“अखेरचं व्याख्यान” ही एक वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानमाला आहे. या मालिकेत व्याख्यान देणार्या प्राध्यापकाने आपली आयुष्याची संध्याकाळ झाली आहे असे समजायचे व आपल्या अनुभवांची बौद्धिक संपत्ती श्रोत्यांपुढे म्हणजे पुढच्या पिढीसाठी मांडायची.यामागील हेतू असा की श्रोतावर्ग अंतर्मुख होतो व आपल्यावर अशी वेळ आली तर आपण पुढच्या पिढीसाठी काय ठेवून जाणार आहोत अशा विचारात राहतो. खरेच या व्याख्यान मालिकेचा हेतु किती अभ्यासपूर्ण आहे.
प्रा. रँडी पॉश है कर्निगी मेलान विद्यापीठात कम्प्युटर शास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांना अनेक सन्मान मिळाले होते. तसेच त्यांचे संशोधन कार्य ही महान होते. “अखेरचं व्याख्यान” या व्याख्यान मालिकेत सप्टेंबर 2007 मध्ये त्यांना आमंत्रित केले होते व त्यांनी ते आमंत्रण स्वीकारले होते. आमंत्रण स्वीकारल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या कॅन्सरचे निदान झाले. हा आजार अखेरच्या टप्प्यातील होता. त्यांच्याजवळ फारच कमी वेळ होता. अशावेळी सहाजिकच आता त्यांनी आपल्याला वेळ द्यावा अशी कुटुंबीयांकडून (पत्नी कडून )अपेक्षा होती.
प्राध्यापक रँडी यांचे वय अवघे 46 वर्ष होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी जे व तीन लहान मुले मोठा डिलन (वय पाच वर्ष) दुसरा लोगन (वय दोन वर्षे) व सर्वात लहान मुलगी क्लोई (वय अठरा महिने). आता आपण आपल्या मुलांसोबत जास्त काळ राहू शकणार नाही अशी खंत अर्थातच प्रा. रँडी यांना दुखावत होती. त्यावेळेस त्यांनी ठरविले की मी माझ्या व्याख्यानातून “मी मुलांना काय शिकवावे?” हे त्यांच्यासाठी मांडेल कारण आज त्यांची वयं लहान असल्यामुळे आज मी त्यांना काही सांगू शकत नाही. तसेच माझ्या मुलांना आपले वडील कसे होते, त्यांचे आचार विचार कसे होते हे समजेल. आपल्या अनुभवांची शिदोरी मुलांपर्यंत पोहोचविणे हा एक हेतू होता. त्यामुळे अतिशय कमी वेळ, असंख्य अडचणी असूनही प्रा. रँडी यांनी व्याख्यानाची तयारी केली.
हे व्याख्यान म्हणजे प्रा.रॅडी यांनी आयुष्यात जगलेल्या व जपलेल्या मुल्यांचा तसेच संकटावर मात करणाऱ्या धडाडी वृत्तीचा सुरेख संगम आहे. या पुस्तकात त्यांचे बालपणापासूनचे अनुभव प्रसंग अगदी प्रगल्भतेने मांडले आहेत की वाचताना ते अनुभविण्यास मिळतात. या पुस्तकातून/ अखेरच्या व्याख्यानातून त्यांनी अनेक अनमोल विचार मांडले आहेत.
प्रा. रँडी यांचे विचार:-
** मुलांना त्यांच्या आई-वडिलांचे त्यांच्यावर खूप खूप प्रेम होतं हे समजायला हवे. ती त्यांच्यासाठी सर्वात मोलाची आणि अभिमानाची आठवण असते. परंतु त्यासाठी आई वडील हयात असण्याची गरज नसते.
** मुलांना स्वप्न बघू देत. त्यांना स्वप्नपूर्ती करण्यासाठी अडवू नका, प्रोत्साहन द्या उदा. मुलांना घराच्या भिंती त्यांच्या कल्पनेप्रमाणे रंगवायच्या असतील तर तसे करू देत. त्यामुळे घराची किंमत कमी होईल असा विचार करू नका.
** उद्याना मधे पाटी असते “उद्यान रात्री आठ पर्यंत उघडे आहे” या पाटीचा प्रा. रँडी यांनी अगदी सकारात्मक अर्थ घेतात. आपलं उरल-सुरल आयुष्यही आनंदात जगायला हवे. उद्यान उघड आहे तोवर त्याचा आनंद उपभोगायला शिकले पाहिजे.
** लहान मुलांच्या आवडी समजून घ्यायला हव्यात व त्या पूर्ण कराव्यात. त्यातूनच ते त्यांच्या आयुष्याला त्यांना हवा तसा आणि खरा आकार देतील. कोणत्याही लहान-मोठ्या किंवा किंमती निर्जीव वस्तूंना अवाजवी महत्त्व देऊ नये. त्या वस्तूंपेक्षा जीवअधिक मोलाचा असतो. त्यावरून लहान मुलांना सतत सूचना देणे किंवा रागवणे योग्य नाही.
** बऱ्याच वेळा कठीण समय येता आपले आई-वडीलच आपल्या कामी येतात.
** प्रा. रँडी नेहमी व्यवहारी दृष्टिकोण मांडतात उदा. गाडीला स्क्रॅचेस पडले असता ते म्हणतात- गाडीचे दिसणे बिघडले, चालणे नाही, मग वापरुयात आहे तशीच. त्यांच्या मते प्रत्येक गोष्टीला दुरुस्तीची (निदानपक्षी सामाजिक प्रतिष्ठेसाठी) गरज नसते.
** आयुष्यात अनेक दिव्यातून जात असताना “हे ठीक नाही” असे नकारार्थी उद्गार काढू नयेत. उलटपक्षी आपल्या कृतीतून दाखवून द्यावे, कितीही नकारात्मक परिस्थिती असल्यास तिला झुंज द्यावी परिणाम सकारात्मक, होकारार्थी होऊ शकतो.
** दुःख पचवणे सवयीने जमून जाते परंतु आनंद आणि मोठेपणा पचवणे कठीण असते. आयुष्यामध्ये विनयाचे व साधेपणाचे सामर्थ्य खूप मोठे आहे. असे विचार ते आपल्या वडिलांबद्दल मांडतात.
** प्रामाणिकपणा हा गुण आपल्या आयुष्यात खूप उपयोगी पडतो.
** पैशा प्रमाणे वेळ सुद्धा काळजीपूर्वक आणि योग्य प्रकारे वापरला पाहिजे.
** तुमच्याजवळ अन्य काही योजना असेल तर पहिली योजना जरूर बाजूला ठेवा.
**काम करताना साऱ्या गोष्टी योजनापूर्वक व्हाव्यात म्हणून त्या गोष्टींची यादी करावी.
** आपण आपला वेळ योग्य प्रकारे कामी लावतो की नाही हे स्वतःलाच विचारा.
** दूरध्वनीवर आपला किती वेळ जातो हे पाहावे व नियंत्रण ठेवावे
** काही काम किंवा जबाबदाऱ्या इतरांवर सोपविणे त्यातूनही खूप वेळ वाचविता येतो.
**खऱ्या अर्थाने सुट्टी घेण किंवा मोकळा वेळ मिळवणही फार महत्त्वाचे असते.
** तुमच्या स्वतःच्या मालकीचे जर काही असेल तर फक्त “वेळ”असतो. तो नीट वापरायला हवा. काय सांगावं एखाद्या दिवशी तुम्हाला कळते की तुमच्यासाठी फार थोडा वेळ राहिला आहे. अधिक “वेळ”देणे “काळ” मानीत नाही.
** शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाचं “विद्यार्थ्याला कसं शिकावं हे शिकण्यासाठी मदत करणे” हे प्रथम ध्येय आहे. ही संकल्पना मान्य झालेली आहे परंतु प्रा. रँडी यांच्या मते विद्यार्थ्यांना स्वतःशी संवाद करायला, स्वतःमध्ये डोकावून बघायला, स्वतःला वाचायला शिकविणे हे शिक्षण तज्ञाचे अंतिम ध्येय असायला हवे. विद्यार्थ्यांना स्वतःचे मूल्यमापन करायला शिकवा.
** बालपणापासून उराशी बाळगलेले आपलं स्वप्न साकार करण्यात आनंद असतोच परंतु तुम्ही वयाने मोठे होता तेव्हा दुसऱ्याची स्वप्न साकार करण्यास मदत करण्यात फार मोठा आनंद असतो.
** मुलांना स्वप्न बघण्याची परवानगी द्या. मुलाबाळांच्या,तरुणांच्या स्वप्नांना खत पाणी देऊन जपा आणि वाढवा. त्यासाठी त्यांना कष्ट उपसावे लागले किंवा झोपायला जायला उशीर झाला तरी काळजी करण्याचे काहीच कारण नाही.
** दिखाऊपणा पेक्षा सच्चेपणा अधिक मोलाचा असतो, त्याचा उगम हृदयाच्या गाभार्यातुन होतो. दिखाऊपणा समोरच्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी आणि वरवरचा असतो.
** आयुष्यभर नुसते समस्यांविषयी तक्रार करू नये. तसे करून समस्यांवर तोडगा निघत नाही. तक्रार करण्यातच बरीच शक्ती खर्च होते. त्याऐवजी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा.
** इलाज नेहमी रोगावर हवा लक्षणांवर नको.
** आपल्याविषयी लोक काय विचार करतात याविषयी चिंता किंवा विचार बाजूला सारला तर आपल्या कामात आपण 33% अधिक यशस्वी होतो.
** लोकांबरोबर एकत्रितपणे काम करता येणे अतिशय महत्त्वाचे आणि गरजेचे असते.
** लोकांमधील सर्वोत्कृष्ट गोष्टी बघायला हव्यात. त्यासाठी गरज असते ती म्हणजे स्वस्थपणे थांबण्याची, धिराची, दुसऱ्यातील “चांगलं” बाहेर येईपर्यंत वाट बघण्याची.
* शब्दांपेक्षा कृती अधिक बोलकी असते असा उद्देश प्रा. रँडी यांनी विशेष करून तरुण स्त्रियांना देतात. * तुम्ही ज्यासाठी धडपडता ते तुम्हाला प्राप्त होत नाही त्यालाच “अनुभव” म्हणतात. ह्या अपयशावर उभा असलेला अनुभव व्यवहारात अधिक उपयुक्त ठरतो.
** कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आनंददायी असते.
** यशासाठी सुखासाठी अपार कष्ट गरजेचे असतात.
** जेव्हा तुम्ही कोणत्याही अडचणीत किंवा संकटात सापडतात त्यावेळी तुमच्या हाताशी जे काही असेल त्यावर संकटाशी मार करता येऊ शकते . त्यामुळे नेहमी तयारीत राहा उदा. काही पैसे किंवा आवश्यक असे सामान जवळ असावे.
** नेहमी खरे बोलावे तुमचे शब्द तुमचे व्यक्तिमत्व असते. खरे बोलण्याने वेळ आणि कष्ट वाचतात.
** अडचणी कोणालाही सुटत नाहीत. त्यांच्यामागे निश्चित असे कारण असते. ती कसोटी ची वेळ असते. त्यावर मात करण्याचा प्रयत्न तुम्हाला अधिक बलवान करतो. तसेच तुमचे अनुभव इतरांना धीर देण्यास,संकटा बरोबर सामना देण्याचे शिकवितात म्हणून स्वतःच्या अपयशाची कहाणी दुसऱ्यांना सांगायला लाजू नका.
** हक्का बरोबर जबाबदारीची जाणीव ठेवा.
** “एकमेका साहाय्य करू” या उक्तीनुसार आपण लोकांशी संबंधित असतो तेव्हा अधिक चांगले असतो.
** मनात असतील ते प्रश्न विचारा…. विचारून पहा…विश्वास ठेवा तुमचे काम होऊ शकते.
** प्राध्यापक या नात्याने मी अनेक विद्यार्थी पाहिलेत.विद्यार्थ्यांवर आई-वडिलांचा जबरदस्त पगडा दिसतो.आई-वडिलांचे न जाणता केलेले वक्तव्य मुलांना भलत्याच दिशेला घेऊन जाते.मुलांवर आई-वडिलांचे स्वप्ने लादली जातात. परिणामी मुलांची आयुष्ये ती स्वप्नं न पेलल्यामुळे उद्वस्त होतात,अपयशी आयुष्य येते.आयुष्य हे मुलांचे आहे, आईवडिलांनी फक्त योग्य ते मार्गदर्शन करावे.
“अखेरचं व्याख्यान” या व्याख्यानात प्राध्यापक यांनी आयुष्य कसे जगावे हे अतिशय सुंदर रित्या त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगावरून अनुभवावरून कथन केले आहे. आयुष्यातील विविध अनुभवांवरून त्यांनी जीवनात अतिशय उपयुक्त असे साधे व सोपे संदेश मांडले आहेत. पुस्तक वाचताना आपण वाचनामध्ये पूर्ण रमतो. मला हे पुस्तक फार आवडले.विशेष करून शालेय मुला-मुलींनी व तरुणांनी हे पुस्तक नक्कीच वाचावे.
पुस्तक परिचय :- प्रा. डॉ. राधिका सोमवंशी.
विभाग प्रमुख गणित व संख्याशास्त्र विभाग,
नूतन मराठा कॉलेज
जळगाव ( सेवानिवृत्त)