महाविद्यालये आणि विद्यापीठांना मोफत उपलब्ध करून दिला आहे.
या “स्मार्ट सेन्स” चा वापर करून महाविद्यालये आणि विद्यापीठे त्यांच्या कॅम्पस मधील पाणी आणि वीज यांची गरज आणि वापर याचे निरीक्षण करीत आहेत, तसेच अपारंपारिक ऊर्जेचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करत आहेत. तसेच आपल्या विद्यार्थ्याना या समस्यांवर कृतिशील प्रयोगातून उपाय शोधण्यासाठी उद्युक्त करीत आहेत. या मधून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला तर चालना मिळतेच पण त्याशिवाय त्यांच्या क्षमता आणि कौशल्यात कमालीची वाढ होत आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला आणि मोफत आहे. आपण देखील www.sccnhub.com या वेबसाईट वर नोंदणी करू शकता.
आपण जर विद्यार्थी असाल तर आपले वैयक्तिक नाव, किंवा आपण जर शिक्षक, प्राध्यापक किंवा प्रशासकीय अधिकारी असाल तर आपली शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांचे नाव नोंदवू शकता.
नुकतीच पॅरिस कराराची पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘स्मार्ट कॅम्पस क्लाऊड नेटवर्क’ यांनी एक व्हर्चुअल वेबिनार आयोजित केला होता, ज्यामध्ये भारतातील १२ विद्यापीठांतील कुलगुरूंनी आपला कॅम्पस शाश्वत करण्यासाठी ‘NOT ZERO-NET ZERO’ म्हणजेच शून्य कार्बन उत्सर्जन प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमाला युनेस्को [UNESCO] आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने [AICTE] साहाय्य केले आहे. ही प्रतिज्ञा www.sccnhub.com या वेबसाईट वर उपलब्ध आहे. अनेक शाळा, कॉलेज, विद्यापीठे ही प्रतिज्ञा घेण्यासाठी सरसावत आहेत. आता पर्यंत २०० पेक्षा जास्त शिक्षण संस्थांनी ही प्रतिज्ञा घेतली आहे.
स्मार्ट कॅम्पस क्लाऊड नेटवर्क (SCCN) हा तेर पॉलिसी सेंटर या संस्थेचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे, तेर पॉलिसी सेंटर ही डॉ. विनिता आपटे यांनी स्थापन केलेली पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहे, पुण्याजवळील वारजे, रायगड जिल्ह्यातील डोलवी, काराव येथे उजाड डोंगरमाथ्यावर संस्थेने मोठ्या कष्टाने वनराई फुलवली आहे. नुकतेच संस्थेच्या इको टुरिझम या संकल्पनेतून मुळशी येथे साकारलेल्या बॉटनीकल गार्डन चे उद्घाटन करण्यात आले. याच सोबत संस्था दरवर्षी पर्यावरणीय ऑलिम्पियाड स्पर्धा आयोजित करीत असते ज्यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी भारतभरातून सहभागी होत असतात. “स्मार्ट कॅम्पस क्लाऊड नेटवर्क” या उपक्रमाअंतर्गत शिक्षण क्षेत्र आणि शाश्वत विकासाची ध्येये यांच्यात दुवा साधण्यासाठी प्रयत्न करीत आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठे शाश्वत विकासाची ध्येये गाठण्यासाठी जगाला दिशा दाखवू शकतात आणि त्यांच्या सक्रिय योगदानाशिवाय पुढे जाणे अशक्य आहे. महाविद्यालयांनी आपल्या कॅम्पस मधे पर्यावरण संवर्धन उपक्रम राबवण्यापुरते मर्यादित न राहता जगासमोरील क्लायमेट चेंज चे आव्हानांवर मात करण्यासाठी उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना कृतिशील प्रयोगातून उद्युक्त करणे अपेक्षित आहे. या उपक्रमाला अनेक विद्यापीठांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला आहे, त्यांच्यासोबत तुम्ही देखील आपल्या कॅम्पस मधे हा प्रोजेक्ट सुरू करू शकता.
आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी, आणि आपल्या कॅम्पस ला स्मार्ट बनवण्यासाठी ‘स्मार्ट कॅम्पस क्लाऊड नेटवर्क’ आपल्याला आमंत्रित करीत आहे. आपल्याला या संदर्भातील अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर या उपक्रमाचे प्रोजेक्ट लीडर प्रा. विनायक साळुंखे, यांना संपर्क साधु शकता.
प्रा. विनायक साळुंखे [+91-8999779586]