अकोले:
‘कोविड कालखंडामध्ये पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणव्यवस्था स्वीकारण्यात आली. परीक्षा ऑनलाईन झाल्या. गुगलच्या मदतीने विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाले. आता विद्यार्थ्यांना ऑफलाईन परिक्षा नको वाटतात. मोबाईलने त्यांच्या मनाचा ताबा घेतला आहे. व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आदी समाजमाध्यमांमुळे विद्यार्थी करिअरच्या मुख्य ध्येयापासून भरकटत आहेत. त्यामुळे समाजाने आता अधिक गांभीर्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची व क्षमतेची काळजी घ्यायला हवी’, असे प्रतिपादन मानसशात्रज्ञ व संमोहनतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी केले.
अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाच्या नालंदा स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र व करिअर कट्टा या उपक्रमाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्ट्रेस मॅनेजमेंट अँड सक्सेस माईंडसेट’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांची अभ्यासात चांगली प्रगती दिसत नाही असा पालकांचा सूर आहे. परंतु आपल्या पाल्याशी सुसंवाद ठेवून त्याला मानसिक आधार देण्याची जबाबदारी पालकांची आहे. अवास्तव अपेक्षांचे ओझे पालकांनी विद्यार्थ्यांवर लादायला नको. विद्यार्थ्यांनीही चांगला आहार घ्यावा, व्यायाम करावा, व्यवस्थित झोप घ्यावी, इंटरनेट, मोबाईल गरजेपुरतेच वापरावे. त्यातून अभ्यासासाठी चांगली मानसिकता तयार होईल. स्वाध्यायासाठी वेळ देता येईल. महाविद्यालयातील तासिका नियमित कराव्यात. काही समस्या, अडचणी असतील तर शिक्षकांना त्या विचाराव्यात’.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना डॉ. गायकवाड यांनी सविस्तर उत्तरे दिली. त्यांच्या मानसिक समस्या जाणून घेऊन त्यावर उपायही सुचवले. कार्यशाळेतून ऊर्जा मिळाल्याने, उत्साह वाढल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. दुपारच्या सत्रात डॉ. गायकवाड यांनी १२ वी (विज्ञान) या वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
स्वागत व प्रास्तविक उपप्राचार्य डॉ. संजय ताकटे यांनी केले. त्यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. करिअर घडवताना चांगल्या मानसिक स्वास्थ्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. तसेच पाहुण्यांचा परिचयही करून दिला.
दोन सत्रांमध्ये संपन्न झालेल्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने अशा कार्यशाळा नियमित आयोजित करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी सांगितले.
सूत्रसंचालन प्रा. सुरेश मुठे व कु. तनुजा शेटे यांनी केले. आभार नालंदा स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र व करिअर कट्टा या उपक्रमाचे समन्वयक प्रा. संदेश कासार यांनी मानले.
महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.