आधी आपण आणि मग आपला स्वभाव( Nature) घडतो. स्वभावाला अनुरूप असे आपले वागणे(Behavior)आणि त्यानंतर आपल्या सवयी(Habits)घडतात. आपला स्वभाव हा काही अंशी अंगभूत आणि काही अंशी कौटुंबिक असतो.आपले वागणे हे काही अंशी अंगभूत तर काही अंशी सामाजिक असते. तर आपल्या सवयी ह्या संपूर्ण सामाजिक असतात. तुमचा स्वभाव, तुमचे वागणे आणि तुमच्या सवयी ह्या अचानक तयार न होता काळाच्या ओघात तयार होतात. तुमच्या आजूबाजूची एकंदर परिस्थिती आणि तुम्हाला आलेले अनुभव यांचा प्रभाव आणि परिणाम यावर होत असतो. कौटुंबिक आणि सामाजिक जीवन पूर्णत्वाकडे घेवून जात असतांना तुमचा स्वभाव, तुमचे वागणे आणि तुमच्या सवयी ह्या लक्षणीय स्वरूपाचा प्रभाव दाखवतात. एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनण्यासाठी ह्या तिन्ही बाबींवर जाणीव पूर्वक काम करणे आवश्यक आणि अगत्याचे ठरते.
आपला स्वभाव बाबत बोलायचे झाल्यास अनेक प्राचीन वाड्मयात स्वभाव हा शब्द अनेक वेळा येतो. प्राचीन भारतीय आयुर्वेद मधील सुश्रुत संहिता हा महत्वाचा ग्रंथ होय. या ग्रंथात त्याचे रचिते आचार्य सुश्रुत मानवी स्वभाव बाबत म्हणतात की, स्वभावं ईश्वरं कालं यदृच्छा नियती तथा। परिणामंच मन्यन्ते प्रकृतिं पृथुदर्शिनः॥. भगवदगीता हा तत्वज्ञानविषयक भारतीयग्रंथ असून या गीतेच्या दोन श्लोकात मानवी स्वभाव बाबत विवेंचन आढळते. त्यातील श्लोक असे सांगतो की, स्वभावं न जहात्येव साधुरापद्गतोऽपि सन्। कर्पूर: पावकस्पॄष्ट: सौरभं लभतेतराम् ॥ याचा स्वैर मराठी अर्थ असा की चांगला आणि सद्गुणी मनुष्य आपला स्वभाव, कितीही विपरीत आणि प्रतिकूल परिस्थिति आली तरी सोडत नाही. ज्या प्रमाणे कापुराला अग्नीचा स्पर्श झाल्याने तो अधिक सुहास आणि प्रफुल्य निर्माण करतो अगदी हे तसेच असते. दूसरा संत तुकाराम आपल्या गाथेत स्वभाव बाबत सांगतात की, आसुरी स्वभाव निर्दय अंतर। मानसीं निष्ठ अतिवादी ॥१॥याति कुळ येथें असे अप्रमाण। गुणाचें कारण असे अंगीं ॥ध्रु.॥ या ओवीत जगतगुरू असे सांगतात की एखादा मनुष्य राक्षसी स्वभावाचा, निर्दयी असा आहे तो किती श्रेष्ट उच्च कुलातील असला तरी व्यर्थ कारण कुलापेक्षा गुणांना जास्त महत्त्व आहे.
स्वभाव आणि प्रकृती हे जरी भिन्न संकल्पना असल्या तरी त्याच्यात परस्पर सहसंबंध नक्कीच असतो. आयुर्वेद मध्ये पित प्रकृती, वात प्रकृती आणि कफ प्रकृती किंवा दोष या बाबत विवेचन दिले आहे. याला दोष असे संबोधले आहे, कारण याचे प्रमाण वाढले तर तुमच्या प्रकृती मध्ये दोष दिसून येतात. साहजिकच हे दोष तुमच्या स्वभावाला पूरक ठरतात. जर तुम्ही पित्त प्रवृतीचे असाल तर तुम्ही शांत आणि संयमी राहता. वात प्रवृत्ती असेल तर असे लोक चिडखोर बनतात. आणि जर तुम्ही कफ प्रवृतीचे असालतर तुम्ही धीरगंभीर असे बनता. साहजिकच तुमचा स्वभाव म्हणजे तुमच्या व्यक्तीमत्वाचा आरसा असतो. तुमच्या स्वभाव वरच तुमचे अंतरवैयक्तिक संबंध अवलंबून असतात. जेवढा तुमचा स्वभाव सर्वसमावेशक तेवढे तुम्ही इतरांना हवे असतात. चांगला स्वभाव तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला करून देतो. वाईट स्वभाव हा तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करतो. आपल्या आजूबाजूला चार प्रकारच्या स्वभावाची लोक दिसून येतात. यात आशावादी, चिडखोर, निरुत्साही आणि उदासीन असे वर्गीकरण मांडता येते. हे वर्गीकरण अगदी ढोबळ मानाने असले तरी त्यातून बर्याणपैकी स्वभावांचा अर्थबोध होतो. आशावादी लोक की जे आपल्या आयुष्यात खूप शांतपणे आणि सकारात्मक रीतीने पुढे जात असतात. ते सहसा अडचणी आणि संकटे आली तर डगमगत नाहीत. संकटावर मात करण्याची अंगभूत शक्ती त्यांच्या मध्ये असते. चिडखोर लोक की जे अगदी लहान सहान गोष्टीवरून आकांडतांडव करत असतात. असे लोक त्यांचे इतरांशी असणारे संबध वेळोवेळी बिघडवत असतात. असे लोकांच्या जवळपास कोणी शक्यतो थांबत नाही. असे लोक प्रगती करत असतील परंतु त्यांच्या प्रगतीचे फायदे शक्यतो जनसामान्य यांचे पर्यंत झिरपत नाहीत. निरुत्साही लोक की जे कधीच उत्साही व आनंदी नसतात. कायम रडगाणे गात राहणे आणि आला तो दिवस पुढे ढकलणे एवढेच काम हे करत असतात. इतरांचा उत्साह सुद्धा कमी करण्यात हे महत्वाची भूमिका बजावतात. उदासीन लोक की जे कोणत्याही कामात पुढाकार घेत नाहीत आणि नावीन्यपूर्ण काहीच करत नाहीत. जगात सर्वत्र दुख पसरलेले आहे. या जगत चांगले काहीच घडत नाही. अशी यांची धारणा असते. ते सर्व प्रकारच्या भावना एकाच प्रकारे प्रदर्शित करतात. विनोद झाला तर ते हसत नाहीत. आणि दुख प्रसंग आला तर ते शांत राहतात. यांच्यात उदासिनता एवढं ठासून भरलेली असते की त्यांचा हा स्वभाव हाच त्यांच्यासाठी अडथळा ठरतो.
स्वभावाला औषध नाही, अशी म्हण प्रचलित आहे. तसेच भगवदगीता मधील एक श्लोक असे सांगतो की, य:स्वभावो हि यस्यास्ति स नित्यं दुरतिक्रम: श्वा यदि क्रियते राजा तत् किं नाश्नात्युपानहम् ॥ याचा स्वैर मराठी अर्थ असा की मनुष्य प्राणी हा आपला मूळ स्वभाव कधीही बदलत नाही. एखानद्या कुत्र्याला जरी राजा बनवले तरी तो त्याची चावण्याची वृत्ती सोडत नाही. असे असले तरी आपल्या स्वभावाची वेळोवेळी चिकित्सा होणे आवश्यक आहे. आपल्याला बदल नको असतो त्यामुळे आपण बदलायला तयार होत नाहीत. कारण आपण बदल केला तर आपल्याला लोक सहजपणे स्वीकारणार नाहीत, अशी अनामिक भीती त्यांच्या ठायी असते. त्यामुळे स्वभाव बदलायला सहजा सहजी कोणी तयार होत नाही. मात्र स्वभावाची चिकित्सा होणे हे खूप महत्वाचे ठरते. याबाबत शंका नाही की, स्वभाव तात्काळ बदलता येत नाहीत. तरी स्वभावाच्या अनुषंगाने होणारे परिणाम व नुकसान कमी करण्यावर आपण भर दिला पाहिजे. बर्यायच वेळा आपला स्वभाव कोणत्या प्रकारचा आहे, हे आपल्याला माहितच नसते किंवा तो आपण जाणीवपूर्वक माहिती करून घेत नाहीत. त्यामुळे आपण इतरांना दोष देत राहतो. मी कधीच चुकत नाही. मी नेहमीच बरोबर असतो. याला स्वभावाची आत्मघातकी आत्महत्या म्हणतात. आपला स्वभाव जर विचित्र असेल तर आपल्या जवळचे आपले मित्र आपल्या पासून हळू हळू दूर जातात. तुम्ही समोरून येत असाल तर ते रस्ता बदलतात आणि आपण उपरोधिकपणे त्यांना खूप शहाणे झाले असे म्हणतो. वास्तविक तुम्ही अति शहाणे झाल्याने ते शहाणे झालेले असतात हे लक्षात घ्यावे. विचित्र म्हणजे काय तर सामाजिक संयोजन करता न येणे होय. समाजशील प्राणी असल्याने आपल्याला समाजाचा एक घटक म्हणून समाजात वावरावे आणि कार्य करावे लागते. मात्र अशी समाजशीलता लोप पावली की, सामाजिक अभिसरण पासून आपण दूर फेकलो जातो. दुसर्या्च्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, एकंदर हे असे आहे.
आपले वागणे म्हणजे एखानद्या घटनेला आपण कशा प्रकारे आपण प्रतिसाद देतो हे होय. तसेच आपली इतरांच्या बाबत कृती आणि व्यवहार कसा आहे, याला पण आपण वागणे म्हणतो. वागणे हे सुद्धा स्वभाव प्रमाणे एकाकी तयार होत नाही. तर ते विविध सामाजिक क्रिया कल्प आणि प्रक्रिया मधून तयार होते. तुम्ही बाहेरच्या वातावरणात कसे समरस होता त्यावर तुमचे वागणे तयार होते. तुमचे कुटुंब सोबत वागणे आणि तुमचे कामाच्या ठिकाणी वागण्याच्या पद्धती वरून एकूण चार प्रकारच्या व्यक्ती दिसून येतात. यात सहनशील, खंबीर, सावध आणि आक्रमक या प्रकारचे लोक येतात. सहनशीलता हा एक गुणविशेष असून सहनशील व्यक्तीवर कितीही अन्याय, आरोप आणि प्रत्यारोप आणि चिखलफेक झाली तरी ते सहनशीलतेने सहन करतात आणि पुढे मार्गक्रमण करतात. सहनशीलता ही अनुभवातून आणि प्रतिकूल परिस्थिति मधून तयार होते. सहनशील व्यक्ती जास्त वाद उत्पन्न करत नाही. एक तर तो सोडून देतो किंवा समजावून सांगतो. खंबीरता ही माणसाला ताकतवान बनवते. खंबीर असले की यश अपयश सुख दुख चांगले वाईट याचा जास्त परिणाम होत नाही. खंबीर व्यक्ती ह्या अडचणीच्या काळात आणि संकटाच्या काळात खंबीरपणे उभ्या राहतात, अडचणींवर आणि संकटावर मात करतात. सावध व्यक्ती ह्या कायम दक्ष असतात आणि त्या अखंड सावधानता ठेवून कामकाज करतात. सावध व्यक्ती ह्या कोणतेही गोष्ट ही सर्व बाजूंनी विचार करून करतात. त्यांच्या निर्णयाचे काय परिणाम व दुष्परिणाम होतील याबाबत ते दक्ष असतात. आपल्या वैयक्तिक निर्णयाची जबाबदारी घेण्यात ते डगमगत नाहीत. या व्यक्तीमध्ये उत्तरदायित्वाची भावना असते. आक्रमक व्यक्ती हा कोणत्याही कामात आणि कार्यात अत्यंत आक्रमक असतात आणि ते सर्वांवर प्रभाव टाकतात. जरी आक्रमकता काम तडीस घेवून जाण्यात आवश्यक असली तरी त्या मुळे बर्यााच वेळा संबध दुखवतात. आपण सहनशील असावे मात्र संकटाचा सामना आपण खंबीरपणाने करायला हवा. आपण आक्रमक असावे मात्र ही आक्रमकता ही सत्याची कास धरणारी, दुर्बलांना मदत करणारी आणि सावधपणाची किनार असलेली असावी.
आपले वागणे हे आपल्या व्यक्तीमत्व वर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकत असतात. आपले वागणे हे विवेकपूर्ण आणि विनयशील असले की लोक तुम्हाला स्विकारतात. तुमचे वागणे हे तुमच्या व्यक्तीमत्व विकासमध्ये खूप महत्वाचे ठरते. जेवढे तुमचे वागणे चांगले तेवढे तुमचे संबध दृढ होण्यास मदत होते. संबध दृढ झाले की तुमच्या कामातील अडथळे आणि समस्या दूर होवून तुमची प्रगती आणि विकास हा सुसह्य होतो. तुमचे वागणे हे इतरांना उत्साह आणि प्रेरणा देणारे असायला हवे. तुमच्या वागण्यात आत्मविश्वास असायला हवा, तो असला की कामे आणि कार्ये ही कमी वेळेत पूर्ण होतात आणि तुम्हाला ऊर्जा प्राप्त होते. ही ऊर्जा इतर अनेक सामाजिक कामकाजासाठी वापरुन तुम्ही अधिक उत्साहपूर्ण आणि यशस्वी आयुष्य जगण्याकडे मार्गक्रमण करता.
तुमच्या सवयी म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही सहजपणे करता ज्या गोष्टी तुमच्या अगदी अंगवळणी पडलेल्या असतात आणि त्या थांबवणे अथवा त्यातून बाहेर पडणे थोडे अवघड झालेले असते. सवयी म्हणजे काय तर एका ठराविक बाब आणि गोष्ट याचेकडे तुमचे होणारे आकर्षण होय. सवय असावी मात्र तिचा अतिरेक नसावा. सवयीचे दोन प्रकार असतात. एक चांगल्या सवयी आणि वाईट सवयी.चांगल्या सवयी ह्या आपले व्यक्तीमत्व अजून खुलवतात आणि आपल्याला सकारात्मकता देवून आपल्याला यशाकडे घेवून जातात. वाईट सवयी आपल्याला मागे ओढतात आणि आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण करतात. चांगल्या सवयीमुळे लोक आपल्या जवळ येवून आपल्याला मदत करतात. वाईट सवयी मुळे आपल्या जवळचे लोक दूर जातात आणि आपल्याला त्यांची वेळेवर मदत मिळत नाही. चांगल्या सवयी आपण वृद्धिंगत कराव्यात तर वाईट सवयींचा त्याग करावा.सवयी ह्या काळाच्या ओघात तयार होतात आणि मग त्या तुमचा नित्यक्रम बनतात. सवयी तयार होण्यासाठी तुमची मानसिकता आणि तुमच्या आजूबाजूचे वातावरण हे महत्वाची भूमिका बजावत असतात. वाईट सवयी ह्या आपली सामाजिक पत खराब करत असतात. एकदा सामाजिक पत ढासळली कि तुमची किंमत शून्य होते. त्या मुळे मद्यपान व धुम्रपान या सवयी तुम्ही एक स्टाइल म्हणून करत असाल तर ते टाळायला हवे. वाईट सवयी त्याग करण्याचा प्लान निश्चित करा आणि हळू हळू त्यातून सुटका करून घ्या. हे अवघड जरी असले तरी अश्यक्य नसते. या अशा सवयी आपण त्याग करायला हव्यात की ज्या आपली उत्पादकता व पत कमी करतात. शेवटी आपली उत्पादनक्षमता वाढत राहणे आवश्यक असते आणि ती वाईट सवयीने कमी कमी होत असेल तर ते आपल्या आयुष्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट राहत नाही.
आपण सध्या पाहतो की, मोबाइल आणि सोशल मीडियाचा वापर ही एक महत्वाची सवय बनू पाहत आहे. साहजिकच मोबाइल आणि सोशल मीडियाचा वापर ही सवयी काही अंशी तुमच्या उत्पादकतेत आणि कामकाजात मदत करत असली तरी ह्या सवयी मुळे होणारा मोबाईलचा अतिरेकी वापर अनेक समस्या निर्माण करत आहे. या मध्ये डोळे आणि मान या शारीरिक अवयवांवर ताण निर्माण होत आहे. तसेच अतिरिक्त वापर मुळे मानसिक संतुलन सुद्धा ढासळत आहे. या सवायी मुळे निर्णय क्षमता आणि आकलन क्षमता कमालीची घसरली आहे. खरे काय खोटे काय, चूक काय, बरोबर काय, चांगले काय, वाईट काय यातील भेद करणे अत्यंत कठीण झाले आहे. या सवयीमुळे आपण जर निम्मा दिवस म्हणजे ८ ते १२ तास वाया घालवत असू तर आपली मानवी उत्पादकता कमालीची घसरलेली दिसून येत आहे. निश्चितच याचे भयानक परिणाम लवकरच जाणवायला लागतील. युवकांमध्ये नशा वाढीस लावणारे पदार्थ जसे मद्य, सिगारेट , तंबाखू , गुटखा, चरस , अफू , गांजा इत्यादि याच्या आहारी जाण्याचे आणि प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिवसेन दिवस वाढत आहे. साहजिकच यामुळे आपण आपली उत्पादकता आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर कमी करत आहोतच. शिवाय कॅन्सर सारखे असाध्या असे रोग होत असल्याने संपूर्ण कुटुंब वेठीस धरण्यासारखे होत आहे. साहजिकच कोणतेही सवयी की जिचा अतिरेक होतो ती त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी घातकच ठरते.
एकंदर आपला स्वभाव हा जरी काही अंशी अंगभूत असला तरी बाह्य जग आणि बाह्य परिसर हे त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम साधत असते. स्वभाव हा जरी पूर्णत: बदलता येत नसला तरी त्याचे आपल्यावर होणारे दुष्परिणाम आपण कमी करण्यासाठी कायम दक्ष असायला हवेच. त्याच सोबत आपल्या स्वभावाची चिकित्सा वेळोवेळी होवून त्यात काही सकारात्मक बदल योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण याच्या माध्यमातून कसे करता येतील याबाबत कायम कामकाज आपल्याकडून होयला हवे. आपली वागणूक ही समाजात आपला वावर होत असतांना खूप महत्वाची अशी भूमिका बजावत असते. आपली वागणूक ही अत्यंत विवेकपूर्ण आणि विवेकशील अशी असावी. आपल्या वागणुकीने कोणी दुखावले जात नाही ना याबाबत आपण जागरूक राहावे. बर्यााच वेळेस आपल्या वागणुकीमुळे समोरचा दुखवला जात आहे हेच आपल्या लक्षात येत नाही. आपली वागणूक ही नेहमी आपल्या स्वता:ला आणि इतरांना उत्साह वाढवणारी आणि प्रेरणादायी असावी. आपल्या सवयी ह्या आपल्यासाठी चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रकारे काम करतात. पण वाईट सवयींचा ज्या वेळी अतिरेक होतो त्यावेळी त्या आपल्यावर मानसिक आणि शारीरिक आघात करू शकतात. साहजिकच आपल्या सवयी काय आहेत. त्याचा आपल्यावर चांगला किंवा वाईट या पैकी कोणता परिणाम होतो. त्यामुळे आपले कौटुंबिक आणि सामाजिक संबध खराब तर होत नाहीत ना? याबाबत वेळोवेळी तपासणी होणे अत्यावश्यक ठरते. आशा प्रकारे तुम्ही तुमचा स्वभाव, तुमचे वागणे आणि तुमच्या सवयी याचे योग्य व्यवस्थापन आपण करायला शिकायला हवे. जेणेकरून आपल्याला सोपे, सुटसुटीत, सरळ आणि सुखी जीवन जगता येईल.
जीवन अनमोल आहे ते अधिक सुंदर बनवूया.
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी