मानवी मन विविध प्रकारच्या भावनांना आणि विचारांना जन्म देते. आपले विचार आणि भावना ह्या विविध प्रकारच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि वासना यांची निर्मिती करतात. मानवी जीवन पूर्णत्वास जात असतांनी पदोपदी इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि वासना यांच्या भोवती ते फिरत राहते. त्यातील काही इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि वासना पूर्ण होतात, काही अर्धवट पूर्ण होतात आणि काही अपूर्ण राहतात. साहजिकच ही पूर्णता आणि अपूर्णता आयुष्यावर आणि व्यक्तिमत्वावर चांगले-वाईट आणि सकारात्मक-नकारात्मक परिणाम दर्शवते. इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि वासना ह्या सर्व एकच आहेत असे समजून आपण कार्य आणि कृती करतो, तेथेच सर्व गफलत होते. या चारही बाबी वरवर सारख्या दिसत असल्या तरी त्यांच्यामध्ये भेद आहे. हा भेद जो पर्यंत आपण समजून घेत नाहीत तो पर्यंत आपल्याला योग्य प्रकारे आयुष्याचे संयोजन आणि समन्वय करता येत नाही. साहजिकच या चार बाबींना योग्य प्रकारे जाणून घेणे आणि त्यांचे योग्य असे व्यवस्थापन करणे आवश्यक आणि अनिवार्य ठरते. प्रस्तुत लेखात इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि वासना काय आहेत, त्यांची निर्मिती कशी होते, त्या कशा प्रकारे समजून घ्याव्यात आणि त्यांचे योग्य असे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत जाणून घेणार आहोत.
मानवी जीवन जितके क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे, तेवढेच ते अनमोल आहे. ह्या मानवी जीवनाचा अर्थ त्याच्या ठायी असलेल्या सुप्त आणि प्रबळ आशा इच्छामद्धे दडलेला असतो. इच्छा म्हणजे काय तर काही तरी मिळविण्याची प्रबळ भावना होय. अशी इच्छा निर्माण होण्यामागे आपल्याला होणारे बाह्य जगाचे आकलन आणि दैनंदिन जीवनात येणारे अनुभव कारणीभूत ठरतात. जेंव्हा बाह्य जगाचे आकलन होते, तेंव्हा आपल्याला अनेक बाबी, घटना आणि गोष्टी याची जाणीव होती. आकलन झालेल्या बाबीचे विश्लेषण होते. या आकलनातून ज्ञानाची निर्मिती होते. साहजिकच बाह्य जगाबाबतचे आकलन आणि ज्ञान हे विविध मानवी इच्छाना जन्म देते. मात्र अशा इच्छा ह्या काहीतरी प्राप्तीसाठी आणि काहीतरी मिळविण्यासाठी निर्माण झालेल्या असतात. लहान मूल जेंव्हा आईच्या कुशीत विसवते तेंव्हा त्याला फक्त प्रेमाची ऊब मिळत नाही तर भीती पासून सुटका मिळते. साहजिकच आपण नेहमी आपल्या आईच्या जवळ असावे अशी त्याला तीव्र इच्छा होत राहते. यासाठी ते कायम प्रयत्नशील राहते. मूल मोठे होते तेंव्हा त्याला विशेष पदार्थ आवडायला लागतात. त्यामुळे त्यांची असे पदार्थ मिळावेत या प्रकारची इच्छा होते. त्या नंतर त्या मुलाचे अनेक मित्र बनतात, त्या सोबत तो खेळायला जातो मग त्यांच्या सोबत खेळायला त्याची इच्छा होते.
साहजिकच मानवी जीवन प्रवास जसा जसा पुढे जातो, त्या प्रमाणे त्याच्या आकलन, माहिती आणि ज्ञान यात भर पडत गेल्याने त्याच्या इच्छा वाढत जातात आणि त्या कधीही न संपणार्याि असतात. एका इश्चेची पूर्तता झाली तरी दुसरी इच्छा समोर उभी असते. साहजिकच इच्छा बाबत दक्ष राहणे आवश्यक ठरते. आपल्या मनात निर्माण झालेली इच्छा आणि त्याचा वस्तुस्थितीशी आणि प्राप्त परिस्थितीशी मेळ घालण्याचे कसब आपल्याला करता येणे आवश्यक असते. आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होयला हवीच, हा आग्रह धरणे सुद्धा सर्वार्थाने चूक आहे. इच्छा ही काळाच्या आणि वस्तुस्थितीच्या पट्टीवर तपासून बघितलेली असावी. इच्छा असेल तर मार्ग दिसेल हे निश्चितच ठीक आहे. परंतु इच्छा आपण एवढ्या वाढवतो की, कोणत्या मार्गाने जायचे याचा बोध होत नाही आणि आपण गडबडून जातो. आपली उदीष्टे आणि ध्येये ही निश्चित असली की अवांतर आणि वाजवी इच्छा गळून पडतात किंवा मागे राहतात.त्यासाठी आपली उदीष्टे आणि ध्येये ही निश्चित आणि पक्की असायला हवीत.
अपेक्षा म्हणजे कोणाकडून काहीतरी मिळेल या बाबतची धारणा आणि समजूत होय. इच्छा ह्या अपेक्षा सारख्या धारणा किंवा समजुती नसतात तर त्या प्रबळ आशा धारणा आणि समजूत असतात. अपेक्षा ह्या मदत, सल्ला, वस्तु, सेवा इत्यादि स्वरुपात असू शकतात. त्यांनी मला पाच हजार रुपये देयाला हवे, ही झाली अपेक्षा, तर त्यांना मला पाच हजार रुपये देयाला हवेच, ही झाली इच्छा. यात फक्त हवे आणि हवेच हे दोन शब्द भेद स्पष्ट करतात. परंतु अपेक्षांचे स्वरूप आणि मागणी ही व्यक्ती निहाय असू शकते. अपेक्षा ह्या मनात बांधलेले आराखडे असतात आणि त्या आशावादावर आधारित असतात. अपेक्षा जेंव्हा काही कारणामुळे पूर्ण होत नाहीत तेंव्हा त्याला उपेक्षा झाली असे म्हणतात. अपेक्षा ह्या अवास्तव आणि अवास्तववादी असू शकतात. त्यामुळे बर्यााच वेळा त्या पूर्ण होण्यास अडथळे निर्माण होतात. अपेक्षा ही कोणाकडून तरी अपेक्षलेली असते, त्यामुळे ती जेंव्हा पूर्णत्वास जात नाही तेंव्हा अंतर वैयक्तिक संबधात अडथळे निर्माण होतात. अपेक्षा आणि वस्तुस्थिती यात अंतर निर्माण झाले की तणाव आणि ताण निर्माण होतो. अपेक्षा ह्या पाणी भरलेल्या गोणपाट सारख्या असतात. त्या वाढल्या की त्याचा दबाव त्या गोष्टीतील गाढवा सारखा आपल्यावर होतो. साहजिकच आपण इतरांच्या आणि आपल्या स्वत:च्या अपेक्षांचे गोणपाटाचे ओझे आयुष्यभर वाहत असतो. त्यामुळे आपण दबूनही जातो आणि थकूनही जातो. अपेक्षा ही व्याजा सारख्या असतात कधी त्या सरळ व्याजाने वाढतात तर कधी चक्रवाढ व्याजानेही वाढतात. जेंव्हा आपण इतरांकडून अपेक्षा ठेवतो त्या कधी कधी मृगजळ सुद्धा ठरतात. जसे आपण पुढे जावू त्या प्रमाणे त्या क्षितिजा सारख्या दूर होत जातात. अपेक्षा ह्या कधी कधी उपेक्षा पदरी घेवून येतात. अपेक्षा कमी ठेवणे ही बर्याोच वेळा शहाणपणाचे लक्षण ठरते.
अपेक्षांचे ओझे हे असह्य न होता सुसह्य होयला हवे. बर्या च वेळा आपण ‘हो’ म्हणून इतरांच्या अपेक्षा आपल्याकडून वाढवतो. थोडे आपण आपल्या विचारात, वागण्यात आणि बोलण्यात स्पष्टता ठेवली की इतर लोक आपल्यावर त्यांच्या अपेक्षा लादत नाहीत. नाहीतर लोक आपल्याला गृहीत धरून त्यांचे अपेक्षाचे ओझे आपल्यावर ढकलतात. जशा इतरांच्या अपेक्षा आपल्याकडून असतात, तशा आपल्यालाही इतरांकडून असतात. आपल्या इतरांकडून अपेक्षा असणे गैर नाही, मात्र त्या अवास्तव आणि अवाजवी नाहीत ना याची खात्री वेळोवेळी करायला हवी. जेवढ्या आपण अपेक्षा वाढवू तेवढ्या त्या जास्त अपूर्ण अथवा अर्धवट राहणार आणि शेवटी त्याचा त्रास तुम्हालाच होणार. सबब अपेक्षा जेवढ्या कमी करता येतील तेवढे पहावे आणि इतरांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा वाढणार नाहीत, याबाबतही कायम दक्ष राहावे.
आकांक्षा ही काही तरी मिळविण्याची तीव्र अशी भावना असते. आकांक्षा ही इश्चे सारखी प्रबळ भावना नसते किंवा अपेक्षा सारखी काही तरी मिळेल अशी धारणा आणि समजूत नसते तर आकांक्षा ही काही तरी विशेष हेतु, उद्देश आणि ध्येय याने प्रेरित झालेली असते. आकांक्षा ह्या अत्यंत तीव्र स्वरुपाच्या जरी असल्या तरी त्या काही तरी मिळवण्याच्या हेतूनं प्रेरित झालेल्या असतात. आकांक्षा आणि महत्वाकांक्षा याचा खूप जवळचा संबंध असतो. साहजिकच आकांक्षा ह्या महत्वाकांक्षा सोबत चिटकलेल्या असतात. जेवढ्या आकांक्षा विस्तारत जातात तेवढ्या महत्वाकांक्षा वाढत जातात. आकांक्षा ह्या आशावादाशी निगडीत दिसून येतात.आकांक्षा ह्या प्रेरणेशी सुद्धा निगडीत असतात. आकांक्षा म्हणजे वैयक्तिक स्तरावर काही तरी उदिष्ट आणि ध्येय गाठण्याची प्रेरणा होय.
आकांक्षा ह्या प्रेरणादायी असून त्या अत्यंत काळजीपूर्वक आणि ध्यानपूर्वक आखलेल्या असतात. त्या वास्तवाला धरून असल्याने त्या व्यक्तिमत्व खुलवतात. आकांक्षा ह्या पायाभूत स्वरुपाच्या आणि वैयक्तिक असतात. आकांक्षा ह्या आपल्याला अधिक कार्यक्षिल ठेवतात. आकांक्षा ह्या यशाची शिडी असतात. आकांक्षा ठेवून पुढे मार्गक्रमण करणे सोपे होते. आकांक्षा ह्या कळी सारख्या असतात त्यांना योग्य पद्धतीने खत पाणी घातले की त्या फुलतात आणि यशाची फळे देतात. आकांक्षा ह्या जीवन अधिक गतिमान आणि प्रवाही बनवतात.
वासना म्हणजे कामना किंवा तीव्र अशी इच्छा होय. वासनेचा संबध फक्त लैंगिकतेशी नसून तो विस्तारीत स्वरुपात पाहायचा गेल्यास आजूबाजूला जे काही आहे, ते उपभोगण्याची लालसा होय. काम भावना एक व्यापक आणि विस्तारित दृष्टीने पाहिली जाणे आवश्यक ठरते. संसाधने आणि संपत्ती याचा उपभोग घेण्याची लालसा म्हणजे वासना होय. मात्र आपण पाहतो की लालसेपोटी संसाधने आणि संपती याचा अमर्याद वापर करण्याची वृत्ती दिसून येते. मानवी मनाला कामेच्छा होणे आणि त्याप्रमाणे होणारे वर्तन यासाठी काही सामाजिक आणि पारंपारिक नियमांनी आपल्याला बंधन घातले आहे. समाज आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती आणि घटक यांच्या मध्ये सदाचार आणि विवेक राहावा म्हणून धर्म अस्तित्वात आहे. प्रत्येक धर्माचे अनुयायी असतात. हे अनुयायी धर्माने घालून दिलेल्या नियमांचे काटकोरपणाने आणि कधी कधी कट्टरपणाने पालन करतात. साहजिकच काम, कामेछा याबाबत धर्माने, चाली, रितीरिवाज आणि परंपरा यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आपल्यावर बंधनकारक असते. त्यामुळे सामजिक आणि धार्मिक बंधने आणि स्व:नियंत्रण या आधारे आपण ज्यावेळी काम आणि कामेच्छा यावर नियंत्रण प्रस्तापित करतो, त्यावेळी आपण एक उत्तम आणि परिपूर्ण सामाजिक जीवन जगण्याकडे मार्गक्रमण करतो. लैंगिक इच्छा मध्ये फक्त शारीरिक विषय नसून तो भावनिक आणि मानसिक सहभाग याच्याशी निगडीत असतो. परंतु वासनेचा प्रवाह हा पूरा सारखा असतो, त्यामुळे कितीही बंधने टाकत गेलो, तरी ते बांध फुटत राहतात. वासना ह्या तुम्ही एका वयात मध्ये पोहचले की तीव्र स्वरूप धारण करतात. साहजिकच या वेळी योग्य संस्कार, मूल्ये , विवेक , नैतिकता , खेळ , कला , छंद याची जोड देवून त्याचे दमन करावे लागते किंवा वाट मोकळी करून द्यावी लागते. सामाजिक संरचना आणि सामाजिक बंधने वासना आणि कामेश्च्छा यावर नियंत्रण प्रस्तापित करत असतात. त्यामुळे त्यांचे योग्य व्यवस्थापन मानसिक आणि भावनिक दृष्ट्या कराव्या लागतात.
आशा प्रकारे इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि वासना ह्या मानवी जीवनात कायम प्रभाव टाकत असतात. मात्र हा प्रभाव कशा प्रकारे प्रवाहीत करावा आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत आपण कायम दक्ष आणि सावध असावे लागते. इच्छा असेल तर मार्ग निघतो यासाठी इच्छा ह्या वास्तववादी आणि वस्तुस्थितीला धरून असायला हव्यात. अपेक्षा ह्या धारणा आणि समजूती असतात. अपेक्षाचे ओझे जास्त झाले की त्रास आणि वेदना होतात. तसेच अपेक्षा आणि वस्तुस्थिती यातील अंतर वाढले की तणाव निर्माण होतात. त्यासाठी अपेक्षा ह्या जेवढ्या कमी करता येतील तेवढे पहावे आणि इतरांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा वाढणार नाहीत याबाबतही कायम दक्ष राहावे. आकांक्षा ही काही तरी मिळविण्याची तीव्र अशी भावना असते. आकांक्षा ह्या विशेष हेतु, उद्देश आणि ध्येय याने प्रेरित झालेल्या असतात. साहजिकच आपली उदीष्टे आणि ध्येये प्राप्त करण्यासाठी आकांक्षा महत्वाची भूमिका बजावतात. वासना म्हणजे कामना किंवा तीव्र अशी इच्छा होय. वासनेचा संबध फक्त लैंगिकतेशी नसून तो विस्तारीत स्वरुपात पाहायचा गेल्यास आजूबाजूला जे काही आहे, ते उपभोगण्याची लालसा होय. काम भावना एक व्यापक आणि विस्तारित दृष्टीने पाहिली जाणे आवश्यक ठरते. याप्रकारे इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि वासना यांचे योग्य नियंत्रण आणि व्यवस्थापन करूया आणि एक सोपे, सूटसुटीत,साधे,सरळ आणि सुखी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करूया.
जीवन अनमोल आहे , त्याला अधिक सुंदर बनवूया.
राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी
९९७०२४६४१७