पुरातन काळापासून खगोलशास्त्र हा एक कठीण विषय समजला जातो.यातील गणितीय संकल्पना सर्व सामन्य लोकांच्या आकलन शक्तीच्या पलीकडे असतात. रॉकेट सायन्स , आइन्स्टाइन चा सापेक्षवादाचा सिधान्त हें आजच्या घडीला सर्वात कठीण समजले जाणारे विषय हें खगोलशास्त्राचाच एक भाग आहेत . या जटील विषयाचा अभ्यास करून आकाशातील ग्रह ताऱ्यांच्या विश्वात नेहमीच रममाण होणारा .अशक्य ते शक्य करुन दाखवणारा भारतातील पहिला आदिवासी खगोलशास्त्रज्ञ म्हणजे चंद्रकात घाटाळ होय .
चंद्रकात घाटाळ यांचा जन्म पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कासा या गावात ५ सप्टेंबर १९७६ साली एका गरीब आदिवासी कुटुंबात झाला .थोडीफार शेती व मजुरी हे त्यांच्या उत्पन्नाचे साधन .चंद्रकांत यांना दोन भाऊ व एक बहीण आहेत ..
आई वडील अशिक्षित होते तरिही आपल्या मुलांनी शिकावे अशी त्यांची मनोमन ईच्छा होती.पण घराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मोठ्या बहिणीचे शिक्षण होऊ शकले नाही. पण चंद्रकांत व त्यांचे मोठे बंधू यांना मात्र वडिलांनी शाळेत टाकले .
चंद्रकात यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कासा व माध्यमिक शिक्षण पूज्य आचार्य भिसे विद्यालय कासा येथे झाले .
शालेय जीवनात चंद्रकात हे एक अतिसामान्य विध्यार्थी होते .पाचवी ते नववी पर्यन्त एक दोन विषयांत वर पास असाच शेरा मिळत गेला.कारण शालेय जीवनात अभ्यास काय असतो हे त्यांना माहीतच नव्हते .घरचा अभ्यास तर ते कधीही वेळेवर करत नसत त्यामुळे त्यांना शाळेत चांगलाच प्रसाद मिळत असे . सुरवाती पासूनच गणित हा विषय त्यांच्या डोक्यावरून जायचा .अगदी साधी -साधी गणित देखील त्यांना सोडवता येत नसत .त्यामुळे त्यांच्या मनात गणिताविषयी चीड निर्माण झाली. शालेय जीवनात ते अभ्यासात जारी कमी असले तरी खेळ व भाषणकला यामधे नेहमी अग्रेसर असायचे .शाळेत होणाऱ्या भाषण स्पर्धेत नेहमी त्यांचा सहभाग असायचा .त्यामुळे व्यासपीठावर कसे बोलायचे ते शालेय जीवनातच शिकले .तसेच क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ होता या खेळात त्यांनी चांगलेच प्रावीण्य मिळवले होते .
ज्येष्ठ बंधू अनंत घाटाळ हे सुरवाती पासुन त्यांचे आदर्श होते .वडिलांपेक्षाही भावाचा जास्त प्रभाव यांच्या जीवनावर होता. भावाला वाचण्याची प्रचंड आवड होती. वडील घारापुरे यांच्या किराणा दुकानात कामाला असल्याने दुकानात रद्दीत येणारी साप्ताहिके , मासिके ई .ते भावाला वाचण्यासाठी घरी घेउन येत .दुकान मालक शिक्षणप्रेमी असल्याने त्यांनीही कधी यासाठी अडवले नाही. .भावाच्या अतिरिक्त वचनाचा फायदा चंद्रकातला होत असे. कारण भावाने वाचलेली माहिती भाऊ चंद्रकात यांनाही सांगत असे. यामुळे त्यांनाही वाचनाची आवड निर्माण झाली . त्या काळात टीव्ही फार मोजक्याच नौकरी पेशा लोकांकडे होते. .गरीब परिस्थिती मुळे त्यांच्या घरी टीव्ही नव्हता पण रेडिओ मात्र होता. रेडियोवर लागणारे बालदरबार, हवामेहेल , सीबाका गीतमाला , हसी के हंगामें असे कार्यक्रम भावासोबत नेहमी ऐकत ..
सन १९९२ साली झालेल्या दहावीच्या परीक्षेतही गणित विषयात कमी गुण मिळाल्याने ते नापास झाले .नंतर गणित विषय पुन्हा घेऊन ते १९९३ साली दहावीची परीक्षा उत्तीर्ण.झाले .
दहावी नंतर पुढे काय करायचे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला कारण घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती .मोठा भाऊ आधीच कॉलेज ला शिक्षण घेत असल्याने वडिलांना दोघांचा खर्च करणे अशक्य होते. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी वडिलांनी नकार दिला .पण मोठ्या भावाने पुढाकार घेऊन त्यांनी वडिलांना समजावलं .मोठ्या भावाचा वडील व कुटुंबावर चांगला प्रभाव असल्याने वडिलांनी होकार दिला.व त्यांचा सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे अकरावीला कला शाखेत प्रवेश झाला . .
कॉलेजला प्रवेश तर झाला पण वसतिगृहात प्रवेश होऊ शकला नाही .कारण तिथें टक्के वारी लागायची आणि चंद्रकात तर रिपिटर होते. कासा ते पालघर अप -डाऊन करणे अशक्य होते. त्यामुळे पालघरच्या एका नातेवाईकांच्या घरी राहून ते कॉलेजला जाऊ लागले .
दोन महिन्यानंतर राजू डोंबरे , सदू ओझरे व भाऊ अनंत घाटाळ या सिनियर मुलांच्या विनंती वरून अधिक्षक नामदेव पाटील यांनी चंद्रकातला शासकीय वसतिगृहात प्रवेश दिला.
सन १९९५ ला ते बारावीची परीक्षा द्वितीय श्रेणीत पास झाले .व सन १९९८ ला बी .ए .ची परीक्षा पास झाले .शेवटच्या वर्षाला त्यांचे इतिहास व राज्यशास्त्र हे विषय होते .राज्यशास्त्र विषयात ते कॉलेजमध्ये प्रथम व इतिहास विषयात आदिवासी विध्यार्थ्यात प्रथम आले ..
सन १९९९ साली त्यांचा बी. एड.साठी सर्वंकष महाविद्यालय चेंबूर मुंबई येथे प्रवेश झाला ..इतिहास विषयात आदिवासी विद्यार्थ्यात पहिला आल्यामुळे त्यांचा प्रवेश फक्त ६०० रुपयात झाला..व वरळी मुंबई येथे समाजकल्याणच्या वसतिगृहात त्यांची राहण्याची सोय झाली .खरतर त्यांचा कल एम. एस. डब्ल्यू .किंव्हा लॉ करण्याचा होता .पण भावाच्या आग्रहाखातर त्यांनी बी. एड.करण्याचा निर्णय घेतला होता .वरळी येथील वसतिगृहातील त्यांचे सुरवातीचे अनुभव फार विचित्र होते. येथील सिनियर विध्यार्थी ज्यांची राहण्याची मुदत संपली होती. तरिही ते चोरून -चोरून वसतिगृहात राहत. त्यांनी सुरवातीस फार त्रास दिला. पोलिसांची धाड पडायची म्हणून ते रात्री १२नंतर पाईपलाईनला चढून खिडकीतून खोलीत यायचे. दोन जणांच्या खोलीमध्ये पाच पाच जण अनधिकृत राहायचे. अधीक्षकांकडे तक्रार केली तर दमदाटी व मारण्याची धमक्या देत. रात्री दारू पिऊन खोलीत दंगामस्ती करत. तर कधी चंद्रकांतलाच रात्री दारू, सिगरेट गुटखा आणायला पाठवत. चंद्रकांतचा वसतिगृहातील सुरवातीचा अनुभव फारच भीतीदायक होता .पण अश्याही परिस्थितीत ते खंबीर राहिले व हार मानली नाही. दोन तीन महिन्यानंतर मात्र त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने सगळ्यांशी जुळवून घेतले. कॉलेजने रेल्वेलाईन अनुसार शैक्षणिक पाठासाठी शाळा दिल्या होत्या. ते वेस्टर्न लाईन चे असल्याने त्यांचे पाठ दादर मधील बालमोहन , शारदाश्रम, साने गुरुजी , नाबर गुरुजी , या नामांकित शाळांमध्ये होते. बालमोहन व सचिन शिकलेल्या शारदाश्रम या शाळेत पाठ घेणं ही आनंदाची व आत्मविश्वास देणारी बाब होती. वरळी येथे राहिल्याने त्यांच्या खगोलशास्त्र विषयी सुप्त आवडीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. कारण नेहरू तारांगण त्यांच्या वसतिगृहा पासुन फार जवळ होते. त्यामुळे शनिवार रविवार चा पुर्ण वेळ ते नेहरू तारांगण येथे घालवत. याच कालावधीत त्यांनी दोन हजार रुपयांची लहान दुर्बीण नेहरू तारांगण येथुन घेतली होती.
सन २००० साली ते बी .एड .ची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यावर लगेचच त्यांची आदिवासी प्रकल्प कार्यालय डहाणू यांच्या मार्फत नुक्लियस बजट अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भाताणे येथे अधीक्षक म्हणुन नियुक्ती झाली.
खरतर त्यांची पात्रता शिक्षकाची होती. पण नेमणूक अधीक्षक पदी झाली .इतक्या कमी वयात कोणताही अनुभव नसतांना अधिक्षक म्हणुन काम पाहणे सोपी गोष्ट नव्हती .पण ते आव्हान त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. अधिक्षक असल्याने आश्रमशाळेतील समस्या व काही न सांगता येणाऱ्या काळ्या गोष्टी त्यांनी जवळुन पाहिल्या .
दोन वर्षानी त्यांची बदली नानिवली, ऊर्से, चळणी या शासकीय आश्रमशाळेत झाली .सहा वर्ष नुक्लियस बजट अंतर्गत काम केल्यानंतर त्यांच्या भावाच्या प्रयत्नाने त्यांना मुंबईच्या नामांकित पारले टिळक विद्यालयात कायम नोकरी मिळाली. शाळेत काही महिने काम केल्यानंतर ते विचार करू लागले की, जिवन हे एकदाच मिळते. जीवनात असे काहीतरी करावे ज्याचा फायदा आपल्या आदिवासी समाजाला झाला पाहिजे. मुंबई ला राहून व नोकरीत अडकून हे शक्य नाही .म्हणुन त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला व मुंबई सोडुन थेट आपला गाव गाठला.
चंद्रकांत यांच्या नोकरी सोडण्याची बातमी नातेवाईक व मित्रानंमध्ये समजल्यावर .काहींनी त्यांना वेडा ठरऊन खिल्ली उडवली. कायम नोकरी सोडल्यामुळे त्यांना कुटुंबाचा मोठा रोष पत्करावा लागला. तसं कुटुंबीयांचे देखील बरोबर होते. कारण सरकारी नोकरी मिळणे कीती कठीण असते. हे आपल्या सर्वाना माहिती आहे. पण चंद्रकांत सारख्या एखाद्या ध्येयपूर्तीसाठी पछाडलेल्या माणसाला त्याची पर्वा नसते.
नोकरी सोडण्याचा काळ कठीण फार होता .या गोष्टी वरून वडिलांशी वाद विकोपाला गेल्याने ते घराबाहेर पडले. कुटुंबाने साथ सोडली होती .फ़क्त एकट्या पत्नीचा काय तो आधार होता .
या कठीण परिस्थितीत पत्नीने खंबीर राहुन त्यांना आधार दिला. दोघांनी स्वतः जंगलात जाऊन लाकडे गोळा करून शेतावर एक लाहान झोपडी बनवली. व त्यांत आपला संसार थाटला.
चंद्रकांतची झोपडी गाववस्ती पासुन फार दुर होती. तिथे लाईट रस्ता काहीच नसल्याने रात्री खुप शांतता व एकांत होता.या परिस्थितीचा त्यांना खूपच फायदा झाला. झोपडीच्या अंगणात रात्री ते आपल्या लहान दुर्बिणीतुन अवकाशातील ग्रह – ताऱ्यांचे निरीक्षण करुन त्यांच्या नोंदी करुन ठेवत. पुस्तकातील माहिती व नकाशे पाहुन ते अवकाशातील तारकासमुह, राशी, नक्षत्र यांची स्थाने, मध्यंमंडळावर येण्याच्या वेळा व नावे समजुन घेत .
एखद्या विषयाचा अभ्यास हा पुस्तक उघडले आणि वाचले असा असतो पण खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर मोकळ्या अवकाशात तासनतास प्रत्यक्ष निरीक्षण करावे लागते व नोंदी ठेवाव्या लागतात.
चंद्रकांत रात्रभर जागुन ग्रह- ताऱ्यांच्या नोंदी करून ठेवत. अंतराळातील जीवन (एलीयन )हा त्यांचा अभ्यासाचा आवडता विषय. त्या विषयी बऱ्याच संकल्पना त्यांनी तयार केल्या. त्यांचा अभ्यास रात्रीच्यावेळी चालत असल्यामुळे त्यांच्या अभ्यासाविषयी पत्नी सोडुन फारशी कोणाला माहीती नव्हती .पत्नी कमी शिकलेली असल्याने खगोलशास्त्र विषयी तिला ज्ञान नव्हते. पण आपल्या पतीवर पुर्ण विश्वास होता की , आपले पती नक्कीच भविष्यात काहीतरी करतील .
रात्री नेहमीप्रमाणे चंद्रकांत ताऱ्यांचे निरिक्षण करत होते. आपल्या आकाशगंगेच्या सर्वात जवळ असणारी देवयानी (एण्ड्रोमेडा ) दीर्घिकेचे ते निरिक्षण करत असतांना त्यांच्या लहान दुर्बिणीतून ती एक फ़क्त ताऱ्यांसारखी दिसली. या दीर्घिकेच्या सौंदर्याविषयी त्यांनी बरेच वाचले होते. पण त्यांच्या कडे असणाऱ्या लहान दुर्बिणीतून ते सौंदर्य पाहणे शक्य नव्हते .
त्यामुळे आपल्याकडे मोठी दुर्बीण असावी. त्यांना समजले. पण आर्थिक अडचणींमुळे ते शक्य नव्हते. मोठी दुर्बीण घेण्यासाठी ८००० हजार रूपयांची गरज होती .त्या परिस्थितीत ही त्यांच्यासाठी मोठी रक्कम होती. तरी जेमतेम त्यांनी दुर्बिणीसाठी पाच हजार रुपये जमवले अजुन तीन हजार रूपयांची गरज होती .पतीची गरज पाहुन त्यांच्या पत्नीने स्वतःची कानातील फुले विकुन दुर्बिणीसाठी तीन हजार रूपये दिले .
२१ मार्च २००८ ला त्यांनी कॉन्सर्ट -७०० ही केसेग्रेन पद्द्तीची ६० मी .मी .ची दुर्बीण घेतली. आता हाताशी चांगली दुर्बीण असल्याने त्यांचा अजुन जोमात अभ्यास सुरू झाला. या दुर्बिणीतून गुरू चे उपग्रह, शनीची कडा, चंद्रावरील वीवरे, दीर्घिका, खुले- बंदिस्त तारकागुच्छ पाहण्यात ते तासनतास घालवत .
आपले हे खगोलीय ज्ञान आपल्यापुरते मर्यादीत न ठेवता याचा उपयोग आपल्या आदिवासी समाजातील मुलांना व्हावा यासाठी त्यांनी ५ सप्टेंबर २०१५ साली अनुजा अवकाश निरिक्षण केंद्र कासा या खगोल विज्ञान केंद्राची स्थापना केली. या केंद्रात निरिक्षण करण्यासाठी डोब्सीनीयन प्रकाराची २०० मी मी.ची तोफेच्या आकाराची दुर्बीण त्यांनी जमिनीचा एक तुकडा विकुन खरेदी केली .
अनुजा अवकाश निरिक्षण केंद्र हे पालघर जिल्यातील पहिलेच अवकाश निरिक्षण केंद्र. तर असे केंद्र स्थापन करणारे चंद्रकात हे भारतातील पाहिले आदिवासी खगोलशास्त्रज्ञ होते .
या केंद्रामार्फत ग्रामीण आदिवासी भागांतील मुलांना अवकाश निरिक्षण व प्रशिक्षण हे दुर्बीण व इतर खगोलीय साधनाद्वारे विनामूल्य दिले जाते .तसेच ग्रहण व इतर महत्त्वाच्या खगोलीय घटनांच्या वेळेस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते .यासाठी मुलांकडून कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही .समाजाची सेवा या उद्देशाने सगळे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते .
आजपर्यंत १०००० च्या वर मुलांनी या केंद्राला भेट देऊन खगोलीय माहिती व दुर्बिणीतून पाहण्याचा आनंद घेतला आहे .
त्यांच्या या अनोख्या समाजकार्याबद्द्ल अनेक स्थानिक सत्कार व पुरस्कारा सह २०१६ साली आदरणीय खासदार कै . चिंतामण वनगा व आदिवासी विकास मंत्री मा .विष्णु सवरा यांच्या हस्ते पालघर भूषण हा मानाचा पुरस्कार देण्यात आला .
केंद्र स्थापनेनंतर सर्वात महत्त्वाच्या घटना म्हणजे नेहरू तारांगण चे संचालक आदरणीय डॉ .अरविंद परांजपे सर व त्यांच्या शास्त्रज्ञ टीम ने एका महत्त्वाच्या खगोलीय घटनेच्या वेळेस रात्री अनुजा केंद्राला दिलेली भेट.आणि नासाच्या स्पेस एजुकेटर आदरणीय अपूर्वा जाखडी यांची डिसेंबर २०१८ला दिलेली भेट.या दोन घटना म्हणजे चंद्रकात यांच्या कामांची पावती होती .
चंद्रकात यांच्या कामांची चांगली दाखल वर्तमानपत्र व प्रसार माध्यमांनी घेतली .मराठी वर्तमानपत्रा पासुन इंग्रजी वर्तमानपत्रात सुद्धा त्यांच्या कामांची बातमी छपून आली. तसेच zee 24, टीव्ही 9 मराठी, मी मराठी ई टीव्ही चॅनल्स वर त्यांची बातमी दाखवण्यात आली .
प्रसार माध्यमातून सगळीकडे बातम्या आल्यानंतर तोंडओळख असणारे लोकं देखील चंद्रकात आपला जवळचा मित्र असे सांगु लागले तसेच. चंद्रकात हा शाळेत आपल्या वर्गात होता याचा देखील बरेचसे जणांना साक्षात्कार झाला. वेढा ठरवणारे मित्र पण जवळ येऊ लागले . कठीण परिस्थितीत सोडून गेलेली माणसं प्रसिध्दी व मान मिळाल्यावर कशी परत येतात याचा चांगलाच अनुभव त्यांना आला.
चंद्रकात यांनी तयार केलेले खगोलीय सिधान्त व त्यांच्या संकल्पना त्यांनी कथा स्वरूपात डम्पी या त्यांच्या विज्ञान कथा संग्रहात मांडल्या आहेत. सध्या हे पुस्तक डिंपल प्रकाशन गिरगाव मुंबई यांच्याकडे छपाई साठी आहे. लवकरच ते प्रकाशित होईल अशी त्यांना आशा आहे. काही लोकांनी वेडा ठरवलेल्या चंद्रकांत ला आज शाळा, महाविद्यालय, विज्ञान कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले जाते ..
शून्यातून जग निर्माण करून आकाशला गवसणी घालणारा ग्रह ताऱ्यांशी मैत्री करणारा चंद्रकात घाटाळ यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे .
visit www.mahaedunews.com for more articles on life explained, subscribe mahaedunews youtube page, send your articles to mahaedunews@gmail.com for publication