डॉ. चंद्रकांत रावळ सर एच.व्ही देसाई कॉलेज मध्ये उपप्राचार्य असताना, त्यांनी मला पीएच.डी असल्या मुळे १९९३ मध्ये एम.कॉम ला शिकविण्याची संधी दिली. रावळ सर यांच्या सहवासात मला मिळालेले अनुभव, नवीन नवीन माहिती, आठवणीं ऐकल्यावर सरांच्या विचारांचा एक वेगळाच ठसा माझ्या मनावर उठत गेला. एच.व्ही देसाई कॉलेज पेठे मध्ये होते. इथे येणारे विद्यार्थ्यांमधील अवगुण आणि सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तीमत्वाला चालना व आकार देताना मी रावळ सरांना फार जवळून पाहिले. विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाच्या, बेशिस्तीच्या समस्या सोडविण्या साठी ते तत्पर असत. दादागिरी करणाऱ्या विध्यार्थ्यांना दादागिरीतच उत्तर देण्याची त्यांची कसब वेगळीच होती.
माणसं निवडण व घडवण्याचं त्यांचे ज्ञान हे अनाकलनीय आहे. शिक्षण क्षेत्रात नवीन-नवीन प्रयोग करत रावळ सरांनी अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करत विद्यार्थ्यांचे जीवन सुखमय केले. सरांचा ज्ञानाचा मोठेपणा असा की आपल्या अध्यापनाला कृतिशीलतेची जोड देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील होते. रावळ सरांनी आपल्या वाट्याला आलेले काम कुशलतेने, आनंदीवृत्तीने आणि नियमांच्या आधीन राहून व नवनवीन अध्यापन तंत्राचा अवलंब करून केले आहे. रावळ सर म्हणजे चालते बोलते विद्यापीठ. त्यांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत 21 विद्यार्थ्यांनी विद्यावचस्पति तर 24 विद्यार्थ्यांनी M.Phil ही पदवी संपादन केली. हेच विद्यार्थी समाजासाठी आदर्श निर्माण करणारे आहेत असे मला मनोमनी वाटते.
सरांनी आपल्या अनेक कार्यकीर्दीत कार्यशाळा, चर्चासत्र, तसेच परिसंवाद आयोजित केले व आपल्या कौशल्याने ती पार पाडली. तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिसंवादात 126 वेळा सक्रिय सहभाग नोंदवून एक आदर्श निर्माण केला. पुण्यातील नामांकित बी.एम.सी.सी. महाविद्यालयात प्राचार्य पद संभाळून त्यांनी आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा दाखवली त्यांना जवळपास 35 वर्षांपेक्षा जास्त अध्यापनाचा अनुभव रावळ सरांना आहे. त्यांनी अनेक आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम केले. माननीय नामदार शरद पवार साहेबां सारखे राजकीय धुरंदर याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते .अशा महाविद्यालयाचे प्राचार्य होण्याचा मान सरांना मिळाला .बी. एम .सी .सी. या महाविद्यालयाला नॅकच्या ‘अ’ श्रेणीत ठेवण्याचा बहुमान वेळोवेळी मिळवला आहे.
प्राध्यापक, प्राचार्य असा प्रवास करत करत ते पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य, विद्यापीठातील कॉमर्स विभागाचे सदस्य तसेच नवीन अभ्यासक्रमाचे अध्यक्ष ,परीक्षा मंडळाचे सदस्य, प्राध्यापकांच्या वरिष्ठ निवड श्रेणी चे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. एवढेच नाही तर राज्य स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार समितीचे सदस्य , मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य ,पुणे विद्यापीठ S.T.R.M. विद्यापीठ नांदेड येथे संशोधन मंडळाचे सदस्य व स्पर्धा परीक्षेचे सदस्य म्हणूनही काम केले असून त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला. त्यांनी जवळपास 500 पेक्षा जास्त वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शन केले.
वरील कामाची पावती व सन्मान म्हणून त्यांना अनेक नामवंत संस्थांचे पुरस्कारही मिळाले आहे. रावळसर राष्ट्रीय स्तरावर ऑल इंडिया कॉलेज प्राचार्य महासंघाचे कायमस्वरूपी सदस्य आहेत. “NAAC “समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक महाविद्यालयांना भेटी देऊन त्यांच्या कामगिरीनुसार श्रेणी देण्याचे काम केले .तसेच विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे सल्लागार पद ही सन्मानाने भूषविलेले आहे.
रावळ सरांना राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे 1994 मध्ये ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार तर भारती विद्यापीठातर्फे 2003 मध्ये ,’शिक्षण क्षेत्राचे महर्षी’ हा पुरस्कार देऊन गौरव केला. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा मानाचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” त्यांना प्राप्त झाला. तसेच Dr.S.J.E. फाउंडेशन पुणे यांच्याकडून आणि पुणे विद्यापीठाकडून 2012 मध्ये त्यांना ‘आदर्श प्राचार्य पुरस्कार’मिळाला. पुण्यातील नामांकित महाराष्ट्रा कॉस्मोपॉलिटेन सोसायटी या संस्थेकडून 2019 मध्ये ‘शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामगिरी’ बद्दल पुरस्कार देऊन गौरव केला.
विविध पुरस्कारांनी सन्मानित होऊन देखील रावळ सर वेळोवेळी आमच्याशी संपर्क साधून आत्मीयतेने विचारपूस करायचे व आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात . यातून त्यांच्या विचारांची तीव्रता इतरांना कळते.आदरणीय रावळ सरांसोबत वावरत असताना त्यांच्या कार्याचा ,विचारांचा, व्यक्तीमत्त्वाचा जो ठसा माझ्या मनात उमटत गेला त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न मी केला आहे. माझ्यात जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा असून याचा मला सार्थ अभिमान आहे.
आदरणीय रावळ सरांचे भावी आयुष्य सुखाचे, समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.आम्हा सर्वांना सरांचे सहकार्य यापुढेही नेहमी मिळत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
रावळ सरांच्या विशेष मार्गदर्शनाचा मी ऋणी आहे व राहील.
धन्यवाद
प्राध्यापक डॉ. आफताब अन्वर शेख,
प्राचार्य, पूना कॉलेज,