सारांश:
मानवी मन आणि आत्मा हे मानवासाठी कायम गूढ राहिले आहे. मानवी समाजाच्या ज्ञात अशा इतिहासात विविध तत्ववेत्ते, संशोधक आणि संत यांनी आपल्या परीने मानवी मनाची व्याख्या आणि त्याचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी मन हे विविध प्रकारचे विचार आणि भावनांची निर्मिती करत असते. मानवी मनातून दु:ख, आनंद, भीती, राग, तिरस्कार आणि आश्चर्य या प्रमुख सहा भावनांची निर्मिती होते. मानसशास्त्रीय आणि तत्वविषयक दृष्टीने या भावना विविध प्रकारे प्रभाव आणि परिणाम मानवी जीवनावर साधत असतात. भावनांचे चढ आणि उतार यातून आपले व्यक्तिमत्व तर घडतेच शिवाय समाजातील आपला वावर हा आपण भावनांचे व्यवस्थापन कसे करतो यावर बर्याच अंशी अवलंबून असतो. सतराव्या शतकात होवून गेलेले महान संत जगद्गगूरु संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अनेक अभंगातून मानवी जीवन ,मानवी भावना आणि मानवी जीवन वाटचाल याबाबत अत्यंत मार्मिक आणि तेवढ्याच निर्भीडपणे विचार मांडले आहेत. दु:ख, आनंद, भीती, राग, तिरस्कार आणि आश्चर्य या प्रमुख सहा भावनांच्या संदर्भात त्यांचे सहा अभंग विचारात घेवून प्रस्तुत संशोधनात त्याबाबत चर्चा आणि विश्लेषण याच्या आधारे विस्तृत असे विवेंचन केले आहे.
प्रस्तावना:
मानवी देह हा भौतिक आहे, तो स्पर्शग्राही आहे आणि तो सखोलतेने तपासताही येतो. मात्र मानवी मन हे अभौतिक असल्याने ते फक्त जाणून आणि समजून घ्यावे लागते. मानवी मन हे विचार आणि भावना यांना प्राथमिकरीत्या जरी जन्म देत असले तरी ते जाणीवा, प्रेरणा, संवेदना, आकलन, श्रद्धा आणि इस्चा याबाबतही ते कामकाज करत असते. मानवी मन हे अनंत काळापासून मानवासाठी गूढ बनून राहिले आहेत. विविध ऋषीमुनी, धर्मगुरू, तत्ववेत्ते, संत, संशोधक यांनी आपल्या परीने हे गूढ शोधण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी अंतिम सत्य शोधन अजूनही होवू शकले नाही. मन हा शब्द ‘मनस’ या शब्दावरून तयार झाला आहे. तसेच या मनाला अंत:करण किंवा चित्त असे संबोधले जाते. मन आणि मेंदू असा वेगवेगळा विचार आपल्याला करता येत नाही. मन आहे तर मेंदू आहे आणि मेंदू आहे तर मन आहे. सतराव्या शतकात होवून गेलेले महान संत जगद्गृरु संत तुकाराम महाराज यांना सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून ओळखले जाते. संत तुकाराम महाराज यांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले आहे. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत. संत तुकाराम महाराज यांनी मानवी जीवन आणि भावनाविश्व उलगडून दाखविलेच त्या सोबत या विविध भावनांचे योग्य व्यवस्थापन करून एक साधे, सोपे, सरळ आणि सुखी आयुष्य कसे जगावे याचा वस्तूपाठ घालून दिला. ‘आपले भावनाविश्व आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विचार’ या संशोधन पर लेखनातून त्यांचे विचारांवर चर्चा आणि विश्लेषण या आधारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत.
संदर्भ साहित्य आढावा :
मानवी मन बाबत जाणून घेतांना आपल्याला वैदिक काळामधील मनाबद्दलच्या विविध संकल्पना आधी समजून घ्याव्या लागतात. वेदिक काळ हा ख्रिस्तपूर्व १५०० ते ५०० असा समजला जातो. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद हे चार वेद आहेत. या प्रत्येक वेदांचे एकूण चार भाग पडतात. यात संहिता, ब्राह्मणे, अरण्यके आणि उपनिषदे यांचा समावेश होतो. वेदांची संहिता म्हणजे देवांची स्तुती आणि आराधना याबाबत माहिती होय. वेदांची ब्राह्मणे म्हणजे यज्ञविधींची माहिती होय. वेदांची अरण्यके म्हणजे विविध विधीमार्ग याबाबत माहिती होय. वेदांचे उपनिषदे म्हणजे तत्वविचार आहे. वेदांमध्ये ईश्वर, सृष्टी, शरीर, आत्मा आणि मन याबाबतचे विवेचन दिसून येते. जैन तत्वज्ञान आणि बुद्ध तत्वज्ञान यात सुद्धा मन आणि आत्मा यावर चिंतन आणि प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रीक आणि रोमन तत्ववेत्ते यांनी मन आणि शरीर यातून द्वैतवाद संकल्पना मांडली होती. यात शरीर आणि मन असे दोन वेगळे मूलद्रवे किंवा पदार्थ आहेत असे मानले जाते. दुसरी संकल्पना हि भौतिकवादी होती. यात शरीर किंव मेंदू हे जसे मूलद्रवे अथवा पदार्थ पासून बनले आहे तसे मन सुद्धा पदार्थ पासून बनलेले असावे असा हा विचार होता. सॉक्रेटिस यांचा असा विश्वास होता की मन आणि शरीर हे वेगवेगळ्या पदार्थ पासून बनलेले आहेत. प्लेटोने असे मत मांडले की शरीर आणि आत्मा हे भिन्न आहेत. प्लुटोचा मानवी इंद्रिये यांच्यावर मात्र विश्वास नव्हता. कारण इंद्रिये जसे दिसेल तशी कल्पना करेल, मात्र मन तसे नाही असे त्याचे मत होते. मनाच्या माध्यमातून सत्याचा उलगडा होवू शकतो असे प्लुटो म्हणत असे. ज्या गोष्टी दिसतात तश्या त्या नसतात त्यासाठी तर्कशुद्ध आत्मपरीक्षण आवश्यक आहे, असे तो सांगे. अं:तकरण मधूनच म्हणजे मनातूनच सत्य साधन होवू शकते. प्लेटोच्या शिष्यांपैकी एक म्हणजे ॲरिस्टॉटल होय. ॲरिस्टॉटलने प्लेटोचे रूपांचे क्षेत्र नाकारले आणि असा युक्तिवाद केला की, ही रूपे म्हणजे वस्तूंचे वर्गीकरण करण्यासाठी लोकांनी तयार केलेल्या संकल्पना आहेत. सतराव्या शतकात थोमस हॉब्स यांनी असे मांडले कि आपण फक्त भौतिक गोष्टीच्याच कल्पना करू शकतो. जी गोष्ट अभौतिक आहे, जसे मन आणि आत्मा याच्या कल्पना आपल्याला करता येत नाहीत. आपल्या शरीरात काही तरी आहे कि जे संवेदन, गती आणि हालचाल देते ते म्हणजे आत्मा किंव मन होय. या हॉब्सला समकालीन दुसरा विचारवंत होता रेने देकर्ते, याने १६४१ मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या पहिल्या तत्त्वज्ञानावरील चिंतनात देकार्तने असे सुचविले की, मन भौतिक पदार्थांपेक्षा तीन प्रकारे वेगळे असते. यात ज्या संवेदनांचे यांत्रिकपणे स्पष्टीकरण देता येत नाही ते म्हणजे मन होय, अशा संवेदनांचा अनुभव मनाला येतो, मेंदूप्रमाणे भौतिक दृष्ट्या मनाचे अस्तित्व नसते आणि मन हे एक आवश्यक संपूर्ण आहे. म्हणून भौतिक वस्तूला जसे शक्य आहे तसे मनाचे विभाजन किंवा त्याची प्रतिकृती करता येत नाही. जगदगुरु संत तुकाराम महाराज मनाची महती सांगत असतांना म्हणतात की, मन करा रे प्रसन्न।सर्व सिद्धीचें कारण। मोक्ष अथवा बंधन। सुख समाधान इच्छा ते ।।१।। याचा अर्थ असा की कोणतेही कार्य पूर्ण करायचे असेल, तर तुमचे मन प्रसन्न करायला हवे. कवयित्री बहिणाबाई चौधरी मनाची ख्याती आणि मोठेपण सांगताना म्हणतात, की मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर आणि ।। देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं॥. अशा प्रकारे अनेक तत्ववेत्ते ,संत आणि विचारवंत यांनी आपले मन आणि भावना याचेबाबत विचार मांडले आहेत.
चर्चा आणि विश्लेषण :
मानवी मन हे विविध प्रकारच्या भावनाची निर्मिती करत असते. यात काही मुख्य भावना आणि उप भावना यांचा समावेश होतो. आपल्या मनात ज्या भावना तयार होतात त्यात आनंद, सुख, समाधान दुःख, वेदना, भीती, राग, क्रोध, आश्चर्य, तिरस्कार, द्वेष, मत्सर, इच्छा, समाधान, तृप्तता, गर्व, लालसा, प्रेम, करुणा, दया, मोह, अहंकार, खिन्नता, औदासिन्य, कंटाळवाणे, काळजी, माया, हेवा, असूया, घृणा, स्तुती ,कौतुक, उत्सुकता, एकाकीपण याचा समावेश होतो. या भावनाचे उभे आडवे स्तर असतात. काही भावना ह्या एकाकी अस्तित्व दर्शवता तर काही भावना ह्या एकमेकाशी संयोग पावून आपले अस्तित्व दर्शवतात. या भावना बदलणार्या आणि तीव्र आणि सौम्य स्वरुपाच्या असतात. तसेच या भावना कधीच एकसमान नसतात. या भावनाचे मुख्य वैशिष्टे असे की त्या व्यक्तीपरत्वे आणि व्यक्तीगणिक असतात. म्हणजेच त्यांचे अस्तित्व हे व्यक्तिनिहाय बदलणारे असते. या प्रमुख सहा भावना, आपले विचार,आपल्या आठवणी, आपले वर्तन, आपले अनुभव आणि घडलेल्या किंवा घडणार असलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटना यामुळे निर्माण होत असतात. या भावना निर्माण होणे आणि त्या अनुषंगाने आपल्या शरीराचा प्रतिसाद मिळणे ही एक सर्वसाधारण जीवनशैलीचा भाग आहे. मात्र आपला स्वभाव व प्रतिकूल परिस्थिती या मुळे या निर्माण होणार्या भावना आपण दाबून ठेवतो. अशा भावना जास्त काळ दाबून ठेवल्याने त्याचे विपरीत परिणाम आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होतात. त्यासाठी भावनांचे योग्य नियंत्रण आणि व्यवस्थापन करायला हवे.
मानवी शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव असलेला मेंदू आणि या मेंदुच्या परिसरात विसावलेले आपले मन याचा शोध व अभ्यास हे जीवशास्त्र व मानसशास्त्राच्या अभ्यासकांना कायम आव्हानात्मक राहिले आहे. असे असले तरी सतराव्या शतकात होवून गेलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी आपल्या गाथेतील अभंगात या भावनाविश्वाचे अचूक असे विवेचन व विवरण केलेले आपणास पाहावयास मिळते. हाच धागा पकडून आपण आपले भावनाविश्व उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत.
१.दु:ख भावना बाबत जगद्गगूरु संत तुकाराम महाराजांचे विचार :
दू:ख काय आहे, तर ती एक मनातून येणारी किंवा निर्माण होणारी भावना आहे. मात्र ही भावना निर्माण होण्यामागे अनेक कारणे असतात. आपल्या जवळील कोणी तात्पुरते किंवा कायमचे सोडून गेले तर दू:ख होते. आपल्याला जे मिळणे अपेक्षित होते, ते मिळाले नाही की दुःख होते. आपल्याला एखांद्याचे अपेक्षित असलेले वागणे असते;तसे झाले नाही की दुःख होते. अशी दु:खाची अनेक रुपे आहेत. तसेच दु:ख होण्यामागचे अजून एक महत्वाचे कारण हे की, दु:ख आणि तणाव, त्रास, द्वेष, तिरस्कार, हेवा, मत्सर, लालसा, मोह यात भेद न करता येणं होय. ही सर्व दु:खाची रुपे आहेत असे समजून आपण दु:ख करत राहतो आणि आपल्या दु:खाची तीव्रता वाढत जाते. एकंदर दू:ख हे अनेक घटक आणि घटना यांचा परस्परसंबंध आणि त्यांचा आपल्याशी सहसंबंध यावर अवलंबून असते.
सुख पाहता जवापाडे |दुःख पर्वता एवढे ll जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगातून संदेश देतात की सुख हे जवा एवढे असते आणि दु:ख पर्वता एवढे असते. यात ते पुढे असेही सांगतात की आपले अर्धे आयुष्य झोपेत जाते, काही आयुष्य बालपनात आणि विविध व्याधी- आजारात जातात. म्हणून संत तुकाराम सांगतात की तू असाच जगत राहिलास, असेच दु:ख करत राहिलास, तर या जन्म मृत्यूरूपी घाण्यास पुन्हा जुंपला जाशील. मित्रांनो आपल्याला दु:ख होणे ही एक सर्वसाधारण बाब असली तरी असे दु:ख जर जास्त काळ नेहमी टिकत असेल तर ते आपल्या जीवनासाठी धोक्याची घंटा आहे. एखांदी मानाविरुद्ध अथवा वाईट घटना घडली तर साहजिकच दु:ख होण अपेक्षित व साहजिकच आहे. मात्र कधी कधी उगाच कारण नसताना आणि लहान सहान गोष्टीवरून आपल्याला दु:ख होत असते किंवा दु:खाचे एपिसोड येत असतात.सबब जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे दु:ख व सुख ही वस्तुस्थिती मान्य करून सकारात्मक विचार करून आणि हे सकारात्मक विचार आपल्या मनात रुजवून आपण पुढे जायला हवे.
२.आनंद भावना बाबत जगद्गगूरु संत तुकाराम महाराजांचे विचार:
मला आनंद झाला असे आपण बहुदा ऐकतो पण मला सुख मिळाले असे आपण क्वचित ऐकतो. आपण आनंद व सुख हे एकच आहे अशी गल्लत करून बसलो आहोत. आनंद म्हणजे Joy आणि सुख म्हणजे Happiness अशी सरळ विभागणी इंग्रजी शब्दकोशात केलेली आहे. अजून विस्ताराने पाहिल्यास आनंद म्हणजे feeling of great pleasure at point of time तर सुख म्हणजे A state of feeling joyful for a substantial period of time.आपण आनंद साजरा करतो मात्र तो आनंद सुखामध्ये परावर्तीत करत नाहीत. यामुळे मानवी जीवन समयोजनामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्याचे दिसून येते. आनंद व सुख यांचा परस्पर संबध प्रस्तापित न झाल्यास एका ठराविक काळानंतर नैराश्य येत . त्यामुळे आनंद हा क्षण शास्वत सुखामध्ये कसा परावर्तीत करता येईल हे पहावे लागते.
आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे॥ जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात आनंदाचे विवरण सांगताना म्हणतात की माणूस म्हणजे आनंदाचा डोह असून आनंदाचे तरंग या डोहातून निर्माण होतात. आनंद हा आनंदातून निर्माण करावा लागतो. त्यामुळे आनंद जर शोधायचा असेल तर तो आपल्यात शोधा. आनंद ही एक सहज भावना आहे. आपल्याला आवडणारी अथवा आपल्या मनासारखी घटना गोष्ट घडली की आपल्याला आनंद होतो. मात्र हा आनंद आपल्याला जास्त वेळ टिकवता येणे आणि तो सुखात परावृत्त करणे आपल्याला जमले पाहिजे. आपण आनंदी असतो त्यावेळी आपल्याला न आवडणारी, न झेपणारी आणि रटाळ कामे आपण उरकून घेतली पाहिजेत. आनंदात आपले मन व बुद्धी ही उत्साहवर्धक असल्याने त्याचा फायदा उचलायला शिका.
३.राग भावना बाबत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे विचार:
राग निर्माण होण्यामागे आपली मानसिक आणि बौद्धिक जडणघडण कशी झाली आहे, आपण कोणत्या वातावरणात वाढलेले आहोत, झालेल्या घटनेने आपले नुकसान किती होणार आहे आणि आपली अनुवंशिक गुणधर्म जे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हस्तांतरित होतात ते कसे आहेत ही बाब महत्वाची असते. अशा प्रकारे अनेक बाबींचा एकत्रित परिणाम राग प्रकट करण्यामध्ये होत असतो. राग ही भावना व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असते. काहींना खूप राग येतो, काहींना मध्यम राग येतो, तर काहींना सौम्य राग येतो. मात्र राग व्यक्त होण्याचे तीन प्रकार आपल्याला दिसून येतात. काही लोक आटोक्लेव सारखे असतात. त्यांना आतून खूप राग आलेला असतो मात्र ते तो राग आतच दाबून ठेवतात. काही लोक प्रेशर कुकर प्रमाणे असतात. प्रेशर कुकर मध्ये ज्या प्रमाणे वाफ भरत राहते आणि एकदम शिट्टी होते तसे ते असतात. काही लोक झाकण ठेवलेल्या पात्याले सारखे असतात. त्या झाकणा खालून ज्या प्रमाणे हळू हळू वाफ निघते तसा राग आला की हळू हळू ते आवाज करतात आणि राग बाहेर काढतात. साहजिकच ह्या तिन्ही अवस्था आपल्या शरीरावर आणि मनावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिकूल परिणाम करतात. जेंव्हा राग व्यक्त होत नाही ही परिस्थिती मात्र आपल्या स्वत:साठी अत्यंत क्लेशदायक असते. मनातील राग बाहेर पडत नसल्याने तो आपल्या विचार शक्तिवर आघात करून ती क्षीण करतो. त्यामुळे मानसिक विफलता तयार होते. साहजिकच हार्मोनल असमतोल तयार होतो. हार्मोनल असमतोल तयार झाला की त्याचे आपल्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतात. जेंव्हा राग एकदम व्यक्त होतो. तेंव्हा त्याची तीव्रता खूप भयानक असते. कारण एका झटक्यात संबध संपुष्टात येतात. पुढचा व्यक्ती यामुळे जास्त प्रमाणात दुखवला जातो. संबंध संपुष्टात आले की, आपल्यालाही नंतर काही तरी चुकीचे झाले आहे असे वाटते. संबंधातून प्राप्त होणारे आपले फायदे हे कमी होतात आणि त्यातून एक नकारतमक्ता निर्माण होते. जेंव्हा राग हा हळू हळू व्यक्त होतो त्यावेळी आपली सारखी चिडचिड होते. समोरच्या व्यक्तिला आपली भून भून सहन होत नसल्याने. तो आपल्याला टाळायचा प्रयत्न करतो. हळू हळू तो दूर जातो. आपले संबंध कधी संपुष्टात आले ते आपल्यालाही कळत नाही. आणि आपण एक चांगल्या संबंधाला आणि त्यातून मिळणार्या सहकार्याला मुकलेले असतो.
निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार। आणीक सांगों किती काय॥ जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगात राग, निंदा आणि द्वेष याबाबत विवेचन करतात. राग ही भावना मनातून एकदम उफाळून येते आणि काही वेळ टिकते इतपावेतो ठीक आहे. मात्र राग ही भावना जर जास्त वेळ टिकत असेल तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतात. मनासारखी गोष्ट घडली नाही किंवा अपेक्षा पूर्ण नाही झाली किंवा आपल्या कार्यात व कामात कोणी अडथळे आणले कि राग हि भावना उफाळून येते. राग ही भावना जसा पाण्याचा बांध फुटतो किंवा एखाद्या ठिकाणी अचानक आग लागल्यावर जशा ज्वाला बाहेर पडतात अगदी तशी असते. राग येणे आणि त्यातून आपल्या भावना यांचे उत्सर्जन होणे आवश्यक बाब असली तरी आपल्या रागामुळे आपले स्वत:चे तसेच दुसर्याचे नुकसान होत असेल तर असा राग आपण नियंत्रित करणे शिकून घेयला हवे. राग नियंत्रित करणे साठी मोठा स्वास घेणे, लिहून काढणे, ज्या व्यक्तीचा राग आला आहे त्याच्या पासून दूर राहणे, राग आल्यानंतर काही वेळ बाहेर फेरफटकासाठी जावून देणे, राग आल्यानंतर आपल्या आवडत्या गोष्टी अथवा छंद यावर लक्ष केंद्रित करणे या बाबी आपण करू शकतो.
४.भीती भावना बाबत जगद्गगूरु संत तुकाराम महाराजांचे विचार:
भीतीचा उगम हा प्रसंगानुरूप आणि वस्तुस्थितीला धरून असला तरी बर्याच अंशी भीती ही अनामिक आणि आभासी सुद्धा असते. त्यामुळे भीती ही कधी कधी आपले आयुष्य व्यापते आणि ते अंधारमय सुद्धा करते. भीती ही वैचारिक आणि तशी ती भावनिक असते. भीती ही जुनाट आणि तीव्र सुद्धा असते. अनेक वेळा ही भीती आपल्या शरीराला आणि स्वैर अशा मनालाही अनियंत्रित करते. ऐकीव गोष्टी आणि अर्थहीन चर्चा यात रंगवले जाणारी विविध भीतीदायक पात्र ही भीतीचे सर्वात मोठे आधारस्तंभ असतात. त्यामुळे भीती ही वस्तुस्थिती पेक्षा अनामिक आणि आभासी गोष्टींना आणि पात्रांना जास्त महत्व देत असल्याचे दिसून येते. मानवी मन आणि मेंदू आणि त्यांच्या ठायी असलेली अमर्याद विचार क्षमता हे आभासी आणि अनामिक जगाला अजून व्यापक आणि भीतीदायक बनवते. साहजिकच ही व्यापकता अजून भीतीला मोठे रूप देते. भीती ही व्यक्तिगत असते म्हणजे भीतीची संकल्पना अथवा कल्पना ही व्यक्तिगणिक किंवा व्यक्तिपरत्वे बदलते. भीतीचा उगम हा आपल्या आकलनातून होतो. आजूबाजूला असलेल्या मूर्त आणि अमूर्त गोष्टी बाबतचे अज्ञान हे भीतीचे प्रमुख कारण असते.
मेघ पडों भीती । पिकें सांडियेली क्षिती ॥ या अभंगात जगद्गुरु संत तुकाराम महाराज असे सांगतात की भूतलावर एवढं पाप वाढले आहे की ढग पाऊस पाडायला भीत आहेत आणि धरती मातेने तर पिके उगवणे सुद्धा सोडून दिले आहे. आपल्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष घडलेले पाप आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती आपण चांगले काम व कार्य करून कमी करायला हवी. एखांदा धोका जेंव्हा समोर येतो तेंव्हा आपल्याला भीती वाटते. असे असले तरी जी गोष्ट घडण्याची शक्यताच नाही किंवा जी गोष्ट खूप काळाने घडणार आहे त्याची भीतीचे घर आपण मनामध्ये करून बसतो.या मुळे काय होते कि आपण आपले कार्य व काम सोडून देतो. वास्तविक भीती हि आपण बचावात्मक पवित्रा घेवून त्यातून मार्ग काढावा म्हणून मनाने व मेंदूने दिलेलें प्रतिसाद असतो हा प्रतिसाद आपण घेवून पुढे जायचे असते. सबब घाबरले पाहिजे, भीती वाटली पण पाहिजे, मात्र ती भीती कायम आपल्यासोबत राहायला नको. भीती कमी करण्यासाठी मानवी जीवन आणि त्याची अनमोलता ही विचारात घेतली की ती कमी होते. जीवन ही एक ईश्वरी देणगी आहे आणि आपण आपले कार्य आणि कर्म करत राहू असा विचार केला की भीती कमी होते.एका बिन्दु पासून आपली उत्पती झाली असल्याने आणि आपण पुन्हा या पंच महाभूतात मिसळून जाणार असल्याने आपण भीती ही भावना हळू हळू कमी केली पाहिजे.
५.द्वेष तिरस्कार भावने बाबत जगद्गगूरु संत तुकाराम महाराजांचे विचार:
एकंदरच जगातील सर्व मूर्त आणि अमूर्त गोष्टी सोबत मानवाची स्पर्धा निरंतर चालू असते. हि स्पर्धा जेव्हा आपल्या सहकाऱ्यांसोबत असते तेंव्हा एकमेकाबद्दल असूया(Envy)तयार होते. जेंव्हा अशी स्पर्धा हि इतरांसोबत असते तेव्हा इर्षा (Jealous)तयार होते. जेंव्हा अशी इर्षा हि तीव्र होते त्यावेळेस तिरस्कार(Disgust) सुरुवात होतो. हा तिरस्कार जेंव्हा वारंवार होवू लागतो त्या वेळेस त्याचे रूपांतरण हे द्वेष(Hatred) मध्ये होते आणि सरते शेवटी द्वेष हा घृणे (Abomination) मध्ये रुपांतर होतो. तिरस्कार अजून अति तीव्र आणि प्रबळ झाला कि आपण समोरच्याचा द्वेष(Hatred) करायला सुरुवात करतो. राग आणि तिरस्कार एकत्र आले ही द्वेष निर्माण होतो. बर्याच अंशी द्वेष आणि मत्सर हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. एकदा तिरस्काराची जागा द्वेषाने घेतली कि ती व्यक्ती कट कारस्थान करण्याच्या दृष्टीने हालचाल करायला सुरुवात करते. समोरच्याचा कसा पत्ता कट करता येईल, त्याचा पराभव कसा करता येईल किंवा त्याची कशी नाच्चकी होईल या अनुषंगाने प्रयत्न सुरु होतात. द्वेष तीव्र असेल तर त्या बाबत इतरांसमोर ज्याच्या बद्दल द्वेष आहे त्याची वाच्यता करून त्याला शिव्या शाप दिल्या जातात. त्याच्या बाबत चुकीचे आणि वाईट जेवढे पेरता येईल तेवढे पेरण्याच प्रयत्न केला जातो. द्वेष हा आगीसारखा असतो तो समोरच्याला सर्व बाजूंनी घेरून जाळण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपण हे विसरून गेलो असतो, की ती आग आपल्यालाही पोळणार असते. आपल्यात द्वेष वाढला ही आपले अंग थरथरते आणि नकारात्मक भावना सारखी वाढीस लागते. इतरांबद्दल आपण कायम द्वेष करत राहिल्याने आपली विचारप्रक्रिया संथ आणि मंद होते.
ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती॥ जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात की जर तुम्ही कायम द्वेष, तिरस्कार करत असला तर तेच तुमचे चित्त आणि आयुष्य तसेच बनते. तिरस्कार ही भावना निर्माण होण्यास आपली अकार्यक्षमता कारणीभूत असते. तसेच आपले स्वार्थी व संकुचित विचार सुद्धा याला जबाबदार असतात. आपण मागे का राहिलो? या पेक्षा तो पुढे का गेला? किंवा आपल्याला अपयश का आले? या पेक्षा त्याला यश का व कसे मिळाले? यामुळे आपल्या मनात दुसर्याविषयी तिरस्कार निर्माण होतो. एकदा आपण दुसर्याचा तिरस्कार करायला लागलो की आपली प्रगती आणि विकास थांबतो हे लक्षात घ्यावे. कारण तिरस्कार आणि त्या अनुषंगाने येणारी नकारात्मकता आपली उत्पादकता कमी करत असते. आपली नाविण्यापूर्णता सुद्धा ती गोठवत असते हे लक्षात घ्यावे. त्यामुळे तिरस्कार करण्यापेक्षा आपण आपल्या स्वता:वर काम केले पाहिजे. जग खूप मोठे आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळू शकत नाही. त्यामुळे हे त्यालाच का ?यापेक्षा मी ते हळू हळू कष्टाने मिळवेल ही भावना रुजवायला हवी. इतरांचे यश आपल्या डोळ्यात खुपू देवू नका.
६.आश्चर्य भावना बाबत जगद्गगुरू संत तुकाराम महाराजांचे विचार:
देवाचे म्हणोनि देवी अनादर। हें मोठें आश्चर्य वाटतसे॥ जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात एका ठिकाणी त्यांनाही आश्चर्य वाटल्याचे नमूद करतात. ते म्हणतात की जे लोक स्वताला देवाचे भक्त मानतात मात्र त्यांचे वागणे पाहून मलाही आश्चर्य वाटते. आपल्याही आजूबाजूला अशी काही चकित करणारी आणि आश्चर्य वाटायला लावणारी माणसे असतात. त्यांचे बोलणे एक असते आणि राहणे वेगळेच. अशा लोकांपासून आपण दूर राहायला हवे.
समारोप :
अशा प्रकारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची विविध अभंगातील शिकवण विचारात घेता या सहा मुख्य भावनांचे योग्य नियंत्रण आणि व्यवस्थापन करायला हवे. ते सांगतात की दु:ख व सुख ही वस्तुस्थिती मान्य करून सकारात्मक विचार करून आणि हे सकारात्मक विचार आपल्या मनात रुजवून आपण पुढे जायला हवे. आनंदाबाबत ते सांगतात की माणूस म्हणजे आनंदाचा डोह असून आनंदाचे तरंग या डोहातून निर्माण होतात. आनंद हा आनंदातून निर्माण करावा लागतो. त्यामुळे आनंद जर शोधायचा असेल तर तो आपल्यात शोधा. रागाबाबत विवेंचन करतांना ते सांगतात की राग ही भावना मनातून एकदम उफाळून येते आणि काही वेळ टिकते इतपावेतो ठीक आहे. मात्र राग ही भावना जर जास्त वेळ टिकत असेल तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतात. आपल्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष घडलेले पाप आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती त्यामुळे काम व कार्य यात अडथळे येतात असेही ते सांगतात. संत तुकाराम महाराज सांगतात की जर तुम्ही कायम द्वेष, तिरस्कार करत असला तर तेच तुमचे चित्त आणि आयुष्य तसेच बनते. तिरस्कार ही भावना निर्माण होण्यास आपली अकार्यक्षमता कारणीभूत असते. तसेच आपले स्वार्थी व संकुचित विचार सुद्धा याला जबाबदार असतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात एका ठिकाणी त्यांनाही आश्चर्य वाटल्याचे नमूद करतात. ते म्हणतात की जे लोक स्व:ताला देवाचे भक्त मानतात मात्र त्यांचे वागणे पाहून मलाही आश्चर्य वाटते. आपली भावना ही आनंद स्वरूपाची असेल तर ती जास्त काळ कशी टिकवता येईल यावर काम करा आणि ती सुखात परावर्तीत करावी. दु:ख हे कायम आपल्याला चिटकुन राहणार नाही याची काळजी घ्यावी. राग हा आगीसारखा असतो तो इतरांसोबत आपल्यालाही जाळून टाकतो हे लक्षात ठेवावे. त्या अनुषंगाने काही गोष्टी सोडून देणेस शिका आणि माफ करायला शिका. काही प्रमाणात भीती आवश्यक आहेच मात्र अनावश्यक भीतीवर आपण मात करायला हवी. तिरस्कार ही भावना आपण त्याग करायला हवी. अशा प्रकारे आपण भावनांचे योग्य नियंत्रण आणि व्यवस्थापन करूया आणि सोपे, सरळ, सुटसुटित आणि सुखी आयुष्य जगता येते .
संदर्भ ग्रंथ सूची :
- एम. ए.(तत्वज्ञान )वाचन साहित्य, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (इग्नू) नवी दिल्ली.
- संत तुकाराम गाथा: जगद्गगुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग.
लेखक: राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी