इंदापूर येथील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे,कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री मा. हर्षवर्धनजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना व विध्यार्थी विकास मंडळ अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख आणि इंदापूर तालुका राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. प्रकाश पांढरमिसे यांचे “छत्रपती शिवाजी शिवराय व आजची तरुणाई ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जसा ढाल तलवारीचा आहे तसाच तो शौर्य, धैर्य, औदार्य, समता, न्याय, बंधुता, स्त्रीसन्मानाचा आणि समाज परिवर्तनाबरोबरच आत्मसन्मानाचा आहे.
राजा होण्यासाठी लढाया जिंकाव्याच लागतात परंतु लोककल्याणकारी जाणता राजा होण्यासाठी रयतेची पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घ्यावी लागते. ती छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती. स्वराज्यातील रयतेच्या बारीक सारीक गोष्टींची जाण भान त्यांना होती म्हणूनच त्यांना ‘जाणता राजा’ ही सर्वात मोठी बिरुदावली तत्कालीन रयतेने बहाल केली होती. जगतातील अनेक राष्ट्राला हेवा वाटावा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान व आदर्शवत असा इतिहास आहे. तो आजच्या तरुणाईला पावलोपावली प्रेरणा देत राहतो.
आजचा युवा वर्ग जोपर्यंत आतून पेटून उठत नाही तोपर्यंत वापरून घेणाऱ्यांचे उद्योग थांबतील असे आज तरी अजिबात वाटत नाही. आजच्या तरुणाईने शिवाजी महाराजांच्या आदर्शवत अशा जाजज्वल्या इतिहासातून प्रेरणा घेतली पाहिजे. तरुणाईने समाजाला आणि राष्ट्राला आदर्श वाटेल असे मानवतावादाचे कार्य हाती घेऊन वाटचाल केली पाहिजे. प्रत्येक घरा घरात शिवचरित्र असायला हवे. त्याचे पारायण प्रत्येकाने करायला हवे. शिवचरित्र हे दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंढ आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन, सर्वधर्मसमभाव, लोककल्याण कारिता, स्वातंत्र्य, समता,बंधुता, स्त्री सन्मान या तत्वांचा अंगीकार करते.ही तत्वे सखल मानवजातीला दिशादर्शक व मार्गदर्शक आहेत. आजच्या तरुणाईने याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या साजऱ्या करताना वाद्यांचा गजर करण्यापेक्षा विचारांचा जागर करायला हवा. ध्वनी प्रदूषण, होर्डिंग आणि बॅनरबाजी न करता महापुरुषांनी सांगितलेल्या आदर्शवत विचार संस्काराचा जागर केला पाहिजे. असे मौलिक व प्रेरणादायी विचार आजच्या तरुणाईला डॉ. पांढरमिसे यांनी आपल्या ओघवत्या व झंझावाती शैलीत मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शाखा प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र साळुंखे यांनी करून दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरोदे होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती 27 देशातील विद्यापीठात अभ्यासक्रम शिकवीला जातो. ही महाराष्ट्रासाठी सार्थ अभिमानाची गोष्ट आहे.आजच्या तरुणाईने नाकारत्मकतेला छेद देऊन सकारत्मक विचारांचा अंगीकार करून कृतिशील मार्ग अंगीकीरायला हवा. असे मौलिक विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विध्यार्थी विकास अधिकारी डॉ. तानाजी कसबे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे सर यांनी मानले.यावेळी कला शाखेचे प्रमुख डॉ. भिमाजी भोर, वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ. उंबरदंड, शारीरिक संचालक डॉ. भरत भुजबळ, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ. बाळासाहेब काळे. विविध विषयांचे विभाग प्रमुख, सहकारी प्राध्यापक, शिक्षेकेत्तर कर्मचारी व मोठया संख्येने विध्यार्थी उपस्थित होते.