आपण आनंदी असावे, समाधानी असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. हे कसे साध्य करायचे या विचारातच आपण असतो त्यासाठी आपण धडपड करत असतो .आपले आनंदी जीवन आपल्याच हातात आहे. परंतु नक्की कोणता मार्ग अवलंबावा हे आपल्या ध्यानी येत नाही. त्यासाठी Practicing the power of now या पुस्तकाचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल.
आपल्या प्रत्येकाच्या संग्रही असावे व यातील कथन केलेल्या पद्धती प्रत्येकाने आचरणात आणाव्या अशा Practicing the power of now या इंग्रजी पुस्तकाचा हा सारांश आहे. हे अध्यात्मिक पुस्तक अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. या पुस्तकाची ताकद शब्दांमध्ये वर्णन करणे कठीण आहे. हे पुस्तक आपल्याला आपल्या विचारांच्या पलीकडे नेऊन ठेवते व आनंदी (मुक्त) जीवन म्हणजे काय हे लक्षात येते.
एकहर्ट टोले यांनी लिहिलेले हे पुस्तक प्रकाशीत केले आहे योगी इम्प्रेशनस, मुंबई यांनी. या पुस्तकामध्ये काही विशिष्ट पद्धती व युक्ती दिल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने आपल्या स्वतः मधील कृपा,समाधान व हलकेपणा (सहजपणा) याची प्रचिती येते. हे पुस्तक पंधरा भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. लेखकाच्या म्हणण्यानुसार पुर्ण विश्वातून लोकांचे ‘आपल्या मध्ये खूपच सकारात्मक बदल झाले आहेत’ असे अभिप्राय आले आहेत. या पुस्तकात रोजच्या जीवनात अवलंबण्याच्या पद्धती सहज व सोप्या भाषेत सांगितल्या आहेत. लेखकाने या पुस्तकाचे लेखन तीन भागात केले आहे पैकी आज आपण प्रथम भागाचे म्हणजे “वर्तमानात रहाण्याची शक्ती ” या भागाचा सारांश पहाणार आहोत.
वर्तमानात रहाण्याची शक्ती
योग्य किंवा उत्तम उपयोग केला तर आपल्याजवळ “मन” हे उत्कृष्ट साधन आहे. याच मनाचा चुकीचा वापर केल्यास ते घातक व नुकसानकारक आहे. आपण मन चुकीचे वापरतो असेही नाही, मुळात आपण ते वापरतच नाही.मनच आपल्याला वापरते. ‘आपण म्हणजे आपले मन’ असा आपला भ्रम/समज असतो आणि मनच आपला पुर्ण ताबा घेते. स्वतःची मनापासून मुक्तता मिळविणे, आपल्या आनंदी (मुक्त) जीवनासाठी आवश्यक आहे.त्यासाठी काही पद्धती अवलंबिल्या पाहिजेत, सवय केली पाहिजे. तुमच्या डोक्यातील ध्वनी कडे लक्ष द्या. कोणताही विचार करू नका, तटस्थपणे लक्ष द्या. सतत वर्तमानात रहा. तुमच्या प्रत्येक हालचालीकडे व श्वासाकडेही पूर्ण लक्ष असू दे. उदा. तुम्ही हात धुवत असाल तर प्रत्येक हालचालीकडे/ जाणीवेकडे लक्ष द्या, साबणाच्या सुवासाकडे लक्ष द्या. आपला स्वतःचा अहंकार आपल्याला वर्तमानात राहू देत नाही. जोपर्यंत आपण आपल्या मनाच्या ताब्यात असतो तोपर्यंत आपल्याला वर्तमानात राहता येत नाही. वर्तमानात राहणे हीच आनंदी (मुक्त) जीवनाची गुरुकिल्ली आहे. या क्षणाला, माझ्यामध्ये, माझ्या अंतरंगात काय चालू आहे? हा प्रश्न स्वतःला विचारण्याची सवय लावा. फक्त निरीक्षण करा. कोणतेही अनुमान काढू नका.
शरीर व मन एक झाले की “भावना” निर्माण होतात. मनाचे शरीरावरील परिवर्तन म्हणजे भावना. अस्वस्थता(unease), काळजी(worry), चिंता(anxiety),निराशा(nervousness),ताण( tension),भिती(dread),अकारण भीती/तिरस्कार(phobia ) इत्यादी रुपात भिती आढळून येते. आता काय घडत आहे? पेक्षा “काहीतरी घडणार आहे” अशी मानसिक भीती नेहमी असते त्यामुळे anxiety gap तयार होते व ती कायम बरोबर राहते. तुम्ही वर्तमानाशी झुंज देऊ शकता परंतु भविष्यकाळाशी नाही भितीची कारणे अनेक असू शकतात जसे की, हरविण्याची भिती,अयशस्वी होण्याची भिती, दुखावले जाण्याची भिती, मृत्यूची भिती, विनाशाची भिती. मृत्यूची भिती तर एखाद्या कोपऱ्यात असतेच. या सर्वातून बाहेर पडायचे असेल तर वर्तमानात राहायला शिका. आत्ताच्या क्षणाला हो म्हणा. भूतकाळात काही घडले नाही, वर्तमानात घडणार आहे,भविष्यात काहीच घडणार नाही. जे काही असेल ते आत्ताच.ज्या क्षणाला हे समजेल तो क्षण वर्तमानातील असेल.
स्वनिरीक्षणाने तुम्ही आपोआप वर्तमानात राहताल. ज्या क्षणाला तुम्हाला जाणवेल की आपण वर्तमानात नाही त्याच वेळी तुम्ही वर्तमानात असाल. ज्ञानी व्यक्तींचा भर नेहमी वर्तमानात राहण्यावर असतो. ते वेळेबाबत जागृत असतात. ते clock-time चा वापर करतात परंतु psychological-time पासून ते मुक्त असतात. व्यवहारातील पैलु साध्य करण्यासाठी वापरलेला वेळ म्हणजे clock-time उदा. एखादे ध्येय साधण्यासाठी वापरलेला वेळ.परंतु ध्येय साध्य झाल्यानंतर भविष्यात काय आनंद /समाधान वगैरे असेल याचा विचार करत राहणे म्हणजे psychological-time. जेव्हा तुम्ही सामान्य स्थितीत (नॉर्मल स्टेट) काम करता तेव्हा तुमच्या मधील अगणित कार्यक्षमता की जी वर्तमानात लपलेली असते ती अस्पष्ट होते .परंतु psychological time
मध्ये हे सर्व हरवते,कमी होते. बराच काळ भूतकाळात राहिल्यामुळे, वर्तमानात न राहिल्याने तुमच्या कार्याची गुणवत्ता रहात नाही. तुमचे “जीवन” किंबहुना “जीवन परिस्थिती” म्हणजे psychological time,past and future. जीवन परिस्थिती म्हणजे ‘time’ जीवन म्हणजे ‘now”.जीवन परिस्थिती म्हणजे ‘मन” जीवन म्हणजे ‘वास्तव’ तुमचे जीवन अरुंद (छोटे) करा व फक्त वर्तमान क्षणात केंद्रित करा. जीवन परिस्थितीमध्ये अनेक समस्या अडचणी असतात थोडीशीही जागा शिल्लक नसते. परंतु तुम्ही थोडीशी जागा तयार करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ‘जीवन परिस्थिती’ च्या मागे ‘जीवन’ सापडेल,वेड्या मनाच्या बाहेर येतात. वेडे मन जे की तुमची कार्यक्षमता कमी करत होते. जेव्हा तुम्ही समस्या निर्माण करता म्हणजेच दुःख निर्माण करता.मी समस्या कधीच निर्माण करणार नाही असा साधा सोपा निर्धार करा. तुम्ही स्वतःला विचारा की, मी जे काम करत आहे त्यातून मला आनंद सहजता/ हलकेपणा वाटतो का? नसेल तर तुम्हाला ते बदलविण्याची गरज आहे. ज्यावेळी तुम्ही वर्तमान क्षणाचा सन्मान करता तेव्हा दुःख ,भांडण/ झगडा कष्ट सर्व नाहीसे होईल व तुमच्या जीवनात आनंद व सहजता अनुभवता येईल. तुम्ही वर्तमानात जागृत राहून काम करीत असाल तर छोट्यात छोटे काम सुद्धा उत्तम काळजीपूर्वक आणि प्रेमाने करण्याची स्फूर्ती उत्पन्न होईल. तुम्ही केलेल्या कामाच्या यशाकडे (फळाकडे) लक्ष देऊ नका फक्त तुमच्या कार्यावर लक्ष केंद्रित करा. फळ /यश त्याप्रमाणे येईल.हा अतिशय शक्तिमान अध्यात्मिक सराव आहे. वर्तमान क्षणात राहण्याचा राहण्याचा सराव करताना बऱ्याच वेळा वर्तमान हरवतो व तुम्ही आपल्या मनावर येता परंतु सतत प्रयत्न केल्यास हळूहळू वर्तमान तुमची प्रमुख अवस्था होते.
कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही अस्वस्थ, असमाधानी व काळजी मध्ये आहात हे जाणून घ्या. विनाकारण यावर विचार करत बसल्यामुळे तुम्ही वर्तमाना पासून दूर जाता. त्यामुळे आपल्या मानसिक स्थितीचा आपण स्वतःच अभ्यास करण्याची सवय लावा. या क्षणाला मी समाधानी/ स्वस्थ आहे का? या क्षणाला माझ्या अंतरंगात काय चालू आहे? मला कसे वाटत आहे? माझ्या मनात काय विचार चालू आहेत? हे असे प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारत रहा. तशी सवय ठेवा. या प्रश्नांची उत्तरे देऊ नका परंतु ऐका.भुतकाळातील विचारात (अपराधीपणा, गर्व, राग, दोषी इत्यादी) राहू नका. भूतकाळ प्रत्येक क्षणाला मोडून टाका. तो तुम्हाला लागत नाही. वर्तमानात त्याची गरज असेल तरच तो वापरा.या क्षणांमधेच रहा. वर्तमानाची जाणीव ठेवा. तुम्ही घाबरले आहात का? जर – तर चे विचार तुम्हाला त्रास देत आहेत का?ते तुम्हाला भीतीदायक भविष्यकाळ तयार करतात का? भविष्यकाळ तयार करतात का? हे सगळे अवास्तव आहे.तो मनाचा भास असतो.तुमच्या श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या. तुमच्या मधील ऊर्जेला जाणून घ्या. या क्षणाला तुम्हाला काय अडचण आहे? असा विचार करा. वर्तमाना बरोबर झुंज देणे शक्य आहे परंतु भविष्या बरोबर नाही व तसे करू नका. मनाची स्थिती ‘waitting’ मधे ठेवू नका. तुम्ही जर वर्तमानात आहात तर कशासाठी ‘wait’ करायची गरज नाही. वर्तमान कडे लक्ष द्या.तुमची वागणूक, प्रतिक्रिया, विचार, भावना, इच्छा याकडे म्हणजेच वर्तमानाकडे लक्ष द्या. तुम्ही स्वतःला भूतकाळात शोधू शकत नाही. तुम्ही वर्तमानात असल्यावरच स्वतःला शोधू शकता.
मन शांत असायला हवे. मनावरचे भूतकाळातील व भविष्यातील समस्यांचे ओझे खाली उतरवून ठेवायला हवे.(तुमचे ज्ञान सुद्धा) नाहीतर पाहून सुद्धा दिसणार नाही, ऐकून सुद्धा ऐकू येणार नाही. तुम्ही पुर्णपणे वर्तमानात असायला हवे. जीवनामध्ये आपण वर्तमानात असाल तरच आपण आपल्या स्वतःत राहू नाहीतर अतिशय चंचल असे मन आपल्याला अक्राळ-विक्राळ नदीसारखे भरकटत नेईल. शरीरासंबंधी जागृतता/ जाणीव तुम्हाला वर्तमानात ठेवते. ती तुम्हाला वर्तमान क्षणात नेते. असा प्रयत्न करा, सुरूवातीला डोळे बंद करा.( कालांतराने तुम्ही being in the body/शारीरिक अस्तित्व या स्थितीत असाल तेव्हा डोळे बंद करणे आवश्यक नाही.) आता तुमचे लक्ष तुमच्या अंतरंगात केंद्रित करा. जिवंतपणा आहे का? तुमच्या दंडात, हातात, पायात, पावलात, पोटात, छातीत सर्वत्र जिवंतपणा आहे का? सूक्ष्म ऊर्जा संपुर्ण शरीरात पसरली आहे हे जाणवते का?या गोष्टीकडे काहीवेळ लक्ष द्या. त्यावर विचार करू नका फक्त जाणीव घ्या. तुम्ही जेवढे जास्त लक्ष केंद्रित करतात तेवढीच जाणीव जास्त शक्तिमान वाटेल. बाहेरील विचलित करणारे घटक आजूबाजूला नाही याची काळजी घ्या. पाठीचा कणा सरळ ठेवा त्यामुळे तुम्ही सतर्क राहताल.तुमच्या आवडीच्या स्थितीमध्ये ध्यानास बसा. तुमचे शंभर टक्के लक्ष बाहेरील जगाकडे व मना कडे देऊ नका, थोडेफार तुमच्या अंतरंगाकडे हि लक्ष असू देत. या क्षणाला तुमचे लक्ष कोठे आहे याची जाणीव असू दे. तुम्हाला जेव्हा वाटेल व हवे असेल तेव्हा ध्यान करून रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता. आजारपणाच्या सुरुवातीलाच ध्यान करण्यास सुरुवात केल्यास ते खुप परिणामकारक ठरते. सकाळी उठताना तसेच रात्री झोपताना तुम्ही काही वेळ निवांत असायला हवे डोळे मिटा व पाठीवर सरळ झोपा. तुमचे लक्ष शरीराच्या प्रत्येक भागावर- खांदे, हात,पाय,पोट इत्यादी. निदान 15 सेकंद तरी केंद्रित करा व नंतर संपूर्ण शरीरावर लाटेप्रमाणे (तरंग) लक्ष केंद्रित करा.अशा स्थितीत काही काळ रहा.यावेळेस शरीरातील प्रत्येक पेशीत केंद्रीत रहा.
मनाचा निर्मितीक्षम उपयोग- जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर हवे असेल किंवा नवीन कल्पना अथवा मार्ग हवा असेल तेव्हा तुम्ही तुमच्यामधील आंतरिक ऊर्जेकडे लक्ष केंद्रित करा. तुमच्यामधील शांततेकडे बघत जागृत व्हा.थोडक्यात फक्त डोक्याने विचार करू नका पुर्ण शरीराने विचार करा. काही वेळेस पुर्ण शरिराकडे लक्ष केंद्रित करणे जमत नाही अशा वेळेस प्रथम तुमच्या श्वासोच्छवासाकडे लक्ष केंद्रित करा. हळूहळू तुमच्या शरीराकडे तुमचे लक्ष केंद्रित होईल. प्रत्येक श्वासाबरोबर पोटाच्या हालचालीकडे लक्ष द्या. डोळे बंद करा व स्वतःला प्रकाशमान झोतात अनुभवा. या जाणीवेवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा. कोणत्याही इतर प्रतिमेशी जोडू नका.आता तुम्ही तुमच्या अंतरंगात आहात. आता तुम्ही शक्तिशाली वर्तमानात प्रवेश केला आहे.You have accessed the power of now.
सारांश लेखिका–
प्रा. डॉ. राधिका सोमवंशी,
विभाग प्रमुख,
गणित व संख्याशास्त्र विभाग,
नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव. (सेवानिवृत्त)