तशी माझी जन्मतिथी माहीत नाही, जन्मदिवस गुरुवार. आदरणीय गुरुजनांनी 1जुन चा मुहूर्त ठरवून शाळेचा श्रीगणेशा केला. शेतकरी कुटुंबात, गरिबीमध्ये जन्मलो वाढलो. तथापि आई-वडिलांच्या चांगल्या संस्काराची, ज्ञानाची व प्रेमाची आणि कष्टाची शिदोरी होती.प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षण खडतर झाले ऊन, पाऊस याची तमा न करता शाळेला पाई जाणे, साधनसामग्रीची अडचण असतानाही घरापासून लहान वयात दूर राहून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाचा हा टप्पा पार झाला.(1986)
आई-वडील अशिक्षित असतानाही सुज्ञपणाने मला पुढील शिक्षणासाठी बार्शी येथे विज्ञान शाखेला दाखल केले. या नव्या अनोळखी मोठ्या शहरात माझ्यासारखा एक खेडूत पोरगा शासकीय वस्तीग्रहतील सवलतीत, थोड्या शिष्यवृत्तीच्या रकमेत व आई-वडिलांच्या अपार कष्टांच्या पूंजी मधून शिक्षण करू शकला. त्यावेळच्या अडचणीच्या आठवणीने मन खोलात रुतते. वारंवार भासणारी आर्थिक चणचण, पुढारलेल्या पासूनचे अंतर व संकुचितपणा वाटत होता, परंतु एक वेगळी गुर्मी होती. तीच मला पुढे घेऊन गेली आणि पदवी करिता कोल्हापूरला कृषी महाविद्यालयात प्रवेशासाठी उपयोगी पडली(1988).
हा टप्पा तसा निर्णायक होता. सोबतचे सवंगडी वेगवेगळ्या भागातील असले तरी बरेचसे माझ्या परिस्थितीशी, विचारांची , आलेल्या अडचणी व उद्याची स्वप्ने याबाबत एकरूप होते.ना कसला हिशोब ना कसली कमतरता जे होते ते सर्वांचे…. सामुदायिक….
आलेली मनीऑर्डर, आणलेले साहित्य , वह्या नोट्स,कपडे,… इ
हा टप्पा पुन्हा कदापिही भेटणार नाही हे दुःख. कोल्हापूर मध्ये माझ्या वडिलांचे अचानक रात्री दहा वाजता होस्टेलवर येणे हे माझ्यासाठी सर्वात आश्चर्यकारक व एका वडिलांचे काळजीच मूर्तिमंत प्रतीक होतं. मुलगा कुठे शिकतो, कुठे राहतो, कोल्हापूर कोणत्या दिशेला आहे (घरापासून तीनशे किलोमीटर) कसे पोहोचणार याबाबत काहीच माहिती नसतानाही, मनातील ओढीला मात्र खात्री होती. माझे मित्र, नातेवाईक यांचे सहकार्याने हाही टप्पा पार झाला आणि सर्वात प्रथम मी होस्टेल सोडून काहीशा तात्पुरत्या नोकरीच्या ठिकाणासाठी बाहेर पडलो पण पदवी दरम्यान ठरलेल एमपीएससी चं स्वप्न होतं म्हणून थांबलो. पुढील पदवीचा टप्पा पूर्ण करण्याचे निश्चित झाल्याने कृषी विद्यापीठ राहुरी येथे एमएससी, कृषी फुड सायन्स अँड टेक्नॉलॉजी करीता प्रवेश घेतला.(1992)
हा कालावधी अत्यंत धावपळीचा, तान तणावाचा, आव्हानांचा,भितीचा होता तसा यशाचाही होताच.
गावाकडील गृहकलह, भावकी तणाव व त्यासाठी खर्च झालेला वेळ व आलेला ताण महागात पडला, एमपीएससी (MPSC) कडे दुर्लक्ष झाल्याने प्रशासकीय सेवेचे स्वप्न लांबणीवर पडले. या काळात स्वयंसिद्ध होणे, जबाबदारी, अडचणीस सामोरे जाणे लोकांची खरी ओळख या गोष्टींची जाण होऊ लागली. माझा मित्र परिवार सदैव पाठीशी खंबीरपणे राहिला. एम.एस.सी मध्ये माझ्या विभागात प्रथम राहूनही, चांगले गुणांकन मिळवूनही आता कमविणे आवश्यक झाल्याने पुढील संभाव्य एचडी चे CFTRI मैसूर चे स्वप्न मात्र सोडावे लागले. असो त्यामुळेच पुढील प्रवास जामदार घडला असावा. माझ्या आदरणीय प्राध्यापकांनी सुचविल्या नुसार शिरूर घोडनदी येथील एका महाविद्यालयात शिक्षकाची प्राध्यापक नोकरी करता आली. नोकरीच्या कालावधीमध्ये अध्ययनास सोबतच अभ्यास करणे, महाविद्यालयातील विविध समित्यांवर काम करणे, स्पर्धापरीक्षांची वर्ग घेणे सुरू होते. त्याच दरम्यान एमपीएससी द्वारे माझी प्रशासकीय सेवेकरिता निवड झाल्याने माझ्या आईवडिलांचे ‘पोरगा मोठा साहेब व्हावा’ हे स्वप्न पूर्ण झाले असावे.
एमपीएससी(MPSC) निवडी पूर्वी लग्नाचे शाब्दिक ठरलेही होतेच. माझी सहचारिणी सुवासिनी( सुहासिनी तिचे नाव) ठरली हेही असावे.
पुढे मे 98 मध्ये आम्ही विवाहबंधनात गुंफले गेलो. प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण औरंगाबाद, नाशिक, मुंबई येथे होऊन खऱ्या अर्थाने सेवेची सुरुवात नाशिक येथून झाली. पुढे अहमदनगर पुन्हा नाशिक, पुणे या ठिकाणी विविध विभागात सेवा केली… करत आहे. या कालावधीमध्ये जे सहकारी, वरिष्ठ, मित्र लाभले त्यांचे सहवासाने शासकीय कामकाज, शिस्त, उत्तरदायित्व, संसार, गणगोत, समाज याबाबत आपले योगदान, जबाबदाऱ्या या बाबतचा उलगडा होत गेला. आपण समाजासाठी खूप काही आहोत परंतु समाजातील एक सूक्ष्म आहोत,कोणीतरी मोठे,काहीतरी वेगळे असे काहीही नाही आहोत हे खात्रीने समजले. नोकरीचे कर्तव्य बजावतानाच सामाजिक कार्य, गावाकडे काही उपक्रम, कामे करता आली. अजुनही पुढे करण्याचा संकल्प आहे माझ्या सहजचरणी ने या कालावधीत खंबीरपणे साथ देऊन वेळोवेळी माझ्या जन्मजात भावनिक मनाचे सांत्वन करत धीर दिला. कन्यारत्न स्नेहा(मम्मीची साक्षी, पप्पाची स्नेहलता, आजीची मोहर) पुत्ररत्न यश( पप्पाचा गोलू, , आजोबांचा बलु, आजीचा तात्या) यांच्या जन्माने आनंदाचा शिरपेच गाठला. माझ्या आई भाऊंना यापेक्षा वेगळे अजून काही कधीही नकोच होते.
सुखी संसार,सर्वांचा स्नेह, बहिणींचा एकोपा, वडिलांचे खंबीर व मार्गदर्शक छेत्र, आईची प्रेमळ काळजीची किनार व समाधान खूप पुरेसे ठरलंय. करारी परंतु सदैव आदर्शवत असलेल्या,
न डगमगता पाठबळ देणाऱ्या, स्वतः कष्ट यातना सहन करुन आम्हाला सुखाच्या सावलीत बसविणाऱ्या माझ्या भाऊंच (माझे वडील)त्यांच्या शंभरीत आम्हाला सोडून जाणं हे आम्हाला आजही सहन न होणार आहे…. राहील.
Shri. Maruti Mule is Assistant Director of Accounts & Finance at Finance Department,
Government of Maharashtra