एक होता कार्व्हर ह्या पुस्तकाचे सारांश लेखन प्रा. डॉ. राधिका सोमवंशी यांनी केले आहे. ह्या पुस्तकाच्या लेखिका आहेत वीणा गवाणकर आणि पुस्तकाचे प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशन, पुणे. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङमय पुरस्कार मिळाला आहे. पुस्तकाची 45 वी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. हे पुस्तक लहान-थोर सर्वांसाठीच अतिशय प्रेरणादायी आहे.
गोष्ट आहे एका थोर साधुतुल्य, प्रज्ञावंत शास्त्रज्ञाची, अतिशय प्रेरणादायक.जीवनातील प्रखर संघर्ष म्हणजे काय याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. असाही अद्भुत माणूस असू शकतो!! तसेच मानवी शक्तीच्या अतिउच्च पराक्रमाची कल्पना येईल. ही थोर व्यक्ती म्हणजे डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर.
अवघे दोन वर्षे वय असताना आईसह गुलामांच्या टोळीने पळवून नेले परंतु कसेबशे घोड्याच्या बदल्यात वाचविलेले हे अनाथ मुल. अत्यंत किडकिडीत मरणोन्मुख मुल, लहानाचे मोठे झाले ते सर्वांची पडेल ती कामे करुन. विशेषता बागेचा परिसर स्वच्छ करून सुंदर बाग करणे, स्वयंपाक घरात मदत करणे इत्यादी. अतिशय नम्र व सालस .
लहानपणापासून वनस्पतींचे पाना-फुलांचे अत्यंत वेड ,एकटक एखाद्या रोपाकडे निरीक्षण करत बसण्याचा छंद. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हे मुल म्हणजेच भविष्यातील थोर वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. कार्व्हर.
निग्रो कुळातील असल्यामुळे व तेव्हाच्या गुलामगिरीच्या वाईट प्रथेमुळे अत्यंत अडचणीत, खूप कष्ट करून, अनेक विरोधकांना तोंड देत शिक्षण घेतले.निग्रो लोकांसाठी असलेल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले कारण इतर विद्यापीठात प्रवेश नव्हता. त्याच विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
उत्तर अमेरिकेत चांगली नोकरी होती परंतु दक्षिण अमेरिकेतील ॲलबॅमा या अतिशय ओसाड भागातील टस्किगी येथील शाळेतील डॉ. वॉशिंग्टन यांनी कार्व्हर यांना बोलावले ते ह्या दक्षिण अमेरिकेतील जनतेच्या उद्धारासाठी . ह्या आमंत्रणाचा क्षणाचाही वेळ न घेता डॉ.कार्व्हर यांनी स्वीकार केला. आपली नोकरी नाव-लौकिक सर्वांवर पाणी सोडले व टस्किगी येथे हजर झाले.
अत्यंत बिकट परिस्थितीत, अगदी कमी विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन त्यांनी आपले काम सुरु केले. कोणतीही वस्तू टाकाऊ नसते हे त्यांचे महत्वाचे तत्व. उदाहरणार्थ एखाद्या पॅकिंग ला दोरा गुंडाळलेला आला असेल तर तो दोरा सुद्धा ते सांभाळून ठेवत.
ॲलबॅमा हा अतिशय ओसाड भाग होता. कोणतेही पिक येत नव्हते. त्यामुळे लोकांची उपासमार होत असे. डॉ. कार्व्हर यांनी मातीच्या नमुन्यांचा अभ्यास केला. कापसाच्या ऐवजी रताळ्याची व शेंगदाण्याची लागवड केली. रताळे व शेंगदाणे प्रकृतीस किती उपयुक्त आहेत व त्यांचे अनेक प्रकारचे पदार्थ करता येतात हे आजूबाजूच्या लोकांना पटवून दिले. हे लोकांना पटविणे सोपे काम नव्हते. तसेच आलटून पालटून पिक घेतल्यास जमिनीचा कस टिकतो, उत्तम पीक येते. अन्नधान्य टिकविण्याच्या सुलभ पद्धती त्यांनी शेतकऱ्यांना शिकविल्या.
अतिशय मागासलेल्या भागातील लोकांना स्वच्छतेपासून आहार- विहार इत्यादी सर्व गोष्टी डॉ. कार्व्हर यांनी शिकविल्या.प्रयोगशाळेत तसेच समाजात अविरत, जवळ जवळ चाळीस वर्ष त्यांनी अत्यंत मेहनत घेतली.सर्व कामे ते स्वतः करीत असत. वयाची साठी ओलांडली तरी रात्रंदिवस कष्ट करीत असत. ऐषाराम व ऐश्वर्य त्यांना आवडत नव्हते. इतके की त्यांच्या पगारातही कधी त्यांनी वाढ घेतली नाही. मला जास्त पगाराची काय गरज, असे त्यांचे मत होते.
डॉ.कार्व्हर यांनी आपल्या प्रयत्नांनी दक्षिण अमेरिका बदलवून टाकली. वनस्पतीजन्य रंग तयार करून डॉ.कार्व्हर यांनी अमेरिकेला मोठी देणगी दिली.गोरे लोक सुद्धा त्यांना मानू लागले. नंतरच्या काळात त्यांना एक उत्तम शिष्य मिळाला त्यामुळे ते आनंदी होते. तसेच हेन्री फोर्ड हे त्यांचे मित्र बनले त्यामुळेही त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास भरपूर आर्थिक मदत झाली. डॉ. कार्व्हर अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाले.
डॉ. कार्व्हर चित्रकलेत निपूण होते आजही त्यांच्या कलेचे उत्तम नमुने पहावयास मिळतात.ठरविल्यास ते उत्तम गायक तसेच चित्रकार होऊ शकले असते परंतु शेती विषयक अभ्यासावर, संशोधनावर त्यांनी लक्ष केंद्रित केले कारण या संशोधनाची समाजास अत्यंत गरज होती.
डॉ. कार्व्हर यांची जीवनतत्वे :-
* या जगात टाकाऊ असं काहीच नाही, सारे जपा वेळ प्रसंगी त्याचा उपयोग होतो.
* अपमान झाला तरी तो सहन करून निश्चल मनाने आपले कार्य, कष्ट व संशोधन चालू ठेवावे.
त्यांच्या या गुणांच्या बळावर त्यांनी अवघ्या राष्ट्राला बळकटी, शक्ती मिळवून दिली.
या पुस्तकातून डॉ.कार्व्हर यांचे व्यक्तिमत्वातील अनेक पैलू आपणास दिसून येतात की जे आत्मसात करून घेण्याची आज गरज आहे. अनेक बिकट प्रसंगांना लहानपणापासून तोंड देण्याची त्यांची तयारी अनुकरणीय आहे. तसेच अविरत कष्ट करणे व सकारात्मक दृष्टिकोन हे त्यांच्या अंगी असलेला गुण वाखाणण्यासारखे आहेत. डॉ. कार्व्हर यांच्या अंगी निस्वार्थ सेवाभाव दिसून येतो. त्यांच्या स्वतःच्या गरजा अतिशय माफक होत्या त्यामुळे त्यांचे अर्थार्जन हे प्रथम ध्येय नव्हते.त्यांनी शिक्षण सुद्धा अशा विषयात घेतले कि ज्यामुळे आपल्या शिक्षणाचा/ संशोधनाचा उपयोग समाजाला होईल. ते एक उत्तम प्रयोगशील शेतकरी होते व हा आदर्श डोळ्यापुढे ठेवण्यासारखा आहे . त्यांनी नेहमी मानव जातीच्या हिताचेच ध्येय आपल्या कार्य पुढे ठेवले .त्यांचे कार्य हे पूर्णपणे समाजोपयोगी होते. कितीही संकटे आली व विरोध झाला तरी डॉ.कार्व्हर यांनी आपले कार्य अविरत चालू ठेवले. डॉ डॉक्टर कार्व्हर यांचे गुण वाखाणण्यासारखे आहेत त्यामुळेच आजही डॉ. कार्व्हर पूर्ण जगाच्या हृदयामध्ये घर करुन आहेत. त्यांचे जीवन चरित्र हे निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
5 जानेवारी 1943 रोजी डॉ. कार्व्हर यांनी टस्किगी येथे अखेरचा श्वास घेतला. अशा या थोर. तपस्वी साधु पुरुषास, समाजसेवकास, प्रयोगशील शेतकऱ्यास व संशोधकास कोटी कोटी प्रणाम.🙏🙏
प्रा.डॉ.राधिका सोमवंशी
विभाग प्रमुख गणित व संख्याशास्त्र विभाग,
नूतन मराठा कॉलेज,
जळगाव.( सेवानिवृत्त)