आज ऑफिस ला जाताना वाटेत शेळ्यांचा कळप लागला, गाडीला इतक्या चिकटून चालत होत्या सगळ्या की मी चक्क गाडी बंद करून आसपासची काळी पांढरी मंडळी जरा लक्षपूर्वक बघायला लागले. ते तीन किंवा चार कळप असावेत, कारण चौघी बायका आणि चार कुत्री तो सगळा जामानिमा सांभाळत होत्या. खूपच ट्राफिक झाल्यावर मात्र त्यांनी वेगवेगळ्या आवाजात हाकारे टाकायला सुरवात केली आणि नेमक्या सगळ्या शेळ्या आपापल्या कळपाबरोबर मालकिणी आणि मैत्रिणी पाठोपाठ आवाज करत चालायला लागल्या. काही खोडकर शेळ्या मात्र खाण्यात मग्न राहाण्याच नाटक करून जायला तयार होईनात, त्या चौघींची हकार्याची पद्धत बदलली, नुसती हाक न राहता त्यातून राग डोकावायला लागला. मग मात्र त्या शेळ्यांचा नाईलाज झाला…तरीही एक पिल्लु कोवळा पाला सोडून जायला तयार होईना, मालकिणी बरोबरच त्याची आईही त्याला हाक मारायला लागली…दोन तीन हाका मारूनही जेव्हा ते बधल नाही तेव्हा आई नी पायाखालची माती सारून अंगावर जाण्याची तयारी दाखवली, शेवटी घाबरून ते पिल्लु आई जवळ जाऊन मानेखाली घासू लागलं..जस काही प्रेमानी ते आई ला sorry म्हणत होतं. सगळी मंडळी मार्गस्थ झाली, मला मुंग्याची रंग बघायला खूप आवडते, त्यांच्यातला communication channel किती strong असतो. चुकार पणा करत किंवा चुकून मागे राहिलेल्या मुंगीला तिच्या मैत्रिणी शोधून बरोबर घेऊन जातात तो सोहोळा बघण्य सारखा असतो. आज ह्या शेळ्या बघुन मला नेहेमी पडणारा प्रश्न मनात परत डोकावला..आपण ह्यांना मुकी जनावरं का म्हणतो ? शब्दानं शिवायची पण किती सक्षम भाषा आहे ह्या जीवांची, संवाद पूर्ण होणं हाच तर ultimate उदेश आहे ना भाषेचा. आणि प्राण्यांचा संवाद हा कदाचित फक्त शाब्दिक उच्चारांचा नाहीच त्यात स्पर्शही तितकाच महत्वाचा, बोलका आहे. माणसाचा संवाद किती सहज विसंवादाकडे वळतो, प्राणी जगतात असं missunderstandig होत असेल ? माणसात किमान २५% भांडणं sorry किंवा हे आधीच का नाही सांगितलस ? ह्या वाक्यावर संपतात. प्राणी कसं sorry म्हणत असतील ? एकमेकांचा रुसवा कसा काढत असतील ? आणि असतीलच तर शब्दांपलीकडची भांडण मिटवणारी ती अशी कोणती भाषा आहे जी अजून माणसाच्या हाती लागली नाहीये ?
गोल्डी घरात आल्याला आता १० वर्ष होतील, त्याचे हावभाव, चालीतला बदल, आवाजातील चढउतार किती बोलके असतात हे आता सवयीच झालय, आपण बोलतो त्याला त्याच्या meow च्या वेगवेगळ्या स्वरात येणारं उत्तरं हा संवाद नेहेमीचाच. मी अंघोळ घातली कि अमोल कडे जाऊन..बघ मला किती त्रास दिलाय तिनी अश्या खास तक्रारी पासून ते अवनी नी त्रास दिल्यावर येणारया नाराजीच्या सुरापर्यंत सगळे मूड्स, लाड, गरजा पुरवून घेऊ शकणारी सक्षम भाषा…ती ही एका शब्दाची फक्त सूर वेगळे आणि तरीही पुर्णत्वानी होणारा संवाद.
गिरीश राधिकाची चेरी ( labredor ) म्हणजे माझं अजून एक लाडकं पिल्लु…मी दिसले कि ती धावत येऊन गळ्यात पाय ठेऊन उभी रहायची, आधी तिच्याशी बोलायचं आणि मगच घरात शिरायचं असा नियम होता. तिच्या ऐवजी यशोधन शी बोललेलं तिला अजिबात चालायचं नाही. पण मी प्रेग्नंट असताना मात्र तिचे तेवर बदलले होते, खोडकर पणा जाऊन समंजस पणे प्रेमानी माझा हात चाटून पायावर डोकं आणि पाय रोवून बसलेली चेरी तिच्या परीनी मला सांभाळत होती. न बोलता फक्त प्रेमानी केलेला प्रेमाचा संवाद.
शब्द नाहीत म्हणूनच प्राण्यांमध्ये गैरसमज किंवा विसंवाद नाहीत का ? शब्दांचे अर्थ आणि अनर्थ फक्त आपण माणसचं काढतो का ? खरतर भाषा हे निसर्गानी माणसाला दिलेलं वरदान आहे . शब्दांनी नाती जपता फुलवता येतात तसाच भाषेचा जर अस्त्रासारखा वापर झाला तर मात्र कधीही न जुळणाऱ्या जखमा करता येतात, ते दुखावलेपण कधीच सरत नाही. आपली चूक नसताना तुटलेलं नातं जोडून बघितलं आहे कधी ? त्या मोलाच्या क्षणी संवाद ह्या शब्दाची खरी किंमत कळते !!
विविध continents मध्ये विखुरलेल्या clients शी बोलायची सोय म्हणून skype शी दोस्ती होऊन आता १० वर्ष झाली, digital संवादाची official communication मध्ये सवय होऊन एक तप उलटलय. technology नी सगळं जग जवळ आलय, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या माणसाशी काही सेकंदात संवाद साधता येतो. लाडक्या मैत्रिणीच आलेलं good morning, मित्रानी “ काय मैत्रीण कशी आहेस ? “ म्हणून अचानक केलेला मेसेज, अनपेक्षित पणे आलेला एखादा फोन, आवडत्या माणसाचा साधा hello सुद्धा एका क्षणात मूड बदलून टाकू शकतो…परवा gym मध्ये रोज भेटणारे काका कोपऱ्यात जाऊन फोन वर बोलत होते, परत trademill आले तेव्हा चेहेरा फुललेला होता, मी पण बघुन हसले तर त्यांनी सांगितलं, माझ्या शाळेतली मैत्रीण आली आहे अमेरिकेहून, तिनी आम्हाला सगळ्यांना उद्या चहासाठी बोलावलं आहे. आम्ही सगळे फासिबूक मुळे ४५ वर्षांनी भेटलो आता रोज whats app वर गप्पा मारतो, मजा येते, तेव्हा मुलींशी बोलायची चोरी होती आता मात्र मस्त मैत्री आहे आमची. चला एक संध्याकाळ छान जाणार ! मैत्रीण भेटणार म्हंटल्यावर ६५ वर्षाच्या काकांच्या चेहेर्यावर १६ वर्षाच्या मुलाचे भाव आले होते, तोच उत्साह होता आवाजात. इतका वेळ पडेल चेहेरा करून trademill वर चालणारे काका चक्क पाळायला लागले….जादू…जादूच झाली होती….किती प्रचंड ताकद आहे ना संवादात ?
आणि तरीही कधी कधी digital संवादाची मला भीती वाटते, माझ्या शब्दामागची भावना समोरच्या माणसाला कळलीच नाही तर ? शब्दातून माणूस समजतो, पण माणूस फार ओळखीचा नसेल तर त्याच्या भाषेवरून, त्याच्या शब्दांवरून आपण त्याला समजून घेतो, निदान प्रयत्न करतो, खूप घट्ट नातं असेल तर शब्दात जादू उतरते पण अनोळखी किंवा नवीन माणसाशी degital संवाद हे किती मोठ्ठ मृगजळ आहे !
सतत connected असणं खूप सवयीचं झालाय ना आता ? हे चांगलं कि वाईट ? माझ्या आजी आणि आजोबाना मी कधीच फारश्या गप्पा मारताना बघितलं नाहीये, त्यांच्या संवादाच्या कल्पना तरी नक्की काय होत्या ? फोन / निरोप आला नाही म्हणजे सगळं आलबेल आहे इतका साधा विश्वास. मी लहान असताना बाबा जेव्हा germany ला गेला तेव्हा तो सुखरूप पोहेचाला हे आम्हाला ४ दिवसांनी समजलं, तो once a week आई ला पत्र लिहायचा तेवढीच खुशाली. आता मी भारता बाहेर जाते तेव्हा बोर्ड केलं, land झाले इथपासून मेसेज ची सुरवात होते. ३ / ४ दिवस not connected status नंतर अमोल जेव्हा जंगलातून परत येतो तेव्हा आमच्या आवडीच्या coffee shop मध्ये जाऊन गप्पा ठोकून आल्या शिवाय तो परत आल्याची जाणीव होत नाही. असं बोलून मोकळं होणं ही पण गरज असते..अश्या मोकळ्या गप्पांनंतरची मनाची शांतता ही अनुभवण्याची गोष्ट आहे !!
रोजच्या office routine मध्ये phone / skype वर अखंड बोलण ह्यातच बराच वेळ जातो आणि तरीही कायमचे लक्षात राहिलेले संवाद खूपच मजेशीर आहेत. त्यातलाच हा एक…आणि तो ही निर्जीव वस्तू बरोबरचा….
माझी पहिली गाडी Peugeot 309, अगदी १८व्या वर्षी हातात आलेली कोरी कोरी पंढरी शुभ्र गाडी…माझा अपार जीव होता तिच्यावर. कॉलेज च्या group ची खडकवासला ट्रीप, पहिल्यांदाच पुणे ठाणे drive करत एकटीनी केलेला प्रवास, मैत्रिणी बरोबरचे long drive अश्या खूप आठवणी आहेत माझ्या आणि तिच्या. पण गाडीच ते मॉडेल बंद पडल्यावर बाबांनी गाडी विकायचा निर्णय घेतला. मी हिरमुसले, नवीन आलेली लाल लाल esteem सुद्धा माझं मन रमवु शकली नाही. पण माझ्या एका मित्रानी ती गाडी घ्यायचं ठरवलं आणि थोडा दिलासा मिळाला, निदान ती कधीतरी दिसेल तरी…ज्या दिवशी मित्र गाडी न्यायला येणार होता त्या दिवशी मी स्वतः तिला धुतली पुसली, गुलाबाची फुलं ठेवली आणि एकटी लोणावळ्या पर्यंत जाऊन आले…परत आले तो मित्र आलेलाच होता…तशीच चावी त्याच्या हातात दिली आणि रडून लालेलाल झालेले डोळे नाक पुसत त्याला सांगितलं हिला नीट सांभाळ ह ! तो गाडीत बसला तर माझी पट्ठी चालूच होईना…अनेकदा starter मारून पण काहीच घडेना, मला वेड लागायचं बाकी होतं. बरं मित्र स्वतः पुण्यातल्या एका famous garage चा मालक, त्याच्या बरोबर त्याच्या कडचा सगळ्यात निष्णात mechanic, सगळी गाडी तपासून झाली, काहीच सापडेना, तासामागून तास उलटले….शेवटी मित्र मला म्हणाला.. “ ऋजुता तुझा जीव अडकला आहे हिच्यात तो काढून घे, तरच ती माझ्याकडे येईल. मी जातो अत्ता, संध्याकाळी तूच चालवत तिला माझ्या कडे आणून दे “ !! मी सुन्न झाले…काय करू आता ? बाबा पुण्याच्या बाहेर…गाडी सुरु झाली नाही आणि मित्राकडे गेली नाही तर नक्की बाबा ओरडणार…शेवटी काही तासांनी परत खाली आले..driving seat वर बसुन एखाद्या मैत्रिणीशी बोलावं तस तिच्याशी बोलले, खूप मनापसून, आतून…तू जिथे जाते आहेस तिथेही तुला इतकंच प्रेम मिळेल, माझ्या हक्काचं घर आहे ते पण, मी भेटायला येईन तुला सारखी सारखी, नको अशी वागुस, माझं प्रेम कायम असेल तुझ्यावर पण गुंतलेला जीव मात्र काढून घेउदे…आणि हळूच starter मारला तर पट्ठी चालु झाली की !! …जसं काही मी बोललेला शब्द न शब्द तिला समजला होता. मित्राकडे तीला सोडून परत आले तरी तिच्या बरोबरची शेवटची काही मिनिट कायमची मनात साठवली गेली. एक वेडा, खुळा योगायोग असेल कदाचित पण तिनी मला एक गोष्ट शिकवली…मनापासून जीव ओतून एखादी गोष्ट सांगायची ठरवली तर समोरच्याला ती नक्कीच पटू शकते, ती स्पंदनं त्या वस्तुत, माणसात पोहोचतात.
वेळ ही सध्या आपल्या कोणाकडेच नसलेली, सगळ्यात दुर्मिळ गोष्ट…वेळ सोडून काहीही माग…कित्ती सहज बोलून जातो आपण…जिथे बोलायलाच वेळ नाही तिथे रुसवा, राग, प्रेम ह्या सारख्या भावना व्यक्त करायला वेळ कुठून आणायचा ? खरतर दिवसभरातील काही मिनिटांचा वेळही पुरेसा असतो जर ते शब्द, तो संवाद मनापासून असेल तर. पण त्यातून भावनाच काढून घेतल्या तर त्यात आत्माच शिल्लक उरत नाही…मग मागे उरतो नातं तनुमनु टिकवण्या इतका फक्त गरजे पुरता संवाद. कोणत्याही नात्यातला, दोन माणसांमधला दुवा आहे संवाद, तोच बंद झाला तर नातं संपायला वेळ लागत नाही. त्यापेक्षा भावना व्यक्त करत जर संवाद जपला तर नाती फुलतील, बहरतील आणि शेवट पर्यंत टिकतीलही.
–ऋजुता