महाराष्ट्रातील नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील श्री बाबीर देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या (रुई ) थोरातवाडीच्या धनगर पाड्यातील अतिशय नाजूक व हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या सौ.मैनाबाई व बुवाजी पांढरमिसे या दांम्पत्याच्या पोठी प्रकाशचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला.आई वडील दोन्हीही निरक्षर असल्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील गुरुजींनी 1जून ही प्रकाशची जन्मतारीख अंदाजे शालेय रजिस्टरला घातली. 1 जून ही ही शाळेतील गुरुजींनी मला दिलेली जन्मतारीख हेच माझे आईवडील निरक्षर असल्याचा मोठा पुरावा असं प्रकाश सांगतो.कारण आईवडील दोन्हीही निरक्षर असल्यामुळे, माझा जन्म झाला त्यावेळी त्यांनी जन्मतारीख लिहून ठेवली नाही. शाळेत प्रवेश घेताना गुरुजींनी अंदाजे 1जून ही तारीख मला दिली. अंदाजे शालेय रजिस्टरला घातलेली तारीख माझी जन्मतारीख झाली.
श्री बाबीर देवस्थानच्या आजूबाजूला वास्तव्यास असणाऱ्या धनगर पाड्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय मेंढीपालन व त्याच्या जोडीला शेती व्यवसाय करत. धनगरपाड्यात वास्तव्यास असणारे बहुतांश सर्वच लोक निरक्षर. वाडीत शाळेला येणारे दगडे गुरुजी नावाचे शिक्षक सोडल्यास कोणीही साक्षर नाही बहुतांश असंच या धनगर पाड्याचं निरक्षरतेचं विदारक चित्र. अशा या धनगर पाड्यात ना शाळेची इमारत,ना शाळेला खडू अन् फळा. शाळा कुठेतरी एखाद्या रामफळ, चिंचेच्या झाडाखाली, तर कधी मोकळ्या जागेत उघड्यावर भरत असे. इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत शाळेला येणारे दगडे गुरुजी त्यांच्या मर्जीप्रमाणे कधीही येत असत आणि कधीही जात असत. गुरुजी शाळेला आले तरी ते विध्यार्थ्यांना शिकवण्या ऐवजी रामफळ, चिंचेच्या झाडाखाली शर्ट काढून झोपण्यातच धन्यता मानत असत. तर कधी धनगर पाड्यातील ‘भावा’ नावाच्या वयोवृद्ध व्यक्तीबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यातच धन्यता मानत असत. दगडे गुरुजी हे अगदी नावात असणाऱ्या दगडाप्रमाणे आम्हा विद्यार्थ्यांना अक्षरशः दगड करून टाकलेलं. माझ्या प्राथमिक शिक्षणाचं असं सारं दगडासारखं विदारक चित्र झालं होतं. इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंतच्या या तीन वर्षाच्या प्राथमिक शिक्षणात ना पेन्सिल, ना पाटी, तर कधी कधी जमिनीवरच हातांनी रेषा मारून,तर कधी अक्षरे कोरून आणि अंख लिहूनच अक्षर आणि अंकाची थोडीफार पुसटशी तोंड ओळख झालेली.
इयत्ता तिसरीतून चौथीला गेल्यावर शाळेला नविन इमारत मिळाली. खडू अन् फळा मिळाला. प्राथमिक शिक्षणाचं दगडीकरण करणाऱ्या दगडे गुरुजींना बदलून लावण्यासाठी माझ्या वडिलांनी म्हणजे बापूंनी व धनगर पाड्यातील इतर मुलांच्या पालकांनी जोरदार प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश सुद्धा आले अन् दगडे गुरुजींची बदली झाली.आम्हाला नविन महादेव कुंभार नावाचे नवीन गुरुजी आले. त्यांनी प्राथमिक शिक्षणाची सुरवात अगदी मुळाक्षरे,बाराखडी, संख्या गणितापासून करून घेतली. वाचन,पाठांतर अंकगणितावर कुंभार गुरुजींनी अधिक भर दिला. माझ्यासह शिकणाऱ्या मुलांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे मोठे काम चौथीच्या वर्षांमध्ये कुंभार गुरुजींनी केले. शाळेत प्रार्थना म्हणतात हे कुंभार गुरुजींमुळे आम्हाला पहिल्यांदा समजले. पहिली ते तिसरी पर्यंतचे शिक्षण अनेक गोष्टींची वाणवाच वाणवा असलेल्या थोरातवाडीच्या धनगर पाड्यात घेतले. याला अपवाद राहिला फक्त इयत्ता चौथीचा तो ही केवळ कुंभार गुरुजींमुळेच.
इयत्ता चौथीनंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश रुई या गावी घेतला. थोरातवाडीच्या धनगर पाड्यापासून रुईला पायी चालत जावे लागत होते. हे अंतर साधारणत: साडेतीन ते चार किलोमीटर. ना रुईला जाण्यासाठी पक्का रस्ता, ना इतर कुठल्या सेवा सुविधा,सगळ्याच गोष्टींची वाणवाच वाणवा. दररोज सात ते आठ किलोमीटरचा पायी प्रवास, ना शाळेत जायला सायकल,ना पायात चप्पल, ना पुस्तकाला दप्तर, ना साहित्य ठेवायला कंपास, ना धनगर वाड्यात वीज आलेली. घरी आल्यावर शाळेतील दररोजचा अभ्यास चिमणीच्या प्रकाशात करावा लागायचा. चिमणीच्या धुराचा अभ्यास करताना खूप त्रास व्हायचा.धुराची काजळी काय असते याचा प्रत्येय सकाळी आंघोळ करताना यायचा.अभ्यास करताना सातत्याने चिमणीच्या धुराचा त्रास अगदी इयत्ता 10 वी पर्यंत होत गेला.
माझे वडील म्हणजे बापू मेंढ्याच्या कळपातील एखादी मेंढी शेळगावच्या आठवडा बाजारात विकून त्या मेंढीच्या विक्रीतून आलेल्या पैशातून मला शाळेसाठी नवीन वह्या,पुस्तके आणि गणवेश घेऊन यायचे. शाळेसाठी घेतलेला नविन गणवेश फाटल्यानंतर त्याला ठिगळं लावून तो वर्षभर कसा वापरता येईल. याकडे माझा अधिक कल असायचा. कधी कधी तर गणवेशाला लावलेले ठिगळ सुद्धा फाटायचे. त्या ठिगळावर पुन्हा दुसरे नव्याने ठिगळ लावलं जाई. गणवेशाच्या त्या मूळ रंगापेक्षा वेगळ्या रंगाचं कापड लावलेलं ठिगळ त्या गणवेशला लावलं जायचं. मला त्या ठिगळाची ना कधी भीती वाटली, ना कधीच लाज वाटली नाही. हे गणवेशाला लावलेलं ठिगळ जणू आपल्या हलाकीच्या परिस्थिती अन् अठरा विश्व दारिद्र्याचं प्रतिकच आहे असच मला वाटायचं. दारिद्र्यच इतकं परकोठीचं होतं कि, संपूर्ण आभाळच फाटलेलं आहे त्याला नेमकी कुठं कुठं ठिगळं लावायचं. माझे प्रेरणादायी प्रेरणास्थान असणारे गुरुवर्य कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ सरांच्या शब्दात सांगायचं झालं तर ” गरिबी अन् दारिद्र्य या लपवायच्या जागा नसतात. ना त्या लपवता येतात, ना त्या झाकता येतात.” अडसूळ सरांचे माझ्या कॉलेज जीवनात मी ऐकलेल्या त्या वाक्यांचा अन् शब्दांचा तंतोतंत प्रत्येय आज आयुष्याच्या भूतकाळात मागे वळून पाहताना त्याकाळी मला येऊन गेला.
रुई येथील जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण विद्या मंदिर या प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण घेतले. या तीन वर्षांमध्ये विश्वनाथ सुपुते आणि अर्जुन पाटील गुरुजी यांनी मला शिकवले. घरापासून शाळेचे येण्या जाण्याचे अंतर आठ किलोमीटरचे होते. पायपीट ही पाचवीलाच पुजलेली. आठवड्याचा बाजार आणण्यासाठी जी पिशवी वापरली जायची. अगदी त्याच पिशवीत दप्तर घेऊन मी शाळेला जायचो. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील ओढा ओलांडताना खूपच त्रास व्हायचा. कपडे आणि दप्तर डोक्यावर घेऊन पाणी वाहत असलेल्या ओढ्यातून मार्ग काढावा लागे.तर कधी कधी ओढ्यावरील रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला अशा स्थितीत ओढा पार करावा लागायचा. जाण्यासाठी दुसरा कुठला मार्ग नव्हता.त्या ओढ्यात खूप चिखल गाळ असायचा. त्याचा अंदाज न आल्यानं कपडे आणि दप्तर अनेकदा पाण्यात पडायचं.मग कपडे आणि दप्तर वाळवतच शाळेत जावं लागायचं. उशीर झाल्यामुळे गुरुजींचा मार खावा लागायचा. अशा साऱ्या पावसाळा आणि रस्त्यावरील ओढ्याच्या त्या आठवणी आजही मनातून जाता जात नाहीत.रस्त्याने जाता येता तो ओढा आला की,त्या आठवणी पुन्हा जाग्या होतात.
इयत्ता सातवी नंतर माध्यमिक शिक्षणासाठी इयत्ता आठवी ते दहावी करिता श्री बाबीर विद्यालय रुई येथे प्रवेश घेतला. प्राथमिक स्तरावरून माध्यमिक स्तरावर कडे जाताना ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या. हायस्कूलला आल्यानंतर प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक त्यांच्याकडून मिळणारे ज्ञान घेत गेलो. मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील सर, धनंजय गावडे सर, सुनील दराडे सर, तानाजी मराडे सर, गौतम सोनवणे सर, चंद्रशेखर पवार सर, अर्जुन मारकड सर या गुरुवर्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर इयत्ता दहावी अगदी जेमतेम मार्कांनी उत्तीर्ण केली.
इयत्ता दहावी नंतर अकरावी कला या शाखेसाठी यशवंतराव चव्हाण ज्युनिअर कॉलेज फलटणला प्रवेश घेतला. अकरावीला तेथे दुसरा नंबर आला.इयत्ता 12 वी च्या अभ्यासामुळे व डी.एड करायचे हे स्वप्न मनाशी बाळगून फलटण वरून इंदापूरला कला वाणिज्य विद्यालयात इयत्ता बारावीला प्रवेश घेतला. वर्षभर मन लावून अभ्यास केला. इयत्ता बारावीला ठाकूर सर,धापटे सर,भामरे सर, देशपांडे मॅडम, काळे सर, शिंदे सर यांनी खूप छान शिकवले. त्याचा फायदा बारावीला झाला. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 70 टक्के गुण मिळाले. आवडता विषय असणाऱ्या राज्यशास्त्र विषयाने मात्र धोका दिला. राज्यशास्त्र 80- 85 मार्क पडण्याऐवजी फक्त 65 मार्क मिळाले. राज्यशास्त्रात कमी पडलेल्या गुणांमुळे अवघ्या एका मार्कांनी डी.एडला नंबर लागला नाही. मनी बाळगलेले डी.एड चे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.
इयत्ता बारावी नंतर बारामतीच्या नामांकित असणाऱ्या विद्याप्रतिष्ठान महाविद्यालयामध्ये मी बीए. ला प्रवेश घेतला. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने बारामती सारख्या शहरांमध्ये राहण्या खाण्याचा खर्च झेपणारा नव्हता. घरून कुठल्याही प्रकारे आर्थिक हातभार मिळणार नाही याची मला पूर्ण कल्पना होती. माझ्या गावातील मुलं एमआयडीसीतील पियाजो कंपनीत कामाला होती. त्यांच्या रूमवर राहून कॉलेज करायचं. सुट्टीच्या दिवशी पियाजो कंपनीत काम करायचं असं मनाशी ठरवून कॉलेज पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चौधरवस्ती येथे राहण्यासाठी आलो. दररोज कॉलेजला चार किलोमीटर पायपीट करत जायचो व चार किलोमीटर पायपीट करत परत यायचो. असा रोजचा 8 किलोमीटरचा पायी प्रवास. लहानपणापासून अगदी पायपीट करणं तसं पाचवीलाच पुजलेलं. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी एमआयडीसीतील पियाजो कंपनीमध्ये रुई गावचे सतीश मामा कोकरे यांच्या कॉन्ट्रॅक्ट होते. त्यांच्याकडे मी दोन शिपमध्ये काम करायचो. यातून महिन्याचा राहण्या- खाण्याचा खर्च कसा बसा भागायचा.
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयांमध्ये गुरुवर्य म्हणून लाभलेल्या प्राचार्य डॉ. अरुण अडसूळ सर, प्रा.गडकर सर,गांगुर्डे सर, घाडगे सर, भामे सर,चौधर सर,ओगले सर,खिलारे सर, सानप सर, वळवी सर या गुरुवर्यांनी विषय शिक्षणाबरोबरच जीवनाला दिशा देण्याचे दिशादर्शक असे अवांतर ज्ञान सुद्धा दिले. कॉलेज जीवनात या गुरुवर्यांकडे पाहून त्या काळात प्राध्यापक होण्याचे स्वप्न पडायचे. त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करायचे ठरवले. बीए च्या प्रथम वर्षाला असतानाच महाविद्यालयात नवीन प्राचार्य म्हणून डॉ. अरुण अडसूळ सर यांची नियुक्ती झाली. त्यांनी प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख करून देताना त्यांनी ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये असणारे न्यूनगंडाची असणारी भावना पहिली काढून टाका. नकरात्मकतेला तिलांजली देऊन सकारात्मकतेचा अंगीकार करा. तुम्हा तरुणाईच्या सळसळत्या रक्ताला ‘अशक्य’ असं काहीच नसतं. लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक विद्यार्थ्यांनो तुमच्यामध्ये आहे. तुमचं मन, मेंदू,मनगट आणि मनक्यामध्ये असणारी धमक तुम्हाला आयुष्यात सर्वोच्च स्थानी नेहील. येत्या पाच वर्षात तुम्ही अगदी झपाटल्यासारखा अभ्यास करा. आयुष्याची ही पाच वर्ष तुमच्या भविष्याची पुढील 35-40 वर्षे तुम्ही कोण असाल? हे तुम्हाला सांगत राहतील. त्यासाठी अगदी जीवाचं रान करा. दिवस-रात्र अभ्यास करा. या पाच वर्षात खडतर कष्ट घेणाऱ्यांना यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. अशा दहा मिनिटाच्या मार्गदर्शनातून अडसूळ सरांनी जी प्रेरणादायी ऊर्जा दिली. त्याच प्रेरणे भारावून जाऊन अगदी झपाटल्यासारखा अभ्यास केला. सुसज्ज असणाऱ्या ग्रंथालयातून नामांकित लेखकांची नवनवीन पुस्तकं, आत्मचरित्र वाचली. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या यशस्वी माणसांच्या यशोगाथा वाचल्या. त्याच यशोगाथांनी माझ्या जीवनाला दिशादर्शक मार्ग दाखविला.अडसूळ सरांचे त्या 10 मिनिटांच्या प्रेरणादायी विचारांनी माझ्या आयुष्याला दिशा दिली. इतिहास विषय स्पेशल ठेवून मी बी.एची पदवी चांगल्या गुणांनी पूर्ण केली.माझ्या शैक्षणिक जडणघडणीत बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान महाविद्यालयाचा आणि मला लाभलेल्या गुरुवर्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. असं मी मोठ्या अभिमानाने सांगतो.
बीए नंतर एम ए साठी पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागांमध्ये जाऊन प्रवेश घ्या. तेथे एम ए बरोबरच स्पर्धा परीक्षा, सेट नेट करता येईल असं एफ वाय मध्ये शिकत असताना गुरुवर्य भामे सरांनी वारंवार सांगितलं होतं. तेंव्हापासून एम ए ला पुणे विद्यापीठात जायचे वेध लागले होते. तो दिवस जवळ येऊन ठेपला. बारामतीच्या सात मित्रांना सोबत घेऊन पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात एम ए ला प्रवेश घेतला. बारामतीहून पुण्याकडे जाताना अर्थकारणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला.
कॉलेज जीवनात आर्थिक टंचाई भेडसावू नये म्हणून त्यावर मात करण्यासाठी मी बारामतीच्या एमआयडीसीतील पियाजो कंपनीत रविवारची सुट्टी, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करून पदवीचे शिक्षण पूर्ण करता आले. घरापासून दूर असणाऱ्या पुण्यासारख्या विद्येच्या माहेर घरात आपला निभाव कसा लागणार? हा भला मोठा प्रश्न घेऊन पुण्याकडे वाटचाल केली.विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे विद्यापीठामध्ये आल्यानंतर राहण्याचा आणि खाण्याचा भला मोठा प्रश्न डोळ्यासमोर होता. प्रा. गणेश भामे सरांकडून ऐकलं होतं विद्यापीठामध्ये गोरगरीब मुलांसाठी कमवा आणि शिका योजना आहे. या कमवा व शिका योजनेमध्ये तिथे गेल्यानंतर प्रवेश घ्या.प्राचार्य अडसूळ सरांनी बीए च्या निरोप समारंभच्या वेळी सांगितलं होतं विद्यापीठात गेल्यावर होस्टेलची या इतर कोणतीही अडचण आली तर मला अवश्य फोन करा.अडचणीतून निश्चितपणे मार्ग काढला जाईल. हे सर्व विद्येच्या माहेरघरात आल्यावर आठवत होतं.15 दिवसांनी कमवा व शिका योजनेला प्रवेश मिळाला. कमवा शिका योजनेमध्ये सकाळी सहा ते नऊ असे तीन तास काम करावे लागत असे. प्रति तास 14 रुपयांप्रमाणे 56 रुपये दिवसाला मिळत असे. त्याच्यातून दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला. कमवा व शिका योजनेच्या माध्यमातून असलेल्या वस्तीगृहामध्येही राहण्यासाठी प्रवेश मिळाला आणि राहण्याचाही प्रश्न सुटला. त्यावेळी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक तेज निवळीकर सर हे एखाद्या देवदूता सारखे आमच्या आयुष्यात आले. दोन वर्ष त्यांचे मौलिक मार्गदर्शन आम्हाला लाभले. इतिहास विभागामध्ये प्रा. उमेश कदम, दीपक गायकवाड, राजा दीक्षित, सुषमा वर्मा, राधिका सेशन, सुमित्रा कुलकर्णी, रेखा रानडे यांचे मार्गदर्शन लाभले. इतिहास अभ्यास व संशोधनाला दिशा मिळाली. दोन वर्षाचची एम ए ची पदवी चांगल्या गुणांनी संपादित केली.
बीएड साठी ची सीईटी परीक्षा दिली होती. सीईटीला चांगले गुण मिळाले. अनुदानित असणाऱ्या बार्शीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मला बी. एड साठी प्रवेश मिळाला. तेथे शिंदे सर, वाघमोडे सर, भिलेगावकर सर, शिखरे सर, पाटील सर, पवार मॅडम यांचे बीएड साठी मार्गदर्शन लाभले. एक वर्षाच्या बीएड ची पदवी चांगल्या गुणांनी पूर्ण केली. बी.एड केल्यानंतर मी बारामती या ठिकाणी तुळजारामचतुरचंद महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर विभागाला अध्यापनाचे काम सुरू केले.2010 साली इतिहास विषयातून सेट परीक्षा पास झालो. 2015 साली पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागामध्ये पीएच.डी साठी प्रवेश घेतला. माझा पीएच.डी चा विषय ” पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा इतिहास” (इ.स.1917 ते 2004) होता. या विषयावर मी गुरुवर्य डॉ.श्यामराव घाडगे सरांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी चे काम सुरू केले. पिडीसीसी बँकेच्या या संशोधनासाठी बँकेचे माजी अध्यक्ष व इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मा. दत्तात्रय मामा भरणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आशिया खंडातील एक अग्रगण्य गणली जाणारी सहकारी बँक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लोकोयोगी कार्याचा ठसा भारतासह जगभरात उमटलेला आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात स्थापन झालेल्या या पीडिसिसी सहकारी बँकेने नेत्रदीपक अशी प्रगती केलेली आहे. पीडीसीसी बँकेचे कार्य भारतीय राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अजित दादा पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय मामा भरणे, रमेश आप्पा थोरात व इतर आजी-माजी संचालक यांच्या यांच्या नेतृत्वाखाली चालते. बँकेच्या कार्यात कुठेही राजकारण आणले जात नाही.राजकारण विरहित कार्य करताना या बँकेने आजवर शेतकरी, कामगार शेतमजूर, उद्योजक,छोटे मोठे लघु -कुटीर व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक,महिला,आदिवासी या सर्वांसाठी अर्थवाहिनी,जीवन वाहिनी म्हणून जे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याचा फायदा सभासदांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना कशाप्रकारे होतो आहे. हे मी माझ्या पीएच.डी संशोधनाच्या माध्यमातून ठळकपणे मांडले आहे. आशिया खंडातील एक अग्रगण्य सहकारी बँक म्हणून पिडीसीसी बँकेने जे आदर्शवत असे उल्लेखनीय कार्य करते आहे. ते माझ्या पीएच.डी संशोधनाच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिलेला आहे.
मी आंतरराष्ट्रीय परिषदांमधून 3 शोध निबंध, राष्ट्रीय परिषदांमधून 11 शोध निबंध, राज्यस्तरीय परिषदांमधून 16 शोध निबंध असे एकूण 30 शोधनिबंध वाचन व प्रकाशित केले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचा कायमस्वरूपी वक्ता म्हणून मला 2014 साली मान्यता मिळालेली आहे. या बहि:शालच्या माध्यमातून आजवर जवळपास 825 पेक्षा जास्त व्याख्याने विविध शाळा,महाविद्यालये व गावांमधून विविध विषयांवर दिली आहेत. 2019 साली मला राज्यस्तरीय उत्कृष्ट युवा व्याख्याता पुरस्कार मिळाला आहे. 2018 ते 2023 या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचा इंदापूर तालुका विभागीय समन्वयक म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य जनजागृती विषयी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून उल्लेखनीय काम केल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने माझा गौरव केला आहे. स्वच्छ वारी, स्वस्थ वारी,हरित वारी,निर्मल वारी,लोकशाही वारी च्या माध्यमातून आळंदी ते पंढरपूर पालखी वारीमध्ये संघनायक म्हणून काम केले आहे. त्याचाही गौरव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केला आहे.
वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम करत असताना राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ,परीक्षा मंडळ,बहि:शाल शिक्षण मंडळ,आजीवन अध्ययन, प्रौढ निरंतर शिक्षण मंडळ, स्पर्धा परीक्षा विभाग, शैक्षणिक सहल विभाग, स्पर्धा परीक्षा, शिस्त विभाग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय स्वरूपाचे काम केले आहे. प्रकाशकिरण च्या माध्यमातून विविध लेख व चारोळ्यांचे लेखन सुरू आहे.
इंदापूर तालुक्यातील थोरातवाडी ( रुई) सारख्या धनगर पाड्यातील आई-वडील निरक्षर असलेल्या आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असलेल्या, एका सामान्यातील सामान्य कुटुंबातील प्रकाशने शिक्षणासाठी कमालीची जिद्द बाळगून केलेला हा सारा प्रवास थक्क करण्यासारखा आहे. माझ्या शैक्षणिक आयुष्याच्या प्रवासात प्रेरणादायी प्रेरणास्थान असणाऱ्या कुलगुरू अरुण अडसूळ, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्रा. तेज निवळीकर सरांसारखी दिग्गज माणसं भेटल्यामुळे, त्यांचे दिशादर्शक मार्गदर्शन लाभल्यामुळे, त्यांनी माझ्या शिक्षणाला दिशा दिल्यामुळे मला हा शैक्षणिक प्रवास साकारता आला.असं म्हटलं जातं कि, अंधःकाराला छेदत छेदत प्रकाशचा उदय होतो. या प्रकाशाने पृथ्वीला उजळा देताना पृथ्वीवरील सजीवसृष्टीला जसा उजाळा दिला.तसा जगण्याचा नवा आयामही दिला आहे. अंधाराला तुडवत तुडवत प्रकाशाच्या दिशेनी वाटचाल करणारी माणसं आपल्या कार्यकर्तृत्वाचा जोरावर लखलखीत प्रकाश निर्माण करतात.अगदी नावात असलेल्या प्रकाशने प्रकाशप्रमाणे आयुष्याला सामोरे जाताना आलेल्या खडतर परिस्थितीला अक्षरशः तुडवत तुडवत शून्यातून विश्व् निर्माण करण्यासाठीचा जो शैक्षणिक ज्ञानाच्या क्षेत्रात प्रकाश निर्माण केला आहे. तो निश्चितपणे लखलखीत अन् दैदीप्यमान असा आहे.तो आजच्या तरुणाईला निश्चितपणे प्रेरणादायी प्रेरणा देऊन जाईल. प्रकाशने आपल्या नावाप्रमाणेच ज्ञानाच्या क्षेत्रात प्रकाश निर्माण केला आहे.धनगर पाड्यातील पहिला पीएच.डी, डॉक्टरेट होण्याचा सर्वोच्च असा बहुमान मिळवला आहे.याचा थोरातवाडीच्या धनगरपाड्यातील ग्रामस्थांना सार्थ अभिमान वाटतो आहे. प्रकाशच्या या उज्वल यशाबद्दल पंचक्रोशीतील मित्रांनी,गावकऱ्यांनी त्याचा नागरी सन्मान सत्कार केला.
प्रकाशने आपल्या या शैक्षणिक यशाचे श्रेय ज्ञानाच्या क्षेत्रात वाटचाल करताना भेटलेल्या गुरुवर्यांना व आपल्या आई -वडील, आजोबा, चुलते -चुलत्यांना, भावा- बहिणींना, मित्र परिवाराला दिले आहे. प्रकाशचा हा सारा शैक्षणिक प्रवास शून्यातून विश्व निर्माण करणारा आहे. आजच्या तरुणाईला प्रेरणादायी प्रेरणा व दिशा देणारा आहे.
डॉ. प्रकाश बुवाजी पांढरमिसे
इतिहास अभ्यासक
मो. नं.9423639796
इमेल आयडी prakash.pandramise@gmail.com