“व्यायामात् लभते स्वास्थ्यं”! “दीर्घायुष्य बलं सुखम्”!
“आरोग्यम् परमं भाग्यं”! “स्वास्थ सर्वार्थ साधनम्”!!
अर्थात व्यायामामुळे आपणांस स्वास्थ्य, दीर्घायुष्य,बळ आणि सुखाची प्राप्ती होते. आपल्या स्वस्थ असण्याचीच आपल्या जीवनातील अनेक कार्ये ही सिद्ध होत असतात. व ती कार्ये सिद्धीसही जातात. म्हणूनच निरोगी असणे हे परमभाग्य असे मानले जाते. “शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्” निरोगी शरीरातच निरोगी आत्मा वास करतो.
आपले शरीर हे आपल्या दैनंदिन कामकाजाचे जणू साधनच आहे. शरीराच्या माध्यमातूनच आपण अनेक कार्ये करीत असतो. आजच्या एकविसाव्या शतकातीला माणूस भौतिक आणि ऐहिक सुखाच्या भूलभुलय्या मध्ये असा काही गुरफटला आहे की त्यास स्वतःच्या शरीराविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यासाठी लागणारा वेळ अजिबातच नाही. ज्या शरीराच्या माध्यमातून आपण आपली दैनंदिन नित्यकर्मे करतो, बाहेरील जगाविषयी माहिती घेतो, अनुसंधान बांधतो त्या आपल्या शरीराबद्दल माणूस किती अनभिज्ञ आहे?….
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत तर योग- साधनेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अनेक रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मानवाचे आयुष्यमान कमी-कमी होत आहे. कर्करोग, मधुमेह,स्थूलता अशांसारख्या अनेक गंभीर आजारांचा सामना माणसांस करावा लागतो आहे; त्यात भरीस भर म्हणून संपूर्ण जगात अत्यंत त्रस्त करून टाकणारा , पळता भुई थोडी करणारा हा आलेला हा “कोरोनाचा” विषाणू. आणि मग अशा परिस्थितीत निरोगी असण्याचे आणि प्रतिकार शक्ती मजबूत असण्याचे महत्त्व आपल्याला पटते. म्हणूनच योगसाधना आणि प्राणायामाने आपले शरीर मजबूत आणि तंदुरुस्त ठेवले तर कोरोनाच काय ? त्याहीपेक्षा कितीही मोठा विषाणू आला तरी तो आपले काहीही वाकडे करणार नाही.
“सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे” असे श्री रामदास स्वामींनी म्हटले त्याप्रमाणे योग साधनेचे फायदे हे आपल्याला तेव्हाच मिळू शकतील जेव्हा या योगमय जीवनशैलीचा आपण प्रत्यक्षात अवलंब करू. परंतु आजही आपल्या समाजात व्यायाम योगसाधना प्राणायाम यांसाठी आपल्या वहीत “उद्यापासून” हाच समानार्थी शब्द आढळतो. शिवाय व्यायामाबद्दल अनेक गैरसमज असलेले आढळतात.
उदाहरणार्थ—-
१) मी बारीक आहे मला व्यायामाची ची आवश्यकता नाही.
२) व्यायामाने वजन कमी होत नाही.
३) व्यायामाने वजन वाढते वजन कमी होत नाही.
४) आम्ही स्त्रिया घरातील खूप कामे करतो त्यामुळे आम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही.
५) आम्ही अनुवंशिक रीत्या स्थूल आहोत व्यायामाने आमचे वजन कमी होत नाही.
६) व्यायामासाठी आख्खे आयुष्य पडले आहे.लहान मुलांची हाडे नाजूक असतात.त्यांना आसनांनी इजा होईल. अशा प्रकारचे काही गैरसमज आपल्या मनात घर करून असतात.
या गैरसमजांचे निराकरण होणे खूप महत्त्वाचे आहे.
मुळात बारीक किंवा सडपातळ असणे हा आपल्या अंगकाठीचा एक भाग आहे.जो आपल्याला अनुवंशिकरित्या मिळालेला असतो म्हणूनच व्यायाम हा सर्वांनाच उपकार असा आहे.
व्यायामाने वजन तर कमी होतेच परंतु आपले शरीर स्वस्थ आणि आपल्या शरीराचा बांधा सुडौल राहतो.
आणि स्त्रियांच्या बाबतीत तर व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. घर कामाने व्यायाम होत नाही तर घर काम म्हणजे श्रम असतात. श्रम म्हणजे व्यायाम नाही. श्रमाने शरीर व मन दोन्ही थकते. पण व्यायामाने शरीर आणि मनात एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते आणि दिवसभर पुरेल इतकी सकारात्मक ऊर्जा शरीरात निर्माण होते. म्हणून स्त्री-पुरुष, लहान-थोर,जाड- सडपातळ अशा सर्वच व्यक्तींना व्यायाम, योगसाधना अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच वर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या शरीराविषयी जाणून घेण्यासाठी आणि आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी योगसाधनेची आपल्याला खूपच मदत होते. इसवी सन पूर्व १५० मध्येच “पतंजली मुनींनी योग- साधनेवर “योगसूत्र” लिहिले.त्यांनी योग चा अर्थ “चित्तांतील वृत्तींचा निरोध”(योगः चित्त-वृत्ति निरोधः) म्हणजेच चित्तांतील वृत्तींवर नियंत्रण मिळवणे असा सांगितला आहे. त्यांच्या विचारांनुसार योगाची आठ अंगे आहेत१) यम २) नियम ३) योगासन ४) प्राणायाम ५) प्रत्याहार ६) ध्यान ७) धारणा ८) समाधी.
आपल्या योगमय जीवनशैलीत अनेक प्रकारची आसने आहेत; ज्यामुळे आपले शरीर लवचिक आणि सुडौल बनते. ताडासन, नावासन, सूर्यनमस्कार, उष्ट्रासन, चक्रासन, वज्रासन, सुप्तवज्रासन, भुजंगासन, सेतुबंधासन, सर्पासन, मकरासन,नौकासन, शीर्षासन अशा आणि अशा प्रकारच्या अनेक आसनातून आपण आपल्या शरीरास लवचिक करू शकतो. या आसनांचा सराव करून या आसनांचा सर्वोत्तम असा लाभ आपण करून घेऊ शकतो. या आसनांच्या जोडीला प्राणायामाचे अनुसंधान बांधणे हेही आवश्यक आहे. अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रिका,भ्रामरी,प्लाविनी, ऊज्जाई, शीतली,शीतकारी अशा प्राणायामाने आपण श्वासांवर नियंत्रण मिळू शकतो. त्यामुळे मानसिक शांतीचा अत्यंत दिव्य अशा अवर्णनीय अनुभूतीचा प्रत्यय आपल्याला नक्कीच येतो. नियमित योग साधना करण्याचे फायदे आकडेवारीने मुद्देसूद सांगताना थोड्या मर्यादा येऊ शकतात;परंतु नियमित योगमय जीवनशैलीचे असंख्य फायदे आपण वर म्हटल्याप्रमाणे अनुभवू शकतो. योगासने ,प्राणायाम किंबहुना “संपूर्णयोगसाधने”चे सखोल परिणाम आपल्या स्चूल व सूक्ष्म शरीरावर शरीर स्तरावर होत असतात .
उदाहरणार्थ
१) वजनात घट
२) शांत व आल्हाददायी मन
३) सतेज त्वचा
४) तजेलदार चेहरा
५) लवचिक शरीर
६) उत्तम आरोग्य
७) मजबूत प्रतिकारशक्ती
या सर्वां मधील जे जे आपल्याला हवे आहे तेथे हे सर्वच देण्यास योग साधना समर्थ आहे. बरेचदा शारीरिक स्तरावर आपल्याला काही फायदे जाणवतात सहज लक्षातही येतात; परंतु मानसिक स्तरावरील अगणित असे फायदे आपल्याकडून दुर्लक्षितच राहतात. शारीरिक स्वास्थ सोबत मानसिक स्वास्थ्याचे आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे नव्याने वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. नैराश्य, तणावग्रस्त परिस्थिती, कामाच्या ठिकाणी केले गेलेले राजकारण, वैवाहिक जीवनातील अडचणी, शैक्षणिक जीवनात येणारे अपयश, आशा आणि निराशा यांचे सतत चाललेले युद्ध, वैफल्य अशा अनेक तणावयुक्त परिस्थितीतून “प्राणायामाने” आपण निरामय अशी शांत स्थिर अविचल मनस्थिती प्राप्त करून घेऊ शकतो. प्रत्यक्षात “शरीर, मन आणि श्वासोच्छवास” यांच्या संयोगामुळे आपल्याला अगणित असे फायदे जाणवतात. ताणतणावापासून मुक्ती, सजगतेत वृद्धि, नातेसंबंधात सुधारणा, रोगप्रतिकारक शक्ती वृद्धी,उर्जा शक्ती वृद्धी, शरीराचा लवचिकपणा , शरीराची ठेवण सुधारणा ,आत्मिक समाधान अशा सर्वच स्तरांवर तंदुरुस्ती येते.
आपले मन शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले जाऊन जीवनाचा प्रवास शांत आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो. “योग म्हणजे जोडणे”हा विचार आपल्याला निसर्गाशी जोडतो. पिंडी ते ब्रह्मांडी असे म्हटले जाते; योगाच्या माध्यमातून आपण अखिल ब्रम्हांडाशी जोडले जातो.* *योग हा दुःखनाशनाचा एक मार्ग आहे. आणि म्हणूनच योगसाधनेशी जोडलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या सोबतच इतरांचेही कल्याण व्हावे यासाठी सदैव कटिबद्ध असते. “सर्वेही सुखिनः संन्तु! सर्वेहि संन्तु निरामयः!! असे विचार ती नेहमीच करते. म्हणूनच अगदी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी शारीरिक स्वास्थ्य बरोबर मानसिक स्वास्थ्याचा आहे विकास साधण्याकरिता योगसाधनेचा हव्यास धरला पाहिजे. दररोज किमान अर्धा तास योगासने आणि अर्धा तास प्राणायाम यासाठी दिल्यास आपल्या संपूर्ण आयुष्यात बदल घडू शकतो हे अगदीच निर्विवाद सत्य आहे. तसेच श्वसनक्रिया करताना ओंकाराचा रोज अर्धा तास मंत्रोच्चारण केल्यामुळे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम प्रकारे लाभते. अंती एवढेच सांगावेसे वाटते
“परोपकारार्थ इदं शरीरमं!”
“ईश चिंतनार्थ इदं मनः”!
“विवेकार्थ इदं बुद्धी “!
“ब्रह्मज्ञानार्थ जीवनम्!” असा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.
धन्यवाद
लेखन – माधवी कुलकर्णी
लक्ष्मणराव आपटे प्रशाला पुणे
लेखिका “भारतीय योग संस्थान भैरवनगर विमाननगर पुणे या केंद्रात सदस्य आणि योग-प्रशिक्षक आहेत.
(भ्रमणध्वनी – ७७२००७८१२८)
for more such articles visit www.mahaedunews.com, send your articles to mahaedunews@gmail.com