पुण्यापासून साधारणता: सांदण व्हॅली 200 km आहे. आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये ‘सांधण व्हॅली’चा दुसरा क्रमांक लागतो .म्हणूनच या ठिकाणी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 किमी लांबवर पसरलेली आहे.
अशा या सफरीवरती ट्रेकिंग पलटण जाण्यासाठी खूपच उत्सुक होती…..
खरंतर ट्रेकिंग पलटण मागचे दोन-तीन वर्ष सांदन व्हॅलीसाठी प्रयत्नशील होती. मागील वर्षी पूर्ण तयारी झालेली असतानाही ट्रेक अचानक ऐनवेळी आदल्या दिवशी काही तांत्रिक कारणामुळे कॅन्सल करावा लागला होता, ते मनात शल्य होतेच ,त्यामुळे सांदण व्हॅलीसाठी आपण नक्की कधी जाणार आहोत याची मनात उत्सुकता लागून राहिली होती. अनेक दिवसांपासून हा ट्रेक करायचा हे पलटण मधील प्रत्येकाला वाटत होतं आणि खरोखर कदाचित 100 वा ट्रेक हा सांदण व्हॅलीचा व्हावा हा दुग्ध शर्करा योगच म्हटला पाहिजे.
बराच प्रदीर्घ काळ प्रतीक्षेत असणाऱ्या या ट्रेकसाठी आम्ही 23 मे 2023 रोजी दुपारी मार्गस्थ झालो ट्रेकिंग पलटण मधील 19 जण या शंभराव्या ऐतिहासिक ट्रेकचे साक्षीदार होण्यासाठी निघालो.पुण्यातून साधारणता: दुपारी प्रवास सुरू झाला नारायणगाव- ओतूर -ब्राह्मणवाडा- कोतुळ- राजुर- साम्रद मार्गआम्ही निवडला.
साधारणतः रात्री नऊ वाजता आम्ही कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात प्रवेश केला जाताना शेंडी या ठिकाणी वन विभागाचा टोल नाका लागतो खरोखर ज्यावेळेस रात्री नऊ वाजता या ठिकाणी पोहोचलो समोर उंच उंच झाडे आणि या झाडांवरती काजव्यांची रंगीत अशी मैफिल रमली होती. अक्षरशः डोळ्यांच पारन फेडणारा हा उत्सव असतो त्याचा साक्षीदार होत आलं हा खूपच वेगळा अद्भुत विस्मयकारी अनुभव होता.
पांजरे या गावाजवळ तर लाखो काजवे झाडांवरती पिंगा घालत होती त्यांच्या प्रकाशात ही काळ रात्र सुद्धा प्रकाशाने न्हाऊन निघाली.आकाशातील चंद्रकोर आणि चांदणं ही शोभा अजूनच वाढवत होती. सप्तसुरांच्या लई प्रमाणे झाडावरती हे काजवे आपल्या प्रकाशाने जणू काही लेझर शो चालू असल्याची अनुभूती देत होते.अंधारामध्ये फोटो मात्र काढता येत नव्हते .तरीही ह्रदयात हीस्मृती साठवून आम्ही पुढे निघालो.
रस्त्याच्या दुतर्फा काजव्यांची ही मैफिल अनुभवत आम्ही साम्रद गावी साडेनऊ वाजता पोचलो.त्यानंतर स्थानिक श्री .पंढरीनाथ बांडे यांच्याकडे आमची राहण्याची जेवणाची सोय करण्यात आलेली होती. अर्थातच सर्वांना खूप भुक लागलेली होतीच .सर्व मंडळी जेवणाचा आस्वाद घेऊन नंतर झोपण्यासाठी नदीपात्रातील टेन्ट कडे रवाना झालो . बऱ्याच वर्षांनी मुक्कामी ट्रेक होता ज्यामुळे रात्री 11 ते 1:00 वाजेपर्यंत छान गप्पांची मैफिल रंगली. तसेच वैयक्तिक अनुभव सर्वांनी व्यक्त केले. आदरणीय इसावे सरांनी ट्रेकिंग पलटणची पार्श्वभूमी व मागील काही अनुभवांचं स्मरण सर्वांना केले .
दिवस दुसरा -24 मे 2023
दुसरा दिवस 24 मे खरोखर महत्वाचा होता .व्हॅलीत जायचं होतं रॅपलिंग करायची होती. आणि सर्वांना मोहित करणारी ही अडीच किलोमीटर ते चार किलोमीटर असणारी व्हॅली पार करायची होती ,साहजिकच सर्वांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहचली होती . पहाटे पाच वाजताच दिवसाची सुरुवात झाली.
श्री .बांडे (Mobile -90218 53975)यांच्याकडे चहा नाश्ता करून बसने सांदन व्हॅलीचा प्रवास अग्रेसित झाला.साधारणतः साडेसातला आम्ही रॅपलिंग ची सुरुवात केली दोन सेटअप लावल्यामुळे आमचं काम सोपं झालं होतं, मात्र 120 फूट खोल दरीत उतरणे सोप नव्हते.खरोखर अंगावरती शहारे आणणारा हा प्रसंग होता . काही जण एक्सपर्ट होते काही जणांच्या मनामध्ये भीती व हुरहुर होती ,काहींचे हात पाय थरथर कापत होते.रॅपलिंग चा अनुभव म्हणजे खरोखर पुनर्जन्माचाच अनुभव असतो.या सहासी प्रकारात खरोखर तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो.ट्रेकिंग पलटणच्या सर्व मावळ्यांनी रॅपलिंग सहजतेने पूर्ण केली आणि साडेनऊला व्हॅली ट्रेकिंग करण्यास सुरुवात झाली.आम्ही 19 जण शंभरावे ट्रेकचा औचित्य साधून ही आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी व्हॅली क्रॉस करण्याचा स्वप्न घेऊन अत्यंत उत्साहात दीड दोन किलोमीटर चालत जाणार होतो.मनामध्ये रात्रीचे काजवे अजूनही चमकत होतेच.
व्हॅलीमध्ये दोन ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक तलाव होते. भर उन्हाळ्यामध्येही त्यामध्ये भरपूर पाणी होतं .अतिशय अरुंद मार्ग वरून उंच डोंगरकडा असा मार्ग आम्ही साधारणतः दीड ते दोन किलोमीटर चालत गेलो.या मार्गावरती खूपच अनकुचीदार दगड होते त्यामुळेच खूप सावधगिरीने चालावं लागत होतं.व्हॅलीमध्ये आमचा आवाजाचा प्रतिध्वनी सहतेने प्रतिसाद देत होता.फोटो ,व्हिडिओ काढत तसेच एक निसर्गाचा चमत्कार अनुभूवत व्हॅलीमध्येआम्ही उतरल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या नावाने जय जयकार केला. बारा वाजता दरीच्या खुल्या टोकाला पोहोचलो. दरी काय संपली नव्हती अजूनही दोन तीन किलोमीटर बाकी होती मात्र पुढील प्रवास अतिशय खडतर होता म्हणून आम्ही माघारी फिरलो . पलटणच्या परंपरेप्रमाणे माघारी येताना आम्ही दरीमधील कचरा ,रॅपर्स , प्लास्टिकच रिकाम्या बाटल्या तस्सम कचरा गोळा केला.
सर्वच मावळ्यांचा उत्साह कुठेही कमी नव्हता.ते थकली नव्हते. अजूनही व्हॅलीतील गुढता संपत नव्हती.आता मात्र परतीचा प्रवास नाईलाजाने सुरू करावा लागणार होता दुपारी दोन वाजता दुपारची न्याहारी करून व मुलांमध्ये खाऊवाटप व शैक्षणिक सामग्री वाटप करून आम्ही पलटणचे सगळे मेंबर्स पुण्याकडे अनेक आठवणींचा खजिना घेऊन रवाना झालो.
-संदीप चौधरी
( 9511137711),पुणे