समाजात असलेली चूल आणि मूल ही संरचना मोडीत काढत स्त्रियांना स्त्री हक्क मिळवून देणाऱ्या क्रांतीज्योती “सावित्रीमाई” फुले यांच्या साथीने मुलींची पहिली शाळा स्थापना करून ज्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका ठरल्या गेल्या त्या व्यक्ती म्हणजे “फातिमा शेख” होय. ज्यावेळी महिलांना घराच्या हद्दीतच ठेवले जात होते व स्त्रीयांनाही शिक्षण देण्याची गरज आहे ही कल्पनाही समाजामध्ये नव्हती त्याकाळी “स्त्रीमुक्तीचे एकमेव साधन म्हणजे शिक्षण होय.” हा मूलमंत्र देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला मोलाची साथ देणाऱ्या व्यक्ती म्हणजे फातिमा शेख होय. फातिमांचा जन्म ९ जानेवारी १८३१ मध्ये पुणे येथे झाला होता. फातिमा शेख यांचे कुटुंब आधी उत्तरप्रदेशामध्ये राहत होते. नंतर ते स्थलांतरित होऊन महाराष्ट्रातील मालेगाव येथे स्थायिक झाले होते. त्यांचे कुटुंबीय हातमागावर कपड्यांचा व्यवसाय करायचे. पण महाराष्ट्रात हातमागाच्या कपड्यांच्या व्यवसायात मंदी आल्यानंतर त्यांचे कुटुंब मालेगावहून पुण्यात आले. फातिमा शेख यांचे कुटुंब उच्चभ्रू मुस्लिम कुटुंब होते, परंतु वयाच्या नवव्या वर्षी फातिमांच्या वडिलांचे निधन झाले. पालकांच्या मृत्यूनंतर, फातिमांचे संगोपन त्यांचा मोठा भाऊ उस्मान शेख यांनी केले. मुलींना शिक्षण देण्याची तसेच अस्पृश्यांसाठी शाळा उघडण्याची कल्पना महात्मा फुलेंनी आपल्या वडिलांना आणि परिसरातील लोकांना सांगितल्यावर तेथील सनातनी प्रचंड संतापले. त्यांनी गोविंदरावांना “तुमच्या मुलाला पटवून द्या नाहीतर परिणामांना सामोरे जा,” अशी धमकी द्यायला सुरुवात केली. महात्मा फुले शाळा सुरू करण्याच्या आग्रहावर ठाम राहिले, परंतु त्यांचे वडील सरंजामी शक्तींपुढे असहाय्य होते.
अखेरीस वडिलांनी फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीमाई यांना फक्त घालण्यासाठी कपडे देऊन घराबाहेर काढले. त्यावेळी फातिमाजींनी फुले दांपत्यांला आपल्या घरात राहण्यासाठी जागा दिली. तसेच फातिमांची व सावित्रीमाईंची ओळख ही अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारकडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर झाली होती. स्त्रियांना देखील सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.” असे समाजाला निर्भीडपणे सांगून, महिलांना स्त्री हक्क मिळवून देत, महिला सबलीकरणासाठी शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी १८४८ साली सावित्रीमाई व फातिमा शेख यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या शाळेत फातिमा शेख शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शाळेत शिकवण्यापूर्वी ज्योतिबांनी फातिमा शेख आणि सावित्रीमाई या दोघींना स्वतःहून शिक्षक प्रशिक्षण दिले होते. प्रशिक्षण देण्यापूर्वी ज्योतिबा फुले स्वतः अहमदनगर येथील मिशनरी टिचर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये काही दिवस जाऊन शिकविण्याचे कौशल्य आणि प्रक्रिया जवळून पाहून आले होते. नंतर फुलेंनी स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये शिकवण्याचे काम फातिमा शेख यांनी केले.
तसेच स्त्रियांना व अस्पृश्यवर्गीय बालकांना व सर्वच जाती धर्मातील मुलांना कोणताही भेद न करता शिकवण्याचे काम फातिमा शेख यांनी केले. नंतर १८५१ मध्ये मुंबईत दोन शाळांच्या स्थापनेत देखील फातिमांनी भाग घेतला. तसेच सत्यशोधक समाजाच्या देखील त्या एक भाग होत्या.
फुले दाम्पत्यासोबत परिसरात फिरून समाजातील कुटुंबांना भेटत व मुलींना शाळेत पाठवण्याची विनंती फातिमा शेख करत असत. या प्रयत्नांना यश मिळत पुढे शाळेत शिकणाऱ्या मुलींची संख्याही वाढू लागली.
तत्कालीन समाजात स्त्रियांना शिक्षित करणे सोपे काम नव्हते. होत असलेल्या प्रचंड विरोधाला न जुमानता सावित्रीमाईंनी स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी अविरत प्रयत्न चालविलेले असताना सत्याला स्वीकारून सावित्रीमाईंना साथ देण्याचे धाडसाचे कार्य त्यावेळी फातिमा शेख यांनी केले होते. स्त्री हक्क व शिक्षणासाठी सावित्रीमाईंसोबत आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या महान शिक्षिका फातिमा शेख यांना व त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन..🙏
प्राजक्ता अर्जुन
विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंदनगर.
ता.इंदापूर, जि.पुणे.