आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली भाग 1- वर्तमानात राहण्याची शक्ती या मागील भागात आपण वर्तमानात कसे रहावयाचे व ते आनंदी जीवनासाठी किती महत्वाचे आहे हे पाहिले.
आपले जीवन आनंदी असावे हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असते. त्यादृष्टीने नातेसंबंध हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य आणि तितकाच महत्त्वाचा घटक आहे.आनंदी जीवनासाठी आपले नाते संबंध निकोप व प्रेमाचे असणे गरजेचे आहे. नातेसंबंध कसे वृद्धिंगत करायचे याची अध्यात्मिक पद्धत एकहर्ट टोले लिखित प्रॅक्टिसिंग दि पॉवर ऑफ नाऊ या पुस्तकात सांगितली आहे.
नातेसंबंध कसे निकोप असावेत व त्यासाठी आपली वर्तणूक कशी असावी हे या पुस्तकात अतिशय सुंदर मांडले आहे.आज आपण प्रक्टिसिग द पॉवर ऑफ नाऊ या इंग्रजी पुस्तकातील द्वितीय भागाचे म्हणजे नातेसंबंध: अध्यात्मिक पद्धत याचा सारांश पाहत आहे.
नातेसंबंध : अध्यात्मिक पद्धत
अमान्य गोष्टी व जाणिवेचा अभाव यामुळे वेदना निर्माण होतात.मानवी वेदनेचा मोठा भाग हा अनावश्यक असतो.ताब्यात नसलेल्या मनामुळे ती स्वतः निर्माण केलेली असते. नकारात्मक भावनेचा परिणाम म्हणजे वेदना. वर्तमानात न राहण्याच्या प्रतिकार शक्ती वर वेदनेची तीव्रता अवलंबून असते.तुम्ही जितक्या जास्त प्रमाणात वर्तमानाचा सन्मान कराल स्वीकार कराल तितकीच तुमची वेदनांपासून व अहंकारी मनापासून सुटका होईल.
वेदना दोन स्तरावर असतात- एक वेदना ज्या आत्ता निर्माण झाल्या आहेत आणि दुसऱ्या भूतकाळातील वेदना ज्या अजूनही तुमच्या मनावर व शरीरावर जिवंत (कार्यरत) आहेत. संचित वेदना म्हणजे तुमच्या शरीर व मनावरील नकारात्मक ऊर्जा असते.
शरीरातील वेदना दोन प्रकारच्या असतात- सुप्त व सक्रिय. अतिशय दुःखी माणसाच्या शरीरात त्या 90 % सुप्त असतात (जरी त्या शंभर टक्के सक्रिय असू शकतात). काही लोक पूर्णपणे शरीरातील वेदने बरोबर राहतात तर इतर लोकांना फक्त काही परिस्थितीत वेदना जाणवते जसे की-अगदी जिव्हाळ्याचे संबंध, पूर्वीचे नुकसान, पोटाचे, शारीरिक किंवा भावनिक जखमा. विशेष करून जेव्हा तुमची पूर्वीची शरीर वेदना अनुनादित ( resonate) होते तेव्हा पुन्हा या वेदना उफाळून येतात.
वर्तमानात रहा, जाणिवेत रहा (सतर्क राहा). तुमच्या अंतरंगाचे सतर्क पालक (संरक्षक) रहा. तुम्ही वर्तमानात इतके तरी राहायला हवे की तुम्ही तुमच्या शरीर वेदना व त्यांची तीव्रता जाणून घेऊ शकाल. जेथे राग असतो तेथे नेहमीच शरीर वेदना असतात. तुमच्या अंतरंगातील जाणीवेकडे लक्ष केंद्रित ठेवा. लक्षात घ्या त्या शरीर वेदना आहेत. त्या आहेत त्यांचा स्वीकार करा.त्यावर विचार करू नका. कोणताही तर्क-वितर्क किंवा अनुमान करू नका. त्या संबंधी कोणतीही ओळख करू नका.वर्तमानात रहा व तुमच्या अंतरंगात काय चालू आहे याचे निरीक्षण चालू ठेवा आणि हे फक्त तुमचे तुम्हीच करू शकता दुसरे कोणी तुमच्यासाठी करू शकत नाही. जर तुम्ही या वेदनेतून काही ओळख(identity)निर्माण केली तर त्या वेदनेतून बाहेर येणे शक्य नाही. जोपर्यंत तुम्ही भावनीक वेदने मध्ये आहात तुम्ही तुमच्या वेदनेपासून परावृत्त होण्यास विरोध करीत असता. भूतकाळात काही गोष्टी घडलेल्या असल्यामुळे शरीर वेदना आहेत. तो तुमच्या भूतकाळातील जिवंत भाग आहे आणि जर तुम्ही ते ओळखले तर तुम्ही भूतकाळ ओळखला. ज्याप्रमाणे तुम्ही अंधाराशी लढा देऊ शकत नाही त्याप्रमाणे तुम्ही शरीर वेदनेशी लढा देऊ शकत नाही. तसे करण्याचा प्रयत्न केल्यास आंतरिक संघर्ष निर्माण होईल व वेदना होतील. त्यांचे निरीक्षण करणे पुरेसे आहे. त्यांचे निरीक्षण करणे म्हणजेच तो या क्षणाचा भाग आहे या गोष्टीचा स्वीकार करणे.
जोपर्यंत तुम्हाला वर्तमानात असण्याची जाणीव नसते तोपर्यंत सर्व नातेसंबंध विशेषत: जिव्हाळ्याचे संबंध अतिशय सदोष व बिनकामाचे असतात. सामान्यपणे असे दिसते की, प्रेमाचे रुपांतर एका झटक्यात क्रूरता, वैर मध्ये बदलते.खऱ्या प्रेमाला अशी विरुद्ध बाजू नसते. तुमच्या प्रेमास विरुद्ध बाजू असेल तर ते प्रेम नसते तो तुमचा स्वाभिमान असतो.
वर्तमानात राहणे, वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही एकटे असा किंवा तुमच्या जीवनसाथी सोबत असा, प्रथम स्वतःबद्दल तर्क-वितर्क,न्याय-निवाडा करणे थांबवा तसेच तुमच्या जीवनसाथी सोबतही. तुमच्या जीवनसाथीचा न्यायनिवाडा (परीक्षण) न करता आहे तसा स्वीकार करणे ही मोठी बाब आहे. त्यामुळे तुमच्या स्वाभिमानाच्या पलीकडे तुम्ही पोहोचता. तुमच्या मनातील सर्व खेळ व मनात घर करून बसलेल्या गोष्टी तेथे संपतात आणि मग आरोप व आरोप करणारा असा प्रश्नच राहत नाही.प्रेम म्हणजे अस्तित्वाची स्थिती. तुमचे प्रेम हे कोठे बाहेर नसते ते तुमच्यामध्येच खूप खोलवर असते. ते तुम्ही सोडू शकत नाही व तेही तुम्हाला सोडत नाही. ते इतर कोणावर किंवा बाह्य गोष्टींवर अवलंबून नसते. तुमच्या वर्तमानाच्या शांततेत तुंम्हाला निराकार, शाश्वत, वास्तव, मुक्त असा अनुभव असेल. तसेच जीवन तुंम्हाला इतर माणसांच्या व प्राणिमात्रांच्या मध्ये जाणवेल, विभक्तपणाच्या पडद्या पलीकडे तुम्ही असाल आणि हीच एकात्मतेची भावना व प्रेम आहे. जेव्हा तुमच्या लक्षात येते की तुम्ही “शांत” नाही, ही जाणीवच तुंम्हाला संधी देते व तुंम्ही शांततेत परावर्तित होता. तुम्हाला परावर्तित होण्यासाठी अवकाश देणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षणाला आपल्या अंतरंग स्थितीची माहिती असू देत. अंतरंगात राग, तिरस्कार, विनंती,बचावात्मक भावना, प्रेमाची आस, भावनिक वेदना इत्यादी काय आहे व ते निरीक्षण करणे.जर तुमच्या जीवनसाथीची वर्तणूक जाणीवपूर्वक नसेल तर तुमच्या प्रेमळ भावनेत संधी द्या व तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका. जर तुम्ही तुमच्या जीवनसाथीच्या अजाणीवपूर्ण वर्तणूकीला प्रतिक्रिया दिली तर तुम्ही स्वतः सुद्धा अजाणीव होता. जर तुम्ही जुन्या पद्धती (आकृतिबंध) धरून ठेवले तर वेदना, क्रूरता, गोंधळ आणि वेडेपणा वाढत राहील.
समजूतदारपणा,जाणीव या तुमच्या मार्फतच जगात येणार आहेत. जग किंवा इतर कोणी समजूतदार होईल याची तुम्ही वाट बघत बसू नका. तुम्हाला काय वाटते हे कोणालाही दोष न देता व्यक्त व्हायला शिका. तुमच्या जीवनसाथीला समजून घ्यायला शिका. तुमच्या जीवनसाथीला सुद्धा व्यक्त होण्यासाठी मोकळेपणा द्या. वर्तमानात रहा दुसऱ्याला व स्वतःलाही मोकळेपणा देणे ही जीवनावश्यक गोष्ट आहे त्याशिवाय प्रेम वृद्धिंगत होऊ शकत नाही.
घातक, विध्वंसक नातेसंबंधांना दोन गोष्टी कारणीभूत आहेत- एक शरीर वेदना संक्रमित झालेल्या आहेत,तुम्ही मनाशी आणि मन:स्थितीशी (भावनांशी) जोडलेले आहेत आणि दोन तुमच्या जीवन साथी ने सुद्धा तसेच केले असेल. त्या जर तुम्ही काढून टाकल्या तर वृद्धिंगत नातेसंबंध व धन्यता अनुभवायला मिळेल. एकात्मतेची भावना असल्यामुळे तुमच्या मधील आंतरिक प्रेम तुम्ही व तुमचे जीवन साथी एकमेकांना परावर्तित करताल. हे खरे प्रेम आहे, याला विरुद्ध बाजू नाही. जेव्हा तुम्ही तुमच्याशी संबंधित आहात, तेव्हा तुम्ही “मी”व “माझे”असेच तुमचे विभाजन केलेले असते. मनाने केलेले हे विभाजन जीवनातील सर्व संघर्षाचे मूळ कारण असते. “ज्ञानी” स्थितीमध्ये “तुम्ही” व “तुमचे” असे एकच असते. या स्थितीत तुम्ही तुमचे परीक्षण करीत नाही,तुम्ही स्वतःसाठी पश्चाताप करीत नाही, स्वतःबद्दल गर्व करीत नाही, स्वतः बद्दल प्रेम किंवा तिरस्कार करीत नाही. आत्मचिंतनशील जाणीवेचे विभाजन नष्ट होते, हे पाप निघून जाते. आता स्वत्व किंवा स्वतःचे असे काही रहात नाही की ज्याचे रक्षण करावे, बचाव करावा किंवा पोषण करावे.जेव्हा तुम्ही ज्ञानी असता तेव्हा तुम्ही “तुमचे स्वतःचे” असे नाते कधीच ठेवत नाही. एकदा तुम्ही ते सोडले की तुमचे इतर सर्व संबंध हे प्रेमाचे संबंध होतात.
प्रा. डॉ. राधिका सोमवंशी
विभाग प्रमुख,
गणित व संख्याशास्त्र विभाग,
नुतन मराठा महाविद्यालय,
जळगाव.
(सेवानिवृत्त)