*विझले आज जरी मी* ,
*हा माझा अंत नाही*
*पेटेन उद्या नव्याने* ,
*हे सामर्थ्य नाशवंत नाही*.
*रोखण्यास वाट माझी*,
*वादळे होती आतुर*.
*डोळ्यात जरी गेली धुळ*,
*थांबण्यास उसंत नाही*.
अशाच प्रकारचं प्रोत्साहन आणि संकटांवर मात करून पुढे जाण्याची शक्ती माझ्या आई वडिलांनी मला आजवर दिली .म्हणूनच आज मी या ठिकाणी येऊन पोहोचले.
मी , *गिरिजा प्रशांत महामुनी*. सध्या पुण्यातील स.प.महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्र विषयक पदवीयुत्तर शिक्षण घेत आहे. शैक्षणिक वाटचालीसोबतच मला प्रामुख्याने नमुद करावीशी वाटते ती गोष्ट अशी की मला गाण्याचा छंद आहे आणि हाच *छंद* आता मला एका नव्या उंचीवर घेऊन जातो आहे. याचं कारण म्हणजे माझा हा छंद मी लहानपणापासूनच अगदी मनापासून जोपासला. वयाच्या केवळ *आठव्या* वर्षी शास्त्रीय गायनाची प्रारंभिक परिक्षा मी *अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालया* मधून दिली आणि माझा हा सुरेल प्रवास सुरू झाला .त्यानंतर जिथे जिथे संधी मिळेल मी गायचे. हे सर्व गायनाचे शिक्षण मला माझे वडिल, माझे गुरू *श्री. प्रशांत महामुनी* यांचेकडून मिळाले.इयत्ता चौथीला मी *99.88%* गुण मिळविल्यानंतर माझ्या आई वडिलांच्या चेहर्यावर जो आनंद होता त्याच्या दहापट मोठा आनंद दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये *93.40%* गुण मिळवून केंद्रातून प्रथम क्रमांक आल्यावर दिसला.यासोबतच मी माझ्या गायनाच्या *मध्यमा पूर्ण* पर्यंतच्या टप्प्यावर येऊन पोहोचले होते. गाण्याच्या आणि शिक्षणाच्या ध्यासासोबतच मी माझी वक्तृत्व कलासुद्धा जोपासली.राज्यस्तरीय पातळीवर अनेक वेळा अव्वल येण्याचा मान मिळवला.यांपैकी *मोरोपंत वक्तृत्व स्पर्धा 2018* आणि *कर्मवीर भाऊराव पाटील वक्तृत्व स्पर्धा 2017* अविस्मरणीय आहेत.
गाण्याच्या या ध्यासामुळे 17 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित *लता भगवान करे – एक संघर्ष गाथा* या चित्रपटातील दोन गीते गाण्याची संधी आणि भाग्य मिळाले .
माझा हा छंद मला अजून मोठ्या उंचीवर नेवो किंवा न नेवो , परंतु मला स्वतःला मात्र खूप आनंद देतो .शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासात मदत करतो.मी M.Sc. (Physics) च्या प्रथम सत्रामध्ये सुद्धा आमच्या विभागात प्रथम येऊ शकले ते फक्त माझ्या या ध्यासामुळेच हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो.यासोबतच सुवर्णपुष्प संस्था ,पुणे यांच्या तर्फे दिला जाणारा *युवा गौरव पुरस्कार 2019* चा मानही मिळाला.
शेवटी सर्वांना हेच सांगायचे आहे की तुमच्यामध्ये लपलेल्या कलागुणांना ओळखा .खरंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते न कोणते कलागुण असतात .गरज असते ती त्या कलागुणांना ओळखण्याची आणि फक्त ओळखून चालणार नाही तर जीवनात काही साध्य करायचे असेल त्या कलागुणांना वाव आणि वेळ देणे महत्त्वाचे असते आणि मग *प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे* या म्हणीप्रमाणेच त्या कलागुणांना वाव आणि वेळ देऊन प्रयत्न करून विकसित केले तर प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेला कलाकार जगासमोर येईल आणि त्यास जीवनाचा खरा आनंद मिळेल . जीवन सुखाच्या सुगंधात बहरून जाईल.
To publish your achievement contact www.mahaedunews.com