गोष्ट एकोणीसशे ऐंशी पर्यंतच्या प्राथमिक शिक्षणाची….
पाथर्डी गाव तसं छोटं…. पण नाव लई मोठं…
खालची वेस शनी मंदिर, इकडे पोळा मारुती, वरती जुने एस टी स्टँड आणि जुन्या चिंचपुर रोडवरचा मारुती आणि बारव…
पण या एव्हढ्याशा गावात किती शैक्षणिक घडामोडी घडल्या…
खालच्या वेशीपासून निघाले की, जुना भाजी बाजाराचा चौक, जिथे भाजी बाजार भरत असे. नवीन पिढीला तो बाजार माहिती नाही. तिथे उजवीकडे वळून पुढे आलेकी खालचा गणपती. सरळ मुख्य रस्त्याने सरळ वरती पुढे आलेकी परत एक लहान चौक. या चौकातून डावी कडे जाणारा रस्ता थेट नदीपर्यंत जाणारा, तर उजवीकडे जाणारा रस्ता थेट रामगिरीबाबाच्या टेकडी पर्यंत जाणारा. तर मंडळी आपण उजवीकडे वळायचे. पूर्वी या गल्लीला लकार गल्ली असे ओळखले जायचे. तर याच लकार गल्लीत टेकडीच्या अगदी पायथ्याशी मुलींची शाळा होती. भली मोठी दुमजली इमारत.
या इमारती मध्ये मुलींची शाळा भरायची. गावातील प्रत्येक घरातील मुलगी या ठिकाणी शिक्षणासाठी येणार. सगळा गाव सगळ्या शिक्षिकांना ओळखायचा.
काकडे बाई..(धिरडे बाई), भागवत बाई,त्यातल्या एक दगडाबाई भागवत तर दुसऱ्या भागवत बाई म्हणजे आजचे हैद्राबाद चे पोलीस आयुक्त मा.महेशजी भागवत साहेब यांच्या आई. आणखी एक भागवत बाई,मरकड बाई, ठकुबाई
इधाटे, शेख बाई, केरकळ बाई, फुटाणे बाई, चरेगावकर बाई ( देशमुख बाई), वामन बाई, साळवे बाई , कुलकर्णी बाई, क्षेत्रे बाई . सगळी नावं आठवत नाहीत त्या साठी क्षमस्व.आज प्रकर्षाने जाणवतेय केवढी शैक्षणिक समृद्धी या सर्व शिक्षीकांच्या कडे होती. शाळेत येताना जाताना प्रत्येक घरातील स्त्रीशी या सगळ्या शिक्षिकांना बोलावे लागत असे. एखादी सासुरवाशीण आपल्या मनातील भावना यांच्या कडे व्यक्त करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायची. या शिक्षिका सुद्धा आपल्या परीने त्यांचं सुख दुःख वाटून घेत असत.
सगळ्या विद्यार्थींनी ची माहिती शिक्षिकांना असायची. त्यांच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीची जाणीव असायची. स्वतःच्या पोटच्या गोळ्या प्रमाणे त्या प्रेम करायच्या.
त्या काळातील शिस्त मात्र खूपच कडक होती. विद्यार्थ्यांना मारायचे नाही असे फर्मान तेंव्हा शासनाने काढलेले नव्हते. ” छडी लागे छम छम, विद्या येई घम घम ” असा तो काळ होता.
सगळ्या शिक्षिकांच्या कपाळावर ठसठशीत कुंकु उठुन दिसत असे, काहींचे गोल पातळ तर काहींची चापून चोपुन नेसलेली नऊवारी साडी असे. रस्त्यात जर बाई दिसल्या तर पळापळ व्हायची. आपल्या घरी तर येत नाहीत ना या कडे लक्ष दिले जायचे.
माझ्या स्मृती नुसार सातवी पर्यंतची शाळा इथे चालवली जायची. तेव्हा आठवीत हायस्कुल ला जावे लागत असे. शाळेत जाणे हा मोठा आंनद होता.
प्राथमिक शिक्षणाची मुख्य शाळा जुन्या स्टँड च्या जवळ सध्या असलेल्या ठिकाणीच होती. नाव खुप मोठे छान, ” जीवन शिक्षण विद्या मंदिर “. खिरोडे गुरुजी मुख्याध्यापक असल्याचे आठवतेय. धोतर, काळा कोट, काळी टोपी असा त्यांचा वेष असल्याचेही आठवतेय. बहुसंख्य शिक्षक धोतर वापरत असत. चातुर गुरुजी, बांगर गुरुजी, शेटे गुरुजी, केरकळ गुरुजी, मर्दाने गुरुजी, गोरे गुरुजी, डांगे गुरुजी’ शर्मा गुरुजी, लवांडे गुरुजी, खेडकर गुरुजी, महाजन गुरुजी, भागवत गुरुजी ( मा.भागवत साहेबांचे वडील), राजगुरू गुरुजी, वर्हाडे गुरुजी अशी त्यातली काही नावे आठवतात. सगळी नावे आठवत नाहीत, क्षमस्व. या सर्वांनी पाथर्डीतील मातीच्या गोळ्यांना आकार देण्याचे काम थेट अंतकरणातून केले.
यातील सर्वच शिक्षक आणि शिक्षिकांची शिकविण्याची आपली आपली स्वतंत्र शैली होती. प्रत्येकाची आपली आपली वेगवेगळी गुण वैशिष्ट्ये होती. स्वतःच्या स्वतंत्र शारीरिक लकबी होत्या. नेहुलकर गुरुजी एका विशिष्ठ शैलीत शिट्टी वाजवायचे, ती शिट्टी आजही ऐकायला येते.
शाळेची घंटा थेट घरापर्यंत ऐकायला यायची. घंटा वाजवायला मिळावी या साठी चढाओढ असायची. त्यासाठी पोरं मुद्दाम लवकर शाळेत यायची. घंटा वाजवण्या वरून मारामारी व्हायची.
अर्धी चड्डी, सदरा आणि गांधी टोपी असा विद्यार्थ्यांचा गणवेश असे. पायात घालायला वहाणा असतात हे तेव्हा माहिती नव्हते. बहुतेक विदयार्थ्यांचे नाक कायम फुरफुरत असायचे. त्या मुळे सगळ्या विद्यार्थ्यांच्या सदऱ्याच्या डाव्या बाह्या नाक पुसून पुसून कडक झालेल्या असायच्या. आजच्या विद्यार्थ्यांच्या सारखा थाटमाट नव्हता. कापडी पिशवीलाच दप्तर म्हणायचे, शाळेची वेळ झालेकी सरळ पिशवी उचलायची आणि निघायचं शाळेला. पालकांचा आणि शाळेचा कधी सम्बन्ध यायचा नाही. पोरगं शाळेत जातंय यावरच पालक खुश असायचे. खापराची पाटी आणि पेन्सिल घेऊन शाळेत जायचे. गुरुजींनी दिलेला गृहपाठ पाटीवरच असायचा, तो पुसू नये म्हणून पाटी अलगद घरी आणायची. सकाळ दुपार अशा दोन सत्रात शाळा भरायची.
प्रार्थना, दिनविशेष आणि शाळा सुटल्यांनातर राष्ट्रगीत होत असे. पेटी वाजवत ” बलसागर भारत होवो” हे गोरे गुरुजी आपल्या गोड मधुर आवाजात म्हणत असत. खुपच मजे मजेचे दिवस होते.
विद्यार्थ्यांना बसायला लांबच्या लांब पाट असायचे. वर्ग स्वच्छ करून घेण्यात खूप मजा असायची. त्यासाठी शेण गोळा करून आणावे लागायचे. आणी मग आठ दहा विद्यार्थ्यांची टोळी त्या मोहिमेवर निघायची. दिसले शेण की टाकलीच झडप, असा प्रकार चालायचा. या मोहिमेचा शेवट आजच्या बाजारतळात व्हायचा. शेण घेऊन आलेकी पाण्याची सोय करायची आणि मग सगळा वर्ग सारवून घ्यायचा आणि निर्जंतुक करून टाकायचा. या सगळ्या कार्यक्रमात नुसती धमाल असायची. सगळी पोरं यात हिरीरीने भाग घ्यायची. नकळतपणे यातुन विद्यार्थ्यांना श्रमाचे आणि स्वच्छतेचे महत्व समजायचे.
एखादा विद्यार्थी जर गैरहजर असेल तर अशीच ” शोध मोहीम ” निघायची. गुरुजींनी फक्त विचारायचा अवकाश कोण गैरहजर आहे, की लगेच गैरहजर विद्यार्थ्यांची नावे सांगितली जायची. मग गुरुजींनी पाच सहा सैनिकांची या मोहिमेसाठी निवड करायची आणि फर्मान सोडायचे, गनीम को पकडा जाये और हमारे सामने पेश किया जाये. मग काय युद्धाला जाण्याच्या आवेशात व्युहरचना तयार केली जायची. कुठे सापडेल, काय करीत असेल आणि कसा धरायचा. सैन्य गनिमी काव्याचा वापर करीत असे. गैरहजर पोरानी सैन्याला पाहिले की त्याला अंदाज यायचा की आता काय होणार आहे, पोरगं जिवाच्या आकांताने जीव वाचवायचा प्रयत्न करायचं. पण सैन्य मागे हटत नसे. पोरानी शाळेत जातोय असे सांगुन शाळा बुडवलेली असायची त्यामुळे त्याला घरी जाणे शक्य नसायचं. पोरगं मोठं कोंडीत सापडायचं. मग काय गनीम घावला म्हणून मोठ्या मोठया आरोळ्या आणि गनिमाची उचल बांगडी. पोरगं
हांजड हींजड करायचं पण सुटका होत नसायची. कामगिरी फत्ते च्या आवेशात पोरं त्या पोराला घेऊन निघायची. त्याही परिस्थितीत गनीम सैन्याला गोळ्या, चॉकलेट चे किंवा पेन्सिलीचे आमिष दाखवायचा. पण सैनिक मागे हटत नव्हते. पोरगं थेट गुरूजींच्या समोर नेऊन आदळायचे. गुरुजींनी शाबासकी दिली की एक अत्यन्त अवघड कामगिरी पार पाडल्याचे तीव्र समाधान सगळ्या सैन्याच्या चेहऱ्यावर उमटायचे.
हसत खेळत पण शिस्तीत अशा प्रकारचे ते शिक्षण होते. कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा नव्हता.
त्या काळातील सर्व शिक्षक आणि शिक्षिकांनी किती विद्यार्थ्यांचे आयुष्य समृद्ध केले याला गिणतीच नाही. त्यांना जीवन जगण्याची कला दिली, आणि खऱ्या अर्थाने ” जीवन शिक्षण विद्या मंदिर ” हे नाव सार्थ केले.
अनेक शिक्षक किंवा शिक्षिका यांचे नाव लेखात आले नसेल, माझ्या स्मृतीतून गेले असेल पण तरीही त्यांच्या प्रति आदराची भावना व्यक्त करतो. यातील काही शिक्षक किंवा शिक्षिका हयात नसतील, त्यांच्या प्रति भावपुर्ण आदरांजली वाहतो तर हयात असणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षिकांच्या कार्यास सलाम करून त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभावे या शुभेच्छा व्यक्त करतो.
visit www.mahaedunews.com, Submit your life experiences at mahaedunews@gmail.com