प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, दिसायला जरी मुलगी आईसारखी दिसली तरी वागता-बोलताना, विचार करताना, एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना ती वडिलांसारखी, आजोबांसारखी आणि तिच्या जडणघडणीत सहभाग असणाऱ्या इतर काही व्यक्तींसारखी वेगळी असूच शकते. त्यामुळेच आज आपल्या आजूबाजूला अनेकविध उदाहरणं दिसतात. डॉक्टरांची मुलं डॉक्टरच असतात असं नाही, तर अगदी आर्मी ऑफिसरही असतात. तर असं का? पूर्वी शक्यतो, डॉक्टरांची मुलं डॉक्टरच किंवा वकीलांची मुलं वकील आणि शिक्षकांची मुलं शिक्षकंच बनायची… मग असा बदल कधी आणि का घडला?
प्रत्त्येक बदल हा ऐतिहासिक असतो पण एखादी ऐतिहासिक घटनाच त्याला कारणीभूत असते असं नाही तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटना अशा प्रकारचे बदल घडवून आणण्यासाठी जाणीवा निर्माण करत असतात.
समीर, आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा. तसा हुशार आणि १०-१२वीला वर्गातील इतर मुलांपेक्षा ५-७% मार्क जास्तच असायचे. अशा वेळी आपल्या हुशार मुलाला योग्य प्रकारे करिअर मार्गदर्शन करण्याऐवजी, ‘त्याला काय आवडेल ते करू दे’ यात धन्यता मानणाऱ्या पालकांनी आनंदाच्या भरात समीरच्या ‘हो’ मध्ये ‘हो’ मिळवला. सर्वसाधारणपणे आजूबाजूला रहाणारी मुलं, वर्गातील इतर मुलं इंजिनिअरिंग हेच क्षेत्र निवडत होती. आता समीरने ‘इंजिनिअरिंग नाही केले तर जणू काही कमीपणा वाटेल की काय’ अशा विचारांती (खरं तर अविचारानेच) इंजिनिअरिंगलाच ॲडमिशन घेतली. तसे समीरला भाषा आणि इतिहास हे पण विषय आवडायचे. पण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून इतरांच्या पावलावर पाऊल ठेवत ह्यानेपण कुठल्याशा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण पहिल्याच टर्मचे २विषय राहिले. ते दुसऱ्या टर्ममध्ये सुटले नाहीतच, पण अजून २ विषयांत समीर नापास झाला. ३ पेक्षा जास्त विषयांत नापास झाल्यामुळे समीरला पुढच्या वर्षाला ॲडमिशन न घेता परत पहिल्या वर्षाचेच विषय पास करायचे होते, म्हणजे घरी बसायचं आणि १ वर्ष वाया घालवायचं.
आता मात्र आई-वडीलांवर नामुष्कीची वेळ आली. ते आता आत्मपरीक्षण करु लागले. ‘काय चुकलं आपलं?’ ‘समीरला हवं ते करू दिलं तर तो आता का आभ्यास करत नाहीये?’ की ‘आता त्यांच्या डोक्यात हवा गेलीये?’
समीर पण या सगळ्या अपयशाने वैफल्यग्रस्त झाला, कुणाशी फारसा बोलत नव्हता आणि मनातलं काही सांगताही येत नव्हतं. त्यांचं त्यालाच कळत नव्हतं की त्याची हुशारी एवढी कुचकामी कशी काय ठरली?
त्यांच वेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या श्र्वेताने त्याला मार्गदर्शन केले. श्र्वेता सध्या वकिलीचं शिक्षण घेत कायद्याचा अभ्यास करत होती. आजूबाजूला रहाणाऱ्या इतर मुलांपेक्षा तिने जरा वेगळं क्षेत्र निवडलं होतं. ‘हे क्षेत्र तिला कसं काय सुचलं?’ असं अनेकदा समीर आणि त्याच्या आई-वडिलांच्या मनात यायचं, पण त्यांनी कधी हे श्र्वेताला विचारलं नाही.
श्र्वेताला मात्र समीर आणि त्याच्या आई-वडिलांच्या मनातली घालमेल जाणवत होती. शेवटी तिनेच पुढाकार घेऊन समीर आणि त्याच्या वडिलांसोबत या विषयावर चर्चा केली. तिने त्यांना समजावले, ‘काका, समीरला मी लहानपणापासून ओळखते. तो खूप मेहनती आणि अभ्यासू आहे. त्याला आलेलं अपयश ही कदाचित त्याने अभ्यास न केल्याची खूण नसून त्याला अभ्यास जमत नसल्याची खूण आहे. त्याच्या करिअर कडे आपण जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघूया का? तसं बघायला गेलं तर माझा वकिलीचा अभ्यास हा आजूबाजूला शिक्षण घेणाऱ्या इतर मुलांपेक्षा बराच वेगळा आहे आणि हा मी माझी ‘पर्सन्यालिटी टेस्ट’ म्हणजे माझे स्वभाव गुणधर्म, आवडीनिवडी आणि माझ्या अंगी असलेल्या मुलभूत कौशल्य-गुण, काय आणि कोणते आहेत, ते जाणून घेऊन मग ठरवला आहे. अर्थात, मला हा विषय खूपच आवडतो आणि त्यामुळे मला अभ्यास हा अभ्यास न वाटता, मला त्याविषयी खूप ओढ आणि कुतुहल वाटतं.’
तिला मध्येच थांबवत समीरचे वडिल म्हणाले, ‘पर्सन्यालिटी टेस्ट’ म्हणजे नक्की काय? याचा समीरला आता नाही का फायदा होणार?’
श्र्वेता म्हणाली, ‘काका, नक्की फायदा होईल. मी खरंतर तेच सुचवायला आले आहे. ‘पर्सन्यालिटी टेस्ट’ म्हणजे एक छोटीशी प्रश्नपत्रिका असते, ज्यामध्ये तुमच्या, स्वभाव, वर्तणुक, आवडीनिवडी संबंधित काही प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये काहीच चूक किंवा बरोबर असं नसतं. अगदी मार्क्स पण नसतात. डॉक्टर कशी औषधं-गोळ्या देण्याआधी आपल्या ब्लडटेस्ट, युरिन टेस्ट, वगैरे, करतात, अगदी तसंच. करिअर मार्गदर्शक म्हणजे विद्यार्थ्यांचे जणू डॉक्टरच. तेदेखील प्रत्त्येक विद्यार्थ्याचा रिपोर्ट तयार करून मग त्यांना योग्य त्या करिअरची दिशा सुचवतात. कधीकधी ते दोन-तीन वेगवेगळे करिअरचे पर्यायही देतात. विद्यार्थी मग आपल्या आवडीनुसार हवं ते फिल्ड ठरवू शकतात. मी ठाण्यामध्ये ‘प्रोफिशिअंट कौन्सिलिंगच्या’ मदतीने ‘पर्सन्यालिटी टेस्ट’ घेऊन माझं करिअर निश्र्चित केलं. कौन्सेलर मॅडमने मला माझ्यातील स्वभाव, गुण दोष, अंगभूत कौशल्य, क्षमता हे सगळं व्यवस्थित समजावून सांगून त्यानुसार हे क्षेत्र सुचवलं आणि मला ते सगळं मनापासून पटलं. तुम्ही समीरला पण त्यांच्याकडे घेऊन जा. अजूनही वेळ गेलेली नाही. बघा, नक्की फायदा होईल.’
मग मात्र समीरच्या वडिलांनी वेळ न दवडता समीरला करिअर कौन्सिलिंगसाठी माझ्या कडे आणले. समीरच्या ‘पर्सन्यालिटी टेस्ट’ मधून माझ्या लक्षात आले की समीर हुशार तर आहेच, पण तो मनमिळावू, सगळ्यांशी हसून खेळून वागणारा आणि इतिहासाचा उत्तम अभ्यासक आहे, साहसी आहे आणि त्याला प्रवासाची देखील आवड आहे. ह्यावरून त्याला ‘ट्रॅव्हल आणि टूरिझम’ या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मी सुचवले. हे ऐकून समीर एकदम हरखून गेला. तो म्हणाला, ‘हो, मी असंच काहीतरी शोधत होतो. मला अगदी भारतातील छोट्याश्या खेड्यापासून ते अंटार्क्टिकापर्यंत सगळं फिरायचं आहे. मी त्यासाठी मिळेल ते अधाशासारखं वाचत असतो आणि तेच जर माझं करिअर असेल तर जणू मी माझं ‘स्वप्नंच जगेन’
समीरच्या या बोलण्याने त्याच्या बाबांच्या डोळ्यांत पाणी तरळलं. खरंच मुलगा आनंदी असण्यापेक्षा जास्त काय महत्त्वाचं? आणि या क्षेत्रात अनुभव आणि योग्य गुण असतील तर मानधन- पैसे पण चांगले मिळतात.
त्यामुळे माझी फी देताना, त्यांचं एक वाक्य माझ्या कायम मनात कोरली गेलं, ‘मॅडम तुम्ही ‘रत्नपारखी’ आहात. करिअर मार्गदर्शनासाठी दिलेली ही फी म्हणजे मी माझ्या मुलाच्या भविष्यासाठी केलेली सगळ्यात महत्त्वाची गुंतवणूक आहे. मी तुमचा कायम ऋणी राहीन.’
त्यांचे हे विचार आणि समाधान हीच माझी खरी कमाई, नाही का?